Mardani 2 Film Review: पुरूषी अहंकाराला मोडून काढणारी 'मर्दानी'
By अजय परचुरे | Published: December 14, 2019 01:26 PM2019-12-14T13:26:09+5:302023-08-08T20:38:18+5:30
राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयाने गाजलेल्या मर्दानीच्या पहिल्या भागानंतर मर्दानी 2 ही तितकाच बहारदार सिनेमा झाला आहे.
सध्या भारतात नुकतंच हैदराबाद आणि उन्नावमधल्या बलात्काराच्या घटना ताज्या असताना मर्दानी २ सारखा सिनेमा येणं अत्यंत गरजेचं होतं. समाजात वाढत असलेलं पुरूष प्रधान संस्कृतीचं भय तसंच बलात्कार करणाऱ्या नराधम व्यक्तीची सायकॉलॉजिक मानसिकता यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे भारतीय महिला या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात याचा डंका मिरवायचा आणि दुसरीकडे त्याच भारतीय समाजात अश्या घटना सर्रास घडताना पाहून महिलावर्ग खरंच या सगळ्यामध्ये पुरूषांच्या या मानसिकतेमुळे या समाजात सुरक्षित राहू शकतात का ? यावर आता एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय या सर्वांवर अतिशय उत्तमपणे बोट ठेवणारा सिनेमा म्हणजे मर्दानी २ .. राणी मुखर्जीच्या तेजतर्रार अभिनयाने मर्दानी २ हा सिनेमा नक्कीच वाखाण्याजोगा झाला आहे. या सिनेमाची कथा पहिल्या भागातील मर्दानीसारखीच तगडी आहे. आईपीएस अधिकारी शिवानी रॉय (राणी मुखर्जी) आता मुंबईमधून बदली होऊन राजस्थानमधील कोटा शहरात आली आहे. कोटा हे शहर आयआयटीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हब आहे. शहरात पोहचताच शिवानी रॉयसमोर एक अत्यंत क्रूरपणे केलेल्या बलात्काराची केस येते. एक तरूण मुलगा सनी (विशाल जेठवा) जो मानसिकरित्या विकृत असतो. या विकृतीमुळेच तो अत्यंत विकृत पध्दतीने आपलं काम करत असतो. कोटा शहरात धुमाकुळ माजवलेल्या या सनीला पकडण्याचं काम शिवानी रॉय आणि तिच्या टीमवर येऊन पडतं. जंग जंग पछाडूनही शिवानी रॉय आणि तिच्या टीमच्या हाती विकृत सनी काही लागत नाही. चोर-पोलिसांच्या या खेळात सनी जिंकतो की शिवानी रॉय अनेक अडचणींना सामोरं जाऊन या विकृतीचा समूळ नायनाट करते हे बघणं फारच रंजक आहे.
मर्दानी २ ही अत्यंत डार्क फिल्म आहे. कोणत्याती सस्पेन्स सिनेमामध्ये एडिटिंग त्याचं पार्श्वसंगीत, अचूक दिग्दर्शन आणि कलाकारांची उत्तम केमिस्ट्री या अत्यंत महत्वाच्या बाबी असतात. या बाबी जर व्यवस्थित जुळुन आल्या तरच हा सिनेमा उत्तम होतो. या सिनेमाचा दिग्दर्शक गोपी पूथरनने या सिनेमाचा स्क्रीनप्ले आणि संवादही लिहिले आहेत. पावणे २ तासाच्या या सिनेमात गोपीची कुठेही सिनेमावरून पकड ढिली झालेली नाही. सिनेमाचा क्लायमॅक्स हा अत्यंत उत्कंठावर्धक झाला आहे. सनी आणि शिवानी रॉय यांचे सीन्स अत्यंत उत्तमरित्या बांधले गेलेले आहेत. सिनेमात कोणतंही गाणं नाहीये कारण मुळातच सिनेमाच्या कथेला त्याची मुळात गरज नाहीये. त्यामुळे दिग्दर्शक मांडत असलेली कथा अत्यंत उत्तमरित्या आणि सहजसोप्या पध्दतीने प्रेक्षकांसमोर पोहचते हे मर्दानी २ चं वैशिष्ठ्य आहे.
मर्दानी २ चे दोन हिरो आहेत एक राणी मुखर्जी आणि विशाल जेठवा. मर्दानीच्या आधीच्या भागात मुंबईतील एका बहादुर महिला पोलिस अधिकाºयाची भूमिका राणीने अत्यंत उत्तम साकारली होती. मर्दानी २ मध्ये त्याच्या थोडं पुढे जाऊन राणीने करारी आयपीएस अधिकारी साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत पदोपदी जाणवते. सिनेमात अत्यंत विकृत भूमिका साकारणारा विशाल जेठवा याने खरी बाजी मारली आहे. विकृतीचा कळस गाठणारा सनी ही अत्यंत निगेटीव्ह भूमिका विकासने करिअरच्या सुरवातीलाच इतक्या समजुतीने भूमिका साकारणं निव्वळ कौतुकास्पद आहे. बाकी विक्रम सिंह चौहान,राजेश शर्मा,श्रुती बापना,सुधांशु पांडे या सहकलाकारांनी आपल्या भूमिका चोख केल्या आहेत. सिनेमा जरी डार्क असला तरी सध्या समाजात महिलांविरोधात सुरू असलेल्या क्रूर गोष्टींना सणसणीत चपराक देण्यासाठी हा सिनेमा एक उत्तम पर्याय आहे. राणी मुखर्जी आणि विशाल जेठवा यांच्या उत्तम अदाकारीसाठी मर्दानी २ हा पाहायलाच हवा.