Mission Mangal Movie Review : स्वप्न सत्यात उतरवणारं 'मिशन मंगल'
By तेजल गावडे | Published: August 16, 2019 05:32 PM2019-08-16T17:32:18+5:302023-08-08T20:09:54+5:30
'मिशन मंगल' हा चित्रपट भारताच्या मंगळ मोहिमेची विजयगाथा सांगणारा आहे.
- तेजल गावडे
स्वातंत्र्य दिनादिवशी अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट 'मिशन मंगल' प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट भारताच्या मंगळ मोहिमेची विजयगाथा सांगणारा आहे. २४, सप्टेंबर, २०१४ साली इस्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळावर यशस्वीपणे यान पाठवून पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये मोहिम फत्ते करणारी जगातील पहिली संस्था होण्याचा मान मिळवला.
'मिशन मंगल' चित्रपटाचे कथानक मंगळ मोहिमेवर रेखाटण्यात आलं आहे. वैज्ञानिक तारा शिंदे (विद्या बालन), वरिष्ठ वैज्ञानिक राकेश धवन (अक्षय कुमार) यांचं चित्रपटाच्या सुरुवातीला ‘जीएसएलव्ही’चं प्रक्षेपण अयशस्वी ठरतं. या अपयशी मिशनची जबाबदारी राकेश स्वत:वर घेतो. मिशन अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होते. पण राकेश अपयशानं खचून जात नाही. त्यात तारा राकेशला मंगळ मोहिम यशस्वी करू शकतो, याची कल्पना सांगते आणि मग सुरू होतो मॉम म्हणजेच मिशन मंगळचा प्रवास. सुरूवातीला या मिशनसाठी परवानगी मिळत नाही. मात्र त्यांच्या हट्टाहासापुढे वरिष्ठही नमतं घेतात. मिशनला परवानगी तर मिळते मात्र अंतर्गत राजकारणाचा त्यांना फटका बसतो. मिशन यशस्वी होऊ नये यासाठी त्यांना ऐका गांधी (सोनाक्षी सिन्हा), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्लई (नित्या मेनन), नेहा सिद्दीकी (कीर्ति कुल्हारी), परमेश्वर नायडू (शर्मन जोशी), अनंत अय्यर (एच.जी.दत्तात्रेय) असे कमी अनुभवी लोक दिले जातात. तरीदेखील तारा व राकेश मंगळावर स्वारी करण्याचं स्वप्न कशारितीने सत्यात उतरवतात, हे मनोरंजक पद्धतीनं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
'मिशन मंगल' चित्रपटाचा विषय सायंटीफिक रिसर्चवर आधारीत असला तरी मनोरंजक पद्धतीनं सादर करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. पटकथा लेखनाबद्दल सांगायचं तर मंगळावर सॅटेलाईट पाठवण्यासारख्या सायंटिफिक विषयावर लेखन करण्याचं आव्हान लेखकानं सक्षमपणे पेललं आहे. दिग्दर्शक जगन शक्तीने मल्टिस्टार चित्रपटात सर्व पात्रांना महत्त्व देत कोणत्याही भूमिकेवर अन्याय केला नाही. चित्रपटात दोन गाणी आहेत. जी सायंटिस्टवर चित्रीत केली गेली असली तरी चित्रपट पाहताना खटकत नाही.जगात अशक्य असं काहीच नाही असं या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं आहे.
मंगळ मोहिम यशस्वी करण्यात स्त्रियांचा खारीचा वाटा होता. त्यामुळे चित्रपटात अक्षय कुमार पेक्षा विद्या बालनच्या भूमिकेला जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. अक्षयने सायंटिस्टची भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. तर विद्याने गृहिणी व सायंटिस्ट अशा दुहेरी भूमिका सहज वठवून न्याय दिला आहे. या दोघां व्यतिरिक्त शर्मन जोशी,तपासी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, नित्या मेनन, एचजी दत्ताचार्य यांनी खूप चांगला अभिनय केला आहे. दलीप ताहील यांच्या वाटेला आलेल्या निगेटिव्ह भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. संजय कपूरने विद्या बालनच्या नवऱ्याची भूमिका साकारली असून भूमिकेची लांबी कमी असली तरी त्याची भूमिका लक्षात राहते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी इस्रोच्या चेअरमनची भूमिका उत्तमरित्या बजावली आहे. मंगळ मोहिमेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केलेला जिद्दी प्रवास अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा.