Pagalpanti Movie Review - थोडसं हसू बाकी घोर निराशा
By सुवर्णा जैन | Published: November 22, 2019 03:51 PM2019-11-22T15:51:15+5:302023-08-08T23:38:51+5:30
काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं.
सुवर्णा जैन
'पागलपंती' म्हणजे निव्वळ वेडेपणा. सर्व वेडेपणाच्या हद्द पार केल्या जातात अशी कृती म्हणजेच पागलपंती. ज्या कृतीला कोणताही अर्थ राहत नाही ती म्हणजे पागलपंती. अशाच साऱ्या कृतींची सरमिसळ करून रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न म्हणजे पागलपंती हा चित्रपट. राज किशोर (जॉन अब्राहम), जंकी (अर्शद वारसी) आणि चंदू (पुलकित सम्राट) या तीन मित्रांच्या अवतीभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. त्यात राज किशोर हा भलताच कमनशिबी. तो ज्याच्या संपर्कात येतो त्यांच्या आयुष्यात काही ना काही वाईट घडत असतं. जंकी आणि चंदू पैसा कमावण्यासाठी तसंच बिझनेस वाढवण्यासाठी राजकिशोरशी हातमिळवणी करतात. मात्र कमनशिबी राजकिशोरमुळे त्यांच्या व्यवसायाला फटका बसतो. त्यामुळे नुकसान झालेला पैसा कमावण्याचा चंग ते बांधतात. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. याचवेळी चित्रपटातील गँगस्टर राजा (सौरभ शुक्ला) आणि त्याचा मेहुणा वायफाय भाई (अनिल कपूर) हे दोघं या तिघांना आपली नुकसानभरपाई वसूल करण्याच्या कामासाठी पाचारण करतात. मात्र पैसा वसूल करण्याच्या नादात पुढे चित्रपटात जे काही घडतं ते असतं पागलपंती.
कारण कथानकात जे काही घडत असतं त्याचा कशाचाही कशाला मेळ नसतो. त्यामुळेच की काय प्रत्येक गोष्टीत काहीना काही अर्थ अर्थ असलाच पाहिजे हे गरजेचं नसतं हा जॉन अब्राहमचा संवाद चित्रपटाच्या कथानकाला अगदी चपखल बसतो. कारण पागलपंती चित्रपटात विनोद निर्मितीसाठी अशाच काही गोष्टी घडवून आणल्या की काय असं रसिकांना वाटत राहतं.
चित्रपटातील सर्व व्यक्तीरेखा एकापेक्षा एक कहर आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. गँगस्टरच्या भूमिकेत अभिनेता अनिल कपूरने पुन्हा एकदा धम्माल केली आहे. अर्शद वारसीनेही नेहमीच्या स्टाईलमध्ये वावरताना दिसला आहे. त्याच्या एका वाक्याच्या संवादांनी रंगत भरलीय. जॉन अब्राहम आणि पुलकित सम्राट यांना त्यांच्या वयानुरूप भूमिका मिळाल्यात. सौरभ शुक्ला यांना भीतीदायक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र त्यांच्या संवादांनी कथानक रंगतदार केलं आहे.
चित्रपटात कृती खरबंदा, इलियाना डिक्रुझ आणि उर्वशी रौतेला यांना ग्लँमरस दाखवण्यात आलं आहे. मात्र विनोद निर्मितीसाठी विचित्र संवादांमुळे रसिकांची निराशा होते. रसिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्यासाठी चित्रपटात नीरज मोदी (इनामुलहक) हे पात्र घुसवण्यात आलंय. पीएनबी बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीवर आधारित हे पात्र आहे. त्याला घेऊन चित्रपटात डायलॉगबाजी दाखवून देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ज्याचा चित्रपटाच्या कथानकाशी काहीही संबंध दिसून येत नाही.
चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बाजमी यांनी केलंय. 'वेलकम', 'वेलकम बॅक' असे धम्माल विनोदी चित्रपट देणारे बाजमी यांच्या 'पागलपंती' चित्रपटाकडून मात्र रसिकांची घोर निराशा होते. चित्रपटातील संवाद आणि पंचेस रसिकांना हसवण्यात अपयशी ठरतात. चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये फारसा दम नसल्याचे जाणवतं. या चित्रपटाचं शुटिंग लंडनमध्ये झालंय. मात्र त्याला चांगल्या कथेची साथ लाभली असती तर त्याचा निश्चित फायदा झाला असता. काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं.
एकूणच पागलपंती चित्रपटातील काही विनोद रसिकांना हसवतात. तर काही अॅक्शन सीन मनोरंजनही करतात. तरीही 2 तास 40 मि. 'पागलपंती' चित्रपट रसिकांची घोर निराशा करतो. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे कॉमेडीच्या नावावर वेडेपणाचा कळस म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.