Aani Kay Hava ? 3 Web Series Review : थोडं आंबट, थोडं गोड आयुष्यासाठी 'आणि काय हवं?'
By तेजल गावडे | Published: August 6, 2021 04:28 PM2021-08-06T16:28:50+5:302023-08-08T20:27:58+5:30
दोन सीझननंतर आता 'आणि काय हवं?' वेबसीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत आपल्या भेटीला आले आहेत.
- तेजल गावडे.
सध्या बरेच जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे तो वेळ सोडला तर प्रत्येकजण विरंगुळ्यासाठी चांगल्या सिनेमा किंवा सीरिजच्या शोधात असतात. अशावेळी साकेत आणि जुही या गोड जोडप्याची 'आणि काय हवं?' ही वेबसीरिज एमएक्स प्लेअरवर उपलब्ध आहे. दोन सीझननंतर आता 'आणि काय हवं?' वेबसीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत आपल्या भेटीला आले आहेत.
'आणि काय हवं ?' ही कथा आहे एका जोडप्याची, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यांची, आणि त्यातून मार्ग आणि आनंद शोधणाऱ्या जीवन साथीदारांची. पहिल्या सीझनमध्ये नवीन घर आणि कार आहे, आईच्या हातच्या स्वयंपाकाचे कौतुक आहे, दररोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात लागणारा ब्रेक आहे, वाढत्या वजनाच्या चर्चा आहेत. तर दुसऱ्या सीझनमध्ये जुई आणि साकेतच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाल्याचे दाखवले आहे. प्रोफेशनल लाइफ, घर आणि संसार सांभाळणे हे केवळ एका महिलेचीच नाही तर ती दोघांची जबाबदारी आहे. हा हल्लीच्या बऱ्याच तरुण जोडप्यांचा दृष्टीकोन या भागात पहायला मिळाला. 'आणि काय हवं?;च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझननंतर प्रेक्षक तिसऱ्या सीझनची उत्सुकतने वाट पाहत होते आणि अखेर सहा एपिसोड असलेला तिसरा सीझन भेटीला आला आहे.
'आणि काय हवं?'च्या तिसऱ्या सीझनमध्ये जुई आणि साकेतच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाल्याचे दाखवले आहे. यात देशात आलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनचा काळ पहायला मिळतो. इतर घरांमध्ये जोडप्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद, थट्टा मस्करी आणि मस्ती पहायला मिळते. तसेच या सीझनमध्ये जुई आणि साकेतचे नाते आणखी घट्ट झाल्याचे पहायला मिळते. एकमेकांमध्ये संवाद ठेवणे, एकमेकांना समजून घेणे. इतकेच नाही तर एकमेकांच्या आवडी निवडीच्या गोष्टींमध्ये सहभागी होणे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे आणि ते क्षण एकत्रित जगणे. नात्याचे महत्त्व आणि केलेल्या चुकीची जाणीव नकळतपणे करून देणे. तसेच धावपळीच्या युगात जोडप्यांनी आपले नाते आणखी फुलवण्यासाठी काय केले पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव हा सीझन पाहताना होते.
थोडी आंबट, थोडी गोड असलेल्या साकेत आणि जुईच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक प्रसंगांशी आपण जोडले जातो, हीच 'आणि काय हवं' या सीरिजची खासियत आहे. त्याचे सर्व श्रेय लेखक आणि दिग्दर्शक वरूण नार्वेकरला जाते. कथा, प्रसंग, संवाद ही या सीरिजच्या जमेची बाजू आहे. फक्त आधीचे दोन सीझन जास्त गोड होते, असंही राहून-राहून वाटतं. शेवट आणखी थोडा रंजक करायला हवा होता. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी साकेत व जुईची भूमिका चोख बजावली आहे, त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यामुळे साकेत आणि जुई या आपलेसे वाटणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यातील हा पुढचा टप्पा एकदा तरी नक्की पाहा.