Looose Control Movie Review : कथेत दम नसलेला लूज कंट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 12:41 PM2018-02-22T12:41:21+5:302023-08-08T20:27:58+5:30
बॉलिवूडमध्ये आजवर आपल्याला अनेक अॅडल्ट कॉमेडी चित्रपट पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली आहे. बॉलिवूडच्या तुलनेत मराठीत आपल्याला खूपच कमी अॅडल्ट कॉमेडी चित्रपट पाहायला मिळतात. लूज कंट्रोल हा अॅडल्ट कॉमेडी चित्रपट या जॉनरचा चित्रपट आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मित्रांच्या मस्तीची ही गोष्ट आहे.
बॉलिवूडमध्ये आजवर आपल्याला अनेक अॅडल्ट कॉमेडी चित्रपट पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली आहे. बॉलिवूडच्या तुलनेत मराठीत आपल्याला खूपच कमी अॅडल्ट कॉमेडी चित्रपट पाहायला मिळतात. लूज कंट्रोल हा अॅडल्ट कॉमेडी चित्रपट या जॉनरचा चित्रपट आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मित्रांच्या मस्तीची ही गोष्ट आहे.
अमोल (अक्षय म्हात्रे), जग्गू (मनमीत पेम) आणि पिनाक (शशिकांत केरकर) हे इंजिनिअरिंगला शिकणारे विद्यार्थी. आपण परीक्षेत पास होणार नाही याची त्या तिघांनाही खात्री असते. त्यासाठी ते रॉकी (कुशल बद्रिके)ची मदत घ्यायला जातात. पण रॉकी त्यांना मदत करण्यासाठी पैशांची मागणी करतो. पैसे कुठून आणायचा हा त्यांना प्रश्न पडलेला असतो. ते दत्ताभाऊ (शशांक शेंडे) या बार चालवणाऱ्या माणसाकडे मदत मागायला जातात. पण या तिघांची लबाडी दत्ताभाऊंच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांना पैसे देण्यास नकार देतात. त्यामुळे आता पैसे कुठून आणायचे या चिंतेत ते असतात. त्यावेळी रॉकी त्यांना पैसे कमवण्यासाठी एखाद्या मुलीसोबत तुमचा एमएमएस बनवून द्या असे सांगतो. त्यामुळे ते ३१ डिसेंबरच्या रात्री एमएमएस बनवण्याचे ठरवतात. पार्टीची तयारी करतात आणि पार्टीला अमोल त्याची प्रेयसी कोमल (मधुरा नाईक)ला आपल्या घरी बोलवतो. तसेच सुशीला (नम्रता आवटे)ला पिनाक तर सोना(नम्रता कदम) ला जग्गू बोलावतो. पण ऐनवेळी कोमल, सुशीला, सोना येतच नाहीत. त्यामुळे ते ज्यूली (आरती सोलंकी) या वेश्येला बोलवतात तर दुसरीकडे बार चालवणाऱ्या दत्ताभाऊ (शशांक शेंडे)ला पोलिसांनी पकडलेले असते. तो पोलिसांना चकवा देत पळ काढतो. त्याला पकडण्याची जबाबदारी रास्कर (भालचंद्र कदम) वर सोपवण्यात येते. हा दत्ताभाऊ देखील अमोलच्याच घरी घुसतो आणि त्यानंतर रात्रभर त्यांच्या घरात जी काही धमाल होते ती प्रेक्षकांना लूज कंट्रोल या चित्रपटात पाहायला मिळते.
लूज कंट्रोल या चित्रपटाची कथा मध्यांतरापर्यंत चांगली आहे. पण नंतर ही कथा पूर्णपणे भरकटली आहे. या चित्रपटाचे संवाद देखील प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण मध्यांतरांनंतर चित्रपट इतका ताणला आहे की, तो संपणार कधी असा प्रश्न आपल्याला पडतो. तसेच अॅडल्ट कॉमेडी सोडून व्यसनमुक्तीवर हा चित्रपट धडे देऊ लागतो. मनमीत पेम, अक्षय म्हात्रे, शशिकांत केरकर, शशांक शेंडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, शशांक शेंडे, आरती सोलंकी यांनी आपल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. पण चित्रपटाच्या कथेतच दम नसल्याने चित्रपट प्रचंड कंटाळवाणा वाटतो. तसेच चित्रपटातील कोणतीच गाणी चित्रपट संपल्यानंतर लक्षात राहात नाहीत.