Paatal Lok Review : चांगली कथा अन् दमदार अॅक्टिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 01:11 PM2020-05-16T13:11:59+5:302023-08-08T20:09:54+5:30
लॉकडाउनमध्ये वेळ काढून पाताल लोक एकदा तरी पहा.
लॉकडाउनमध्ये सगळ्यांकडे खूपच वेळच वेळ आहे. अशात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजन करण्यासाठी खूप काही सिनेमा व सीरिज उपलब्ध आहेत. पण, जेव्हा कोणता चांगला सिनेमा किंवा वेबसीरिज पहायला मिळाली तर मनाला खूप समाधान मिळते. अशीच एक वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ज्याची निर्मिती अनुष्का शर्माने केली आहे. या सीरिजचं नाव आहे पाताल लोक.
पाताल लोक सीरिजमध्ये आपल्या देशातील व जीवनातील त्या गोष्टींबद्दल सांगण्यात आलंय जे काही लोक फक्त पाहतात तर काही लोक तसं आयुष्य जगतात. मात्र याबद्दल सगळेच जाणतात. पाताल लोक नेमकं काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.. तर आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.
या सीरिजमधील मुख्य पात्रांपैकी एक हाथीराम, ज्याच्यानुसार जग एक नाही तीन आहे. यात सर्वात वर आहे स्वर्गलोक, ज्यात देव राहतात. मध्यभागी धरतीलोक जिथे माणसं राहतात आणि सर्वात खाली पाताल लोक जिथे किडे राहतात.
ही कथा आहे दिल्लीची. जिथे यमुनाच्या पूलावर चार आरोपींना पकडले जाते. हे एका टॉपचा पत्रकार व न्यूज अँकर संजीव मेहरा (नीरज काबी)च्या मर्डरची योजना होती. हे प्रकरण पोलीस हाथी राम चौधरी (जयदीप अल्हावत)ला दिले जाते. हाथी राम यमुना पार केल्यावर असलेल्या पोलीस ठाण्यात काम करणारा साधारण पोलीस असतो. त्याची पत्नी रेणू चौधरी (गुल पनाग) त्याचा व त्याच्या मुलाची काळजी घेण्यात वेळ व्यतित करत असते. तर हाथीरामचा मुलगा सिद्धार्थ (बोद्धिसत्व शर्मा) त्याच्याशी सरळ बोलत नसतो आणि शाळा व मित्रांबद्दल खरे खोटे सांगत असतो.
संजीव मेहरा एक वेळ मीडिया इंडस्ट्रीतील खूप मोठे नाव असते. तो आपली नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याच्या मर्डरचा प्लान ऐकून त्याचे होश उडून जातात. या प्रकरणात पकडले गेलेले आरोपी साधे दिसत असतात पण त्यांच्यातील सत्य खूप भयानक असते. या सीरिजमध्ये फक्त पाताल लोकचे दर्शन मिळत नाही तर धरती लोकमधील समस्याही पहायला मिळतात. तेव्हा समजते की स्वर्ग लोक आपल्याला जितकं चांगलं वाटतं तितकं नाही.
पाताल लोकमध्ये कुणी ए लिस्टर कलाकार नाही. यातील सर्व कलाकारांना तुम्ही चित्रपट किंवा मालिका व सीरिजमध्ये सहाय्यक भूमिकेत पाहिले आहे आणि त्यांचे काम तुम्हाला भावले असेल.मुख्य भूमिकेत जयदीप अहलावत, नीरज काबी, इश्वाक सिंह, अभिषेक बनर्जी हे कलाकार आहेत. तर सहायक भूमिकेत स्वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराना आणि निहारिका लायरा दत्ता हे कलाकार आहेत. या सर्वांनी खूप छान काम केले आहे. जयदीप अहलावतने वर्दीवाल्याची भूमिका अगदी चोख वठवली आहे. त्यांचा साथीदार अंसारीच्या भूमिकेत इश्वाक सिंगने रसिकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. गुल पनाग व बोद्धिसत्वनेदेखील खूप छान काम केलंय. नीरज काबी अँकरच्या भूमिकेत खूप चांगला वाटतो. त्याचे कामही कौतुकास्पद आहे. तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत स्वस्तिका मुखर्जीनेही चांगले काम केले आहे. तर तरूण पत्रकारची भूमिका निहारिका लायरा दत्ताने केली आहे. तिनेही चांगले काम केले आहे. विशाल उर्फ हतौडा त्यागीची भूमिका अभिषेक बॅनर्जीने केली आहे. कमी डायलॉग्ज असतानाही आपल्या एक्स्प्रेशनने अभिषेकने खूप चांगले काम केले आहे. तसेच सहकलाकारांनीदेखील खूप छान काम केले आहे.
या वेबसीरिजचे दिग्दर्शन अविनाश अरूण व परोसित रॉय यांनी केले आहे. कथा सुदीप शर्माने लिहिली आहे. या सीरिजची कथा खूप छान लिहिली आहे आणि खूप चांगल्या रितीने स्क्रीनवर रेखाटली आहे. प्रत्येक पात्राची एक कहाणी आहे जी सरळ व सहजरित्या रेखाटण्यात आळी आहे. आजच्या काळात घडत असलेली प्रत्येक गोष्ट मनाला भावते. त्यामुळे पाताल लोक एकदा तरी नक्की पहा.