Notebook Movie :काळजाला भिडणारी प्रेमकथा अन् संदेश
By सुवर्णा जैन | Published: March 29, 2019 02:30 PM2019-03-29T14:30:07+5:302023-08-08T19:47:32+5:30
नोटबुक हा चित्रपट २०१४ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या थाय चित्रपट टीचर्स डायरी या थाय चित्रपटाचं भाषांतर आहे.
सुवर्णा जैन
भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर… हे नंदनवन पाहण्यासाठी भारतातलेच नाही तर जगभरातले पर्यटक काश्मीरला भेट देतात. मात्र गेल्या काही वर्षांत काश्मीर खोरं अशांत झालंय. दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार यामुळे काश्मीरमधलं वातावरण बिघडलंय. इथली मुलं आणि तरुणांची माथी भडकावून हातात बंदूक थोपवली जात आहे. मात्र हेच मनसुबे उद्धवस्त करण्याचेही जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. याच प्रयत्नांना उद्देशून असलेली कथा म्हणजे नोटबुक हा चित्रपट. तरुण आणि मुला-मुलींच्या हातात बंदूक नाही तर पुस्तकं असायला हवी हाच या चित्रपटाचे कथेचा गाभा आहे. नोटबुक हा चित्रपट २०१४ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या थाय चित्रपट टीचर्स डायरी या थाय चित्रपटाचं भाषांतर आहे.
नोटबुक चित्रपटाची कथा काश्मीरच्या एका सरोवरामध्ये असलेल्या वुलर पब्लिक स्कूलची आहे. विना वीज तसंच पाणी आणि कोणतंही मोबाईल नेटवर्क नसताना इथं शाळा भरते. फिरदौस (प्रनुतन) घराघरात जाऊन मुला-मुलींना बोलावून शाळेत बसवते आणि शिकवते. मात्र काही दिवसांनंतर फिरदौस निघून जाते आणि तिच्या जागी कबीर (जहीर इक्बाल) हा नवीन शिक्षक रुजू होतो. फिरदौस जाण्याआधी विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तकांसह तिथं नोटबुक सोडून जाते. याच नोटबुकमध्ये फिरदौसच्या जीवनातील काही गोष्टी असतात. फिरदौसच्या जीवनाची कथा वाचून कबीर तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर फिरदौसही कबीरवर प्रेम करू लागते. न भेटता या दोघांची प्रेमकथा कशी फुलत जाते? हे दोघं भेटतात का?, त्यांची प्रेमकथा यशस्वी होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातून मिळतील.
काळजाला भिडणारी कथा आणि त्याहूनही सगळ्यात चांगला संदेश देणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल सलमान खानचं विशेष कौतुक केलं पाहिजे. या चित्रपटाच्या कथेतून दिला जाणारा संदेशच चित्रपटाला मोठं बनवतं. या चित्रपटातून सलमानने आपल्या मित्राचा लेक जहीर इक्बाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री नुतन यांची नात प्रनुतन यांना हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च केले आहे. दोघांचा पहिलाच चित्रपट असला तरी चित्रपट पाहाताना तसं वाटतच नाही. एखाद्या ग्लॅमरस नसलेल्या फिरदौससारख्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवणं सोपं नसतं. प्रनुतनने हे आव्हान लीलया पेललंय.
नोटबुक चित्रपटाचे संपूर्ण शुटिंग काश्मीर (जम्मू)च्या सुंदर वातावरणात झालंय. निसर्ग सौंदर्याची अद्भुत देणगी लाभलेलं दृष्यं चित्रपटाची जान आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.मनोजकुमार खटोई यांनी काश्मीरचं हेच निसर्गसौंदर्य मोठ्या खुबीने आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय. मात्र चित्रपटाची पटकथा आणि संवाद यांत तितकासा दम नाही. चित्रपटाचा पूर्वांध फारच रटाळ आहे,मात्र उत्तरार्धात चित्रपट वेग पकडतो. मात्र नितीन कक्कड यांच्या दिग्दर्शनाचे कौतुकच व्हायला हवं.
या चित्रपटात सहा लहान मुलंही आहेत. या मुलांसोबत चित्रपटाची कथा पुढे-पुढे जाते. त्या बच्चेकंपनीच्या अभिनयाचंही विशेष कौतुक केलं पाहिजे. चित्रपटाचं संगीत आणखी चांगलं होऊ शकलं असतं. नोटबुक चित्रपट एखाद्या प्रेमकथेप्रमाणे बिल्कुल नाही. मात्र याला भावनिक आणि रोमँटिक अशी किनार आहे. काश्मीरच्या सद्य परिस्थितीत तिथल्या मुलांचं शिक्षण महत्त्वाचं असून आणि त्यांना दहशतवादाच्या वाटेवर जाण्यापासून रोखणं किती गरजेचं हा संदेश चित्रपटातून मिळतो. त्यामुळेच प्रेमाचा आणि शिक्षणाचं महत्तव पटवून देणारा नोटबुक हा चित्रपट सहकुटूंब पाहू शकता असाच आहे.