Malal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी

By अजय परचुरे | Published: July 5, 2019 03:06 PM2019-07-05T15:06:16+5:302023-08-08T20:27:58+5:30

संजय लीला भन्साळींनी निर्माण केलेल्या सिनेमातील प्रेमकहाण्याही तितक्याच लाजवाब आणि प्रेक्षकांना पसंत पडलेल्या आहेत. या सगळ्याला कुठेसा छेद भन्साळींच्या मलाल सिनेमातून मिळाला आहे.

Malal Film Review | Malal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी

Malal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी

ठळक मुद्देदोन नवीन फ्रेश चेहरे जरी सिनेमात असले तरी भन्साळी,हडवळे यांची छाप काही मलालमधून उमटत नाही.मलाल हा सिनेमा तामिळमध्ये सुपरहिट झालेला ७ जी रेनबो कॉलनीचा रिमेक आहे.
Release Date: July 05,2019Language: हिंदी
Cast: शर्मिन सहगल, मीजान जाफरी, समीर धर्माधिकारी,चिन्मयी सुमित
Producer: टी सीरीज आणि भंसाळी प्रोडक्शन Director: मंगेश हडवळे
Duration: 2 तास 16 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

अजय परचुरे 

संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधले एक प्रतिभावंत निर्माता-दिग्दर्शक . भन्साळींच्या सिनेमात भव्य सेट्स, श्रवणीय संगीत अशी लयलूटच असतं. सिनेमात सगळं कसं भरजरीच. भन्साळींनी निर्माण केलेल्या सिनेमातील प्रेमकहाण्याही तितक्याच लाजवाब आणि प्रेक्षकांना पसंत पडलेल्या आहेत. या सगळ्याला कुठेसा छेद भन्साळींच्या मलाल सिनेमातून मिळाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या टिंग्या सिनेमाचा दिग्दर्शक मंगेश हडवळेने जरी मलालचं दिग्दर्शन केलं असलं तरी सिनेमावर भन्साळींची छाप पदोपदी दिसत राहते. दोन नवीन फ्रेश चेहरे जरी सिनेमात असले तरी भन्साळी,हडवळे यांची छाप काही मलालमधून उमटत नाही. आणि ही प्रेमकहाणी तितकी काही प्रभावी वाटत नाही. 

मलाल हा सिनेमा तामिळमध्ये सुपरहिट झालेला ७ जी रेनबो कॉलनीचा रिमेक आहे. मलाल सिनेमातून मीजान आणि शर्मिन सहगल ही नवीन जोडी बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. मीजान हा अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा असून शर्मिन सहगल ही खुद्द संजय लीला भन्साळींची भाची आहे. मलालची कहाणी ही ९० च्या दशकातली आहे. मुंबईच्या आंबेवाडी चाळीत मध्यवर्गीय वस्तीत राहणारा शिवा (मीजान जाफरी) हा टवाळखोर मुलगा . नोकरीधंदा काहीही न करता दिवसभर आपल्या मित्रमंडळींमध्ये रमणारा हा पठठ्या, नोकरीधंदा नसल्याने आपल्या बापाच्या सतत शिव्या खाणारा. हयाच चाळीत काही दिवसांनी आस्था त्रिपाठी (शर्मिन सहगल) आपल्या कुटुंबियांसोबत राहायला येते. आस्थाच्या वडिलांना शेअर बाजारात झालेल्या नुकसानामुळे चाळीत राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. आस्था कॉलेजमध्ये शिकणारी हुशार,सुसंस्कृत मुलगी तर त्याउलट व्यसनं करणारा, टपोरीगिरी करणारा शिवा यांच्यात हळूहळू प्रेम फुलायला लागतं. शिवाचं वागणं,बोलणं आस्थाच्या घरी मुळातच मान्य नसतं आणि त्यामुळेच आस्थाचे आईवडिल तिचं लग्न दुसरीकडे जुळवतात. आणि मग आपलं हे प्रेम शिवा आणि आस्था मिळवू शकतात का ? त्याचं प्रेम खरंच फुलतं का ? ह्यांची उत्तरं तुम्हांला सिनेमागृहातच मिळतील. 
 

 

टिंग्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा दिग्दर्शक मंगेश हडवळेचा बॉलिवूडमधला मलाल हा सिनेमा म्हणजे खरंच एक मोठा क्षण होता. मंगेशने बऱ्याच अंशी सिनेमात मराठमोळं वातावरण ठेवून आपला टच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र निर्मात्याच्या खुर्चीत बसून संजय लीला भन्साळींना सिनेमात आपला भन्साळी टच देण्याचा मोह काही आवरलेला नाही. आणि तिथेच हा सिनेमा बऱ्याच अंशी फसलेला आहे. ९० च्या दशकातील प्रेमकहाणी जरी असली तरी अश्या डझनभर कहाण्या यापूर्वीच सिनेमातून भरमसाठ पध्दतीने आलेल्या आहेत त्यामुळे या कहाणीत फारसं काही नावीन्य दिसत नाही. भन्साळींनी आत्तापर्यंत आपल्या प्रेमकहाण्या या भव्य सेटस, भरजरी कपडे, अतिसुंदर लोकेशन्सवर घडवल्या आहेत. मात्र चाळीतील प्रेमकहाणी फुलवणं मलाल सिनेमातून हडवळे आणि भन्साळींना तितकसं जमलेलं नाही. भन्साळींच्या सिनेमाचं संगीत अत्यंत श्रवणीय असतं. मात्र सिनेमातील एकही गाणं सिनेमाला साजेसं झालेलं नसल्याने हा सिनेमा अजूनच फसल्यागत झाला आहे. 

मलाल सिनेमाचं आकर्षण आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जोडी मीजान जाफरी आणि शर्मिन सहगल ह्यांच्या अभिनयाबाबत खरंच उत्सुकता होती. मात्र अभिनय हे काही येरागबाळ्याचं काम नव्हे या उक्तीप्रमाणे या दोघांनाही अभिनयात खूप मोठी मजल मारायची गरज आहे. भन्साळींनी आपल्या भाचीला लाँच करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नसली तरी अभिनयातील कसर भन्साळींना काही भरून काढता आलेली नाही. मीजानचा रफ अ‍ॅण्ड टफ लूक जरी बरा वाटत असला तरी प्रेमात आकंठ बुडालेला शिवा साकारताना त्यातील अभिनयाचा अभाव मीजानच्या अभिनयातून पदोपदी जाणवत राहिला आहे.अभिनेत्री चिन्मयी सुमितने मलाल सिनेमात शिवाच्या आईची भूमिका साकारली आहे. तिचीच भूमिका काहीशी आश्वासक आणि उत्तम झाली आहे. बाकी सहकलाकारांनीही आपली योग्य ती साथ या सिनेमाला दिली आहे. एकूणच संगीत,अभिनय,दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर फसलेला मलाल जरी नाही पाहिलात तरी तुमच्या मनात असा फारसा मलाल राहणार नाही इतकं नक्की. 

 

Web Title: Malal Film Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.