maska marathi movie review : प्रेक्षकांना मस्का मारणारा मस्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 11:59 AM2018-05-31T11:59:51+5:302023-08-08T19:47:32+5:30
प्रार्थना बेहरे, शशांक शेंडे, प्रणव रावराणे, अनिकेत विश्वासराव आणि चिन्मय मांडलेकर यांच्या मस्का या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
मस्का हा चित्रपट पाहात असताना आपण रोलरकोस्टर राइडमध्ये बसल्यासारखेच आपल्याला वाटते. कारण राइडमध्ये बसल्यावर कसे आपल्याला अनपेक्षित धक्के मिळतात, तसेच हा चित्रपट पाहाताना आपल्याला हे धक्के बसतात. चित्रपटाच्या पहिल्या मिनिटापासूनच चित्रपटात आपल्याला अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळतात.
माया (प्रार्थना बेहरे), यादव (शशांक शेंडे) आणि चिकू (प्रणव रावराणे) हे तिघे मिळून लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळत असतात. चिकू हा यादव आणि माया यांचा मुलगा असून तो गतीमंदचा असल्याचे ते सगळ्यांना सांगत असतात. एखाद्याला फसवायचे आणि त्या परिसरातून पळ काढायचा आणि नवीन बकरा पकडायचा हा त्यांचा जणू व्यवसायच असतो. माया ही हे उलटेसुलटे धंदे करण्यासोबतच एका ठिकाणी नोकरी देखील करत असते. तिथे हर्ष वर्मा (अनिकेत विश्वासराव) तिचा नवा बॉस म्हणून येतो. हर्षकडे प्रचंड पैसा असतो. त्यामुळे आता त्याला फसवायचे आणि पैसे उकळायचे असे माया, यादव आणि चिकू मिळून ठरवतात. हर्ष नकळतपणे त्यांच्या जाळ्यात ओढला देखील जातो. पण त्याची भेट परितोष जैन (चिन्मय मांडलेकर)शी होते आणि त्याच्या आयुष्यात एक नवीनच वादळ येते. माया, यादव आणि चिकू हे हर्षला फसवतात का? या सगळ्यातून हर्ष कसा बाहेर पडतो? परितोष हा कोण आहे या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.
मस्का या चित्रपटाची कथा खूपच छान असून ती दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने खूप चांगल्याप्रकारे मांडली आहे. प्रियदर्शनने पहिल्याच चित्रपटात सिक्सर मारला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटात शशांक शेंडे, प्रणव रावराणे, प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्वासराव यांनी चांगली काम केली आहेत. पण चित्रपटात आपल्याला सगळ्यात जास्त लक्षात राहातो तो म्हणजे चिन्मय मांडलेकर. आजवर प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेला चिन्मय या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो. चिन्मय एक चांगला विनोदी अभिनेता देखील आहे हे त्याने या चित्रपटात सिद्ध करून दाखवले आहे. अनिकेत आणि चिन्मयवर चित्रीत केलेले अनेक प्रसंग आपल्याला खळखळून हसवतात. पण माया, चिकू आणि यादव यांची कोणतीच पार्श्वभूमी चित्रपटात दाखवली नसल्याने त्यांच्या व्यक्तिरेखा तितक्याशा स्पष्ट होत नाहीत. तसेच चित्रपटातील गाणी ओठावर रुळत नाही. मस्का हा मराठी चित्रपट असला तरी या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा या अमराठी नावाच्या का दाखवण्यात आल्या आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो. पण एक निखळ मनोरंजन देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा शेवट तर तुम्हाला एक चांगलाच धक्का देतो. त्यामुळे खळखळून हसण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहा...