Miranda House Marathi Movie Review : प्रभावी रहस्यपट ठरू न शकलेला 'मिरांडा हाऊस'
By अजय परचुरे | Published: April 19, 2019 01:06 PM2019-04-19T13:06:14+5:302023-08-08T19:47:32+5:30
सिनेमाची संपूर्ण कथा ही गोव्यात घडते. रहस्यमयपट सिनेमा असल्यामुळे कथेतील गुपित तशीच ठेवावी लागतात.
- अजय परचुरे
मराठीत मुळातच फार कमी रहस्यपट येतात. काही रहस्यमयपट सिनेमे हे त्याच्या ट्रेलरवरून फारच उत्कंठावर्धक वाटतात. मात्र मुळात सिनेमा पाहताना हे उत्कंठा ,रहस्य कथेत उतरलं नाही तर सिनेमाचा डोलारा कोसळतो. हे यापूर्वी अनेकदा मराठी रहस्यमय सिनेमांमध्ये दिसून आलं आहे. कलकार जरी तगडे असले तरी कथेत नावीन्य नसेल तर रहस्य समूजनही त्याची तितकी मजा प्रेक्षकांना येत नाही आणि तेच काहीसं मिरांडा हाऊस या सिनेमाबाबत झालंय. तांत्रिकदृष्ट्या उत्तम असलेला हा सिनेमा कथेच्या बाबतीत अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने दिग्दर्शक राजेंद्र तालक यांचा हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरू शकला नाही.
सिनेमाची संपूर्ण कथा ही गोव्यात घडते. रहस्यमयपट सिनेमा असल्यामुळे कथेतील गुपित तशीच ठेवावी लागतात. मात्र येथे मिरांडा हाऊस नावाचा बंगला आणि त्याभोवती असलेलं एक गूढ याचा शोध सुरू आहे. पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत एका घटनेमुळे एकत्र भेटतात.त्यांना ज्या गोष्टीची उकल करायची आहे ती गोष्ट एकच असल्याने दोघेही मिळून त्या गोष्टीचा आपआपल्यापरीने शोध घेतात. मिलिंद गुणाजी हा मिरांडा हाऊस बंगल्याचा मालक आणि या गूढ रहस्याचा केंद्रबिंदू आहे. नेमका हा पल्लवी आणि साईंकितचा शोध मिलिंद गुणाजीपर्यंत येऊन पोहचतो का ? ज्या रहस्याची उकल करण्यासाठी पल्लवी आणि साईंकित प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात त्याची उकल होते का ? का त्यात ते अयशस्वी होतात हे मिरांडा हाऊसचे सार आहे.
अ रेनी डे ,सावरिया डॉट कॉम या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे राजेंद्र तालक यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे आणि दिर्ग्दशन केलं आहे. मुळात कथानक मांडण्यासाठी गोव्याची केलेली निवड, कलाकारांची निवड , तांत्रिक बाजू या जरी उत्तम असल्या तरी कथानक थोडं कच्च वाटतं. सिनेमा पहिल्या काही मिनिटांत खूप संथ झाला आहे. खूप वेळ एकाच ठिकाणी घडलेल्या सीनमध्ये अनेक प्रश्नांची मुळातच उकल होत नाही . त्यामुळे सिनेमा काही ठिकाणी कथानक सोडून बोलू लागतोय काय असं वाटत राहतं. मात्र या सिनेमाचं टेकिंग फारच उत्तम झालंय. ऑस्कर विजेत्या रेसूल पुकट्टी आणि अम्रित प्रीतम दत्ता यांचं पार्श्वसंगीत ह्या रहस्यमयपटाची उत्कंठा वाढवते. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीतही नेहमीसारखं उत्तम झालं आहे.
या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील कलाकार. मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत यांच्यासारखे कसलेले कलाकार या सिनेमात आहेत. मुळात मिलिंद गुणाजी खूप दिवसांनी मराठी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांचा भारदस्त आवाज हा नेहमीच ऐकावासा वाटतो. त्यांनी त्यांची भूमिकाही चोख वठवली आहे. पल्लवी सुभाषचाही बºयाच कालावधीनंतर मराठी सिनेमा आला आहे. पल्लवीनेही तिच्या डोळ्यातील आणि चेहºयावरील अविर्भावावरून सुंदर अभिनय केला आहे. या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला साईंकित कामत नावाचा एक चांगला अभिनेता मिळाला आहे. पहिला सिनेमा असूनही साईंकितने आपल्या प्रभावी अभिनयाने लक्ष वेधून घेतलं आहे. कलाकारांच्या कामगिरीवर मात्र कथानकाने पाणी फिरवलं आहे. सिनेमा फक्त दीड तासाचा आहे. मात्र कथेतील त्रुटींमुळे काही वेळानंतर या सिनेमातील एक संथपणा जाणवू लागतो. सिनेमाची तांत्रिक अंग जरी उत्तम असली तरी हा सिनेमा आवश्यक तो परिणाम साधू शकलेला नाही इतकं नक्की.