Lathe Joshi Movie Review : सामान्य माणसाची कथा मांडणारा लेथ जोशी
By प्राजक्ता चिटणीस | Published: July 12, 2018 04:41 PM2018-07-12T16:41:24+5:302023-08-08T19:28:38+5:30
लेथ जोशी या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भुतकर, सेवा चौहान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे, काळ फार बदलला आहे असे आपल्याला सतत ऐकायला मिळते. पण या काळाप्रमाणे आपण देखील आपल्यात बदल करण्याची गरज आहे. काळाच्या बरोबर आपण चाललो नाही तर आपण तिथेच अडकून पडतो आणि काही काळाने लोक आपल्याला विसरायला देखील लागतात हे सांगणारा लेथ जोशी हा चित्रपट आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच लेथ जोशी (चित्तरंजन गिरी) यांची कंपनी बंद पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी जवळजवळ ३५ वर्षं तिथे काम केलेले असते. त्यामुळे त्या वास्तूशी आणि विशेषतः ते ज्या मशिनवर काम करत असतात, त्याच्याविषयी त्यांना एक वेगळीच आपुलकी असते. त्यांच्या घरात त्यांची पत्नी (अश्विनी गिरी), मुलगा दिनू (ओम भुतकर) आणि आई (सेवा चौहान) असते. त्यांची पत्नी जेवणाच्या ऑर्डर घेत असते तर दिनू कॉम्प्यूटर रिपेअरचे काम करत असतो. ते दोघेही आपापल्या व्यवसायात प्रगती करत असतात तर दुसरीकडे नोकरी गेल्यानंतर देखील लेथ जोशी यांचा जीव त्यांच्या मशिनमध्येच अडकलेला असतो. ती मशिन विकत घेऊन आपण आपला नव्याने व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटत असते. लेथ जोशी यांची ही इच्छा पूर्ण होते का? त्यांच्या आयुष्यात काय काय घडते हे प्रेक्षकांना लेथ जोशी या चित्रपटात पाहायला मिळते.
काळाप्रमाणे तंत्रज्ञान सतत बदलत असते. अनेक ठिकाणी कामगारांची जागा आता मशिनने घेतली आहे. त्यामुळे अनेक कुशल कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण या सगळ्यात देखील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्यात बदल घडवणारे लोक प्रगती करतात हे आपल्याला आजूबाजूलाच पाहायला मिळते. हीच आपल्या रोजच्या आयुष्यातील गोष्ट दिग्दर्शक मंगेश जोशीने खूप छानपणे मांडली आहे. चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भुतकर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. लेथ जोशी यांची नोकरी गेल्यानंतर त्यांची होत असलेली घालमेल चित्तरंजन गिरी यांनी देहबोलीतून उत्तमरित्या सादर केली आहे. लेथ जोशी यांच्या आईच्या भूमिकेत असलेल्या सेवा चौहान तर विशेष लक्षात राहातात. या चित्रपटाचा वेग हा फारच संथ असला तरी हा चित्रपट कुठेच कंटाळवाणा वाटत नाही.
या चित्रपटात अनेक गोष्टी दिग्दर्शकाने उलगडून सांगितलेल्या नाहीत. पण चित्रपट पाहाताना एक प्रेक्षक म्हणून त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उलगडतात, हेच या चित्रपटाचे यश आहे. तसेच चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये संवाद नाहीयेत. पण तरीही कलाकारांच्या देहबोलीतून, एकंदर वातावरणातून दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे हे आपल्याला लगेचच कळते. चित्रपटाचे पार्श्वसंगीत, सिनेमेटॉग्राफी देखील मस्त जमून आली आहे. केवळ चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये काहीशा त्रुटी जाणवतात. एकंदरीत हा लेथ जोशी प्रेक्षकांना नक्कीच भावतो.