ong>प्राजक्ता चिटणीस गोलमाल या चित्रपटाचे आजवरचे सगळे भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत त्यामुळ गोलमाल अगेन या चित्रपटाकडून ही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पहिल्या सीन पासून हा चित्रपट आपल्याला खळखळून हसवतो.गोपाल (अजय देवगण), माधव (अर्शद वारसी), लक्ष्मण (श्रेयस तळपदे), लक्ष्मण (कुणाल खेमू) आणि लकी (तुषार कपूर) जमुनादास यांच्या आश्रमात राहात असतात. पण त्यांच्यात काही भांडणे होतात, ते खूप भांडतात म्हणून गोपाल आणि लक्ष्मण यांना एक दिवस आश्रमाच्या बाहेर राहायची जमुनदास (उदय टिकेकर) शिक्षा देतात. पण ते त्या दिवशी आश्रम सोडून निघून जातात. त्यानंतर काही दिवसांनी माधव, लक्ष्मण आणि लकी देखील आश्रम सोडतात. त्यांनी आश्रम सोडल्यावर खुशी त्यांना खूप मिस करते. खुशी ही बाळ असताना या पाच जणांनीच तिला आश्रमात आणलेले असते. पण नंतर तिला देखील एक कुटुंब दत्तक घेते. ते लहान असताना एका लायब्ररी मध्ये जात असतात. ही लायब्ररी आना (तब्बू) सांभाळत असते. आत्म्यांशी संवाद साधण्याची तिच्याकडे शक्ती असते.25 वर्षा नंतर हे पाच जण जमुनदास यांच्या तेराव्याला एकमेकांना भेटतात. त्यांच्यात आजही तितकीच भांडणे असतात. माधव, लकी, लक्ष्मण हे वसुली भाई (मुकेश तिवारी) तर लक्ष्मण आणि गोपाल बबली भाई (संजय मिश्रा) यांच्या साठी काम करत असतात. लोकांची घरे खाली करण्यासाठी ते काम करत असतात.जमुनदास यांच्या आश्रमाच्या बाजूला कर्नल (सचिन खेडेकर) यांचा बंगला असतो. जमुनदास यांच्या तेराव्या नंतर परतल्यावर लक्ष्मण च्या अंगात भूत शिरते त्यामुळे गोपाल आनाची मदत घेतो. आना त्यांना कर्नल च्या घरात काही दिवस राहण्याचा सल्ला देते. तर हे घर खाली करण्याची सुपारी माधव, लक्ष्मण आणि लकी ला मिळते आणि त्यामुळे ते देखील त्या घरात राहू लागतात. या घरावर रेड्डी (प्रकाश राज) याचा डोळा असतो. कर्नल च्या मुलीचे नुकतेच निधन झालेलं असते. त्यामुळे तो अस्थी विसर्जन साठी शहराच्या बाहेर जातात. त्यामुळे हे पाच जण, आना आणि त्या घरातील मोलकरीण दामिनी (परिणीती चोप्रा) त्या घरात राहायला लागतात. पण पपी भाई (जॉनी लिव्हर) ने सांगितलेल्या एका गोष्टीमुळे त्या घरात भूत असल्याचे या पाच जणांना कळते. त्यांना ही गोष्ट कळल्यावर काय होते, या चित्रपटात भूत कोण आहे हे सगळे पाहणे म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे.गोलमाल च्या आजवरच्या सगळ्या भागापेक्षा हा चित्रपट सगळ्यात चांगला आहे असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. रोहित शेट्टी ने खूपच चांगले दिग्दर्शन केले आहे. श्रेयस, अजय, तुषार यांच्या अंगात आत्मा गेल्यावर त्यांनी नाना पाटेकर सारखे संवाद बोलणे ते तर खूपच छान जमून आले आहे. श्रेयस, अजय, तुषार, अर्शद, कुणाल, तब्बू, परिणीती, प्रकाश राज आणि जॉनी लिव्हर यांचे त्यांच्या अभिनयासाठी करावे तितके कौतुक कमी आहे. संजय मिश्रा, मुकेश तिवारी, नील नितीन मुकेश, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, व्रजेश हिरजी यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. नाना पाटेकर यांच्या फॅन्सना तर या चित्रपटात खूप चांगले सरप्राइज मिळणार आहे.या चित्रपटात आपल्याला अजय च्या इश्क या चित्रपटाटील नींद चुरायी मेरी हे गाणे आणि मेंने प्यार किया या चित्रपटात तील मेंने प्यार किया ही आणि ऐकायला मिळतात. ही गाणी आपल्याला नॉस्टॅल्जिक बनवतात. गोलमाल अगेन मध्ये सस्पेनस राखण्याचा प्रयत्न रोहितने केला आहे. पण पहिल्या 10 मिनिटातच आपल्याला चित्रपटाची कथा काय आहे हे लक्षात येते. दिवाळीत रोहित शेट्टी ने गोलमाल अगेन चे खूप चांगले गिफ्ट लोकांना दिले आहे. चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा आस्वाद जरूर घ्या.
Web Title: Movie review: Smashing golmaal again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.