Joram movie review: आदिवासींच्या जीवनाची मन सुन्न करणारी कथा
By संजय घावरे | Published: December 8, 2023 03:42 PM2023-12-08T15:42:15+5:302023-12-08T15:59:03+5:30
Joram movie review: देवाशीष मखीजा यांनी अत्यंत साधेपणाने, परंतु मनावर ठसा उमटवेल अशा शैलीत आदिवासींच्या जीवनाची सुन्न करणारी कथा सादर केली आहे.
वेब सिरीजमध्ये विविधांगी भूमिका यशस्वीपणे साकारत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या मनोज बाजपेयीच्या अनोख्या अभिनयशैलीसाठी हा चित्रपट पाहायला हवा. देवाशीष मखीजा यांनी अत्यंत साधेपणाने, परंतु मनावर ठसा उमटवेल अशा शैलीत आदिवासींच्या जीवनाची सुन्न करणारी कथा सादर केली आहे. मराठमोळ्या स्मिता तांबेने यात साकारलेली व्यक्तिरेखा स्मरणात राहणारी आहे.
कथानक : झारखंडमधील झिनपीडी गावात आदिवासी लोकगीत गात दसरू पत्नी वानोला झोका देत असतो. अचानक शांतता पसरते आणि दोघेही थेट मुंबईतील कन्स्ट्रक्शन साईटवर मजूरी करताना दिसतात. दोघांची तीन महिन्यांची मुलगी जोरम आहे. आदिवासी आमदार फुलो कर्मा साईटवर साडी आणि सोलर लाईट वाटण्यासाठी येते. तिथे तिला दसरू दिसतो. त्याच रात्री वानोची हत्या होते आणि जोरमला घेऊन दसरू तिथून पळ काढतो. पोलिस अधिकारी रत्नाकर बगुलकडे दसरूला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. दसरू माओवादी असल्याची व्हिडिओ क्लीप फुलो व्हायरल करते. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात आहे.
लेखन-दिग्दर्शन : आजही देशाच्या एखाद्या कोपऱ्यात विकासापासून खूप दूर असलेल्या आदिवासींना कशा प्रकारच्या नरकयातना भोगाव्या लागत आहेत याची झलक यात आहे. 'कोणती वर्दी कायदेशीर आणि कोणती बेकायदेशीर हे ठरवेपर्यंत आणखी शंभर वर्षे निघून जातील', यांसारखे काही संवाद विचार करायला लावणारे आहेत. चित्रपटातील झारखंडमधील गाव केवळ प्रातिनिधीक आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील चित्रही यापेक्षा वेगळे नाही. आदिवासींचे जीवन, विकासाच्या नावाखाली त्यांची होणारी गळचेपी, त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून न घेणे, राजकीय दंडुकेशाही, पोलिस यंत्रणेचा दबाव आणि या सर्वांमध्ये दसरू तसेच जोरमसारख्या असंख्य आदिवासींचे उद्ध्वस्त होणारे जीवन या चित्रपटाचं आहे. वास्तवदर्शी चित्रण, हृदयाला भिडणारा अभिनय आणि सुन्न करणारी कथा या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. चित्रपट आणखी गतीमान आणि शेवट थोडा आणखी स्पष्ट असायला हवा होता.
अभिनय : पुन्हा एकदा जुन्या मनोज बाजपेयीचं दर्शन या चित्रपटात घडतं. मनोजने साकारलेला दसरू आजवरच्या भूमिकांपेक्षा अतिशय भिन्न असून, त्यासाठी घेतलेली मेहनत चित्रपट पाहताना जाणवते. स्मिता तांबेला खूप मोठा ब्रेक मिळाला असून, तिने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. डोळ्यांच्या माध्यमातून तिने केलेला अभिनय पाहण्याजोगा आहे. वरिष्ठांच्या दबावापुढेही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका मोहम्मद झिशान अयूबने यशस्वीपणे साकारली आहे. तनिष्ठा चॅटर्जीनेही चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : कथानक, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, वातावरणनिर्मिती
नकारात्मक बाजू : मनोरंजनपर मसाल्यांचा अभाव, चित्रपटाची गती
थोडक्यात काय तर मसालेपटांच्या चाहत्यांना हा चित्रपट आवडणारा नसला तरी आपलेच समाजबांधव आजही कोणत्या परिस्थितीत जीवन जगत आहेत याची झलक दाखवणारा हा चित्रपट एकदा पाहायला हवा.