ज्ञान-विज्ञानाचा एके ठायी मेळ! कसा आहे अशोक सराफ-माधव अभ्यंकर यांचा 'लाईफलाईन' सिनेमा?
By संजय घावरे | Published: August 2, 2024 01:17 PM2024-08-02T13:17:57+5:302024-08-02T13:18:44+5:30
अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असलेला लाईफलाईन सिनेमा आज रिलीज झालाय. वाचा review (lifeline)
या चित्रपटाची सुरुवात चुकवल्यास शेवट समजणार नाही. मनुष्य देह नश्वर आहे हे त्रिवार सत्य आहे, पण या नश्वर देहातील काही अवयवांना मृत्यूपश्चातही अमर करण्याची शक्ती आधुनिक विज्ञानाने मानवाला दिली आहे. अवयवदान हे अत्यंत श्रेष्ठ दान असून, मृत्यूपश्चातही इतरांच्या रूपात जीवंत राहण्याचा मंत्र या चित्रपटात साहिल शिरवईकर यांनी मांडला आहे.
कथानक : कर्मठ, अहंकारी, इतरांना तुच्छ मानणारे किरवंत पंडीत केदारनाथ अग्निहोत्री यांची ही कथा आहे. अवयवदान करून मृत्यूपश्चातही कसं जीवंत राहता येऊ शकतं याबाबत जनजागृती करत अवयव प्रत्यारोपण करून अनेकांना जीवदान देणारे डॅा. विक्रम देसाई हे या गोष्टीची दुसरी बाजू आहेत. लोकांनी देहदान केल्यास आपल्या उद्योगावर गदा येईल या भीतीपोटी केदारनाथ अवयवदानाला विरोध करत असतात. यासाठी ते देसाईंवर वाईट आरोप करतात, पण नियतीच त्यांच्या विरोधात उभी ठाकते आणि त्यानंतर जे घडतं ते सिनेमात पाहायला मिळतं.
लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची सुरुवात आणि शेवट यांचा सुरेख मेळ घालण्यात आला आहे. मध्यंतराच्या काळात पटकथेच्या रूपात जे समोर येतं ते विचार करायला लावतं. संवाद खूपच अर्थपूर्ण आहेत. ब्रेन डेड झालेल्या एका व्यक्तीने अवयवदान केल्यास आठ लोकांचे प्राण वाचू शकतात हे सत्य स्वीकारायला हवं. निसर्गाने मानवाला दिलेली भेट मानवाला देण्यातच मोठेपण आहे, हा विचार सर्वदूर पोहोचवण्याचं काम हा चित्रपटा करणार आहे. सिनेमाची गती काहीशी संथ आहे. काही दृश्ये थोडी लाऊड वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करता येतं. 'होत्याचं नव्हतं झालं...' हे गाणं चांगलं झालं आहे.
अभिनय : माधव अभ्यंकर यांनी अहंकारी किरवंत आणि हतबल पिता या एकाच व्यक्तिरेखेच्या दोन बाजू अफलातून अभिनयाद्वारे सादर केल्या आहेत. अशोक सराफ यांनी आपल्या स्वभावाला साजेसा उदारमतवादी डॅाक्टर अगदी सहजपणे साकारला आहे. त्यांच्या मुखातील संवाद खूप मार्मिक आहेत. संध्या कुटे यांनीही किरवंताची पत्नी आणि मुलाची आई सुरेखरीत्या रंगवली आहे. छोट्याशा भूमिकेतील हेमांगी कवीचा अभिनय मनाला भिडतो. जयवंत वाडकरांच्या रूपातील भातखंडे आणि भरत दाभोळकरांनी साकारलेला डॅा. घोसालियाही चांगला झाला आहे. शर्मिला शिंदे आणि शुश्रुत मंकणी यांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, वातावरण निर्मिती
नकारात्मक बाजू : सिनेमाची गती, काही दृश्यांतील तोचतोचपणा
थोडक्यात काय तर इतर मसालापटांसारखा हा धमाल चित्रपट नसून, वास्तव चित्र दाखवत मनाला चटका लावणारा आहे. दान द्यायला शिकवणारा हा चित्रपट वेळ काढून बघायला हवा.