Haddi Review: तृतीयपंथीयाच्या भूमिकेतील नवाजुद्दीनच्या अभिनयाची कमाल! कसा आहे 'हड्डी' वाचा
By अबोली कुलकर्णी | Published: September 8, 2023 05:03 PM2023-09-08T17:03:00+5:302023-09-08T17:04:31+5:30
आत्तापर्यंत तृतीयपंथीयांच्या वेदनांवर अनेक सिनेमे आले. मात्र, ‘हड्डी’ची बातच न्यारी आहे.
>>अबोली शेलदरकर
‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘रमन राघव २’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांतून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) ही जोडी एकत्र पुढे आली. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘हड्डी’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलीय. मात्र, आता अनुराग कश्यप हा दिग्दर्शक नव्हे तर नवाजुद्दीनसमोर एक खलनायक म्हणून उभा राहिला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच नवाजुद्दीन हा तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसत आहे. आत्तापर्यंत तृतीयपंथीयांच्या वेदनांवर अनेक सिनेमे आले. मात्र, ‘हड्डी’ची बातच न्यारी आहे. चला तर मग बघूयात, नेमका कसा आहे हा चित्रपट ते.
कथानक
ही कथा आहे, अलाहाबाद येथे राहणाऱ्या तृतीयपंथी हड्डी (नवाजुद्दीन सिद्दिकी)ची. हड्डीला त्याचा परिवार आणि समाज नेहमी नाकारतो. समाज त्याला जिवंत राहू देत नाही. पण, मृत्यू त्याच्या नशिबात लिहिलेला नसतो. त्यामुळे मृत्यूच्या दारात असतानादेखील त्याचा जीव वाचतो. तेव्हा हड्डीला एक अम्मा (इला अरुण) ही आधार देते. अम्मा हड्डीला लहानाचे मोठे करते. त्याला चांगले शिक्षण देते. एक चांगली व्यक्ती बनण्याची त्याला शिकवण देते. अम्मा हड्डीचे आयुष्य रुळावर आणते. यासाठी हड्डीदेखील प्रचंड मेहनत करत असतो. हड्डी आणि अम्माच्या आयुष्यात प्रमोद अहलावत (अनुराग कश्यप)ची एंट्री होते. प्रमोद हा एक राजकीय व्यक्ती असतो. त्यानंतर चित्रपटाची कथा पूर्णपणे बदलते. प्रमोद हा अतिशय लाचार आणि मतलबी नेता असतो. तो त्याचा काळा धंदा चालवण्यासाठी नोएडासारख्या ठिकाणाला शांघाय बनवून टाकतो. प्रमोद अशा व्यक्तींपैकी एक आहे जो स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्याचा जीवदेखील घेऊ शकतो. हड्डी आणि प्रमोद यांचा जुना इतिहासदेखील आहे. आता प्रमोद हड्डीवर भारी पडतो की, हड्डी प्रमोदला चांगला धडा शिकवतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
लेखन व दिग्दर्शन
दिग्दर्शक अक्षत अजय शर्मा आणि अदम्या भल्ला यांचा हा चित्रपट गंभीर आणि किचकट विषयावर आधारित असून वेगळया पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडण्याचे धाडस दाखवले. हा चित्रपट हरवलेल्या मृतप्रेतांच्या अशा व्यापारावर प्रकाशझोत टाकतो, जे ऐकूनच आपला थरकाप उडेल. २ तास १४ मिनिटांच्या या चित्रपटात सुरूवातीच्या अर्ध्या तासापर्यंत कथानक समजायलाच थोडा वेळ जातो. दिग्दर्शकाने सस्पेन्स, थ्रिल दाखवण्यात यश मिळवले आहे. चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
अभिनय
या चित्रपटातून प्रेक्षकांना सहज अभिनय बघायला मिळेल. परंतु, तृतीयपंथीयांना मिळणारी वागणूक, त्यांच्या वेदना, त्रास या सर्वांवर चित्रपट आधारित असूनही ती भावना कुठेतरी हरवलेली दिसते. नवाजुद्दीन हा अत्यंत सहज आणि प्रामाणिक अभिनय करणारा अभिनेता आहे. या चित्रपटात त्याचा अभिनय काही वेगळाच वाटतो. याशिवाय इला अरूण, अनुराग कश्यप या दाेघांचीही ॲक्टिंग दमदार वाटते.
सकारात्मक बाजू: नवाजचा अभिनय, सस्पेन्स, थ्रिल, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू: भरकटलेला विषय
थोडक्यात : नवाजचा अभिनय बघण्यासाठी जरूर हा चित्रपट बघावाच.