Palyadawasi Movie Review:व्यथा मांडणीचा प्रामाणिक प्रयत्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 08:07 AM2017-12-16T08:07:05+5:302023-08-08T19:28:38+5:30
एका समाजाच्या व्यथा मांडण्याचा या चित्रपटाचा हेतू आहे आणि ते करताना तो माहितीपटाच्या पातळीवर घसरणार याची दक्षता घेतलेली प्रकर्षाने जाणवते.
राज चिंचणकर
चोरी केली तर चोर आणि चोरी नाही केली तरी सुद्धा चोरच; अशीच टॅगलाईन असलेल्या 'पल्याडवासी' या चित्रपटाने भटक्या विमुक्तांमधल्या पारधी समाजाच्या व्यथांवर प्रकाश टाकण्याचे कार्य केले आहे. या विषयाच्या अनुषंगाने, साचेबद्ध चौकटीच्या बाहेर पडून समाजाला काही एक सांगू पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटाने गांभीर्याने केलेला दिसतो.
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">चोरी केली तर चोर आणि चोरी नाही केली तरी सुद्धा चोरच; अशीच टॅगलाईन असलेल्या 'पल्याडवासी' या चित्रपटाने भटक्या विमुक्तांमधल्या पारधी समाजाच्या व्यथांवर प्रकाश टाकण्याचे कार्य केले आहे. या विषयाच्या अनुषंगाने, साचेबद्ध चौकटीच्या बाहेर पडून समाजाला काही एक सांगू पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटाने गांभीर्याने केलेला दिसतो.
डोक्यावर छप्पर नसलेल्या भटक्या जमातीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या समाजाला 'माणूस' म्हणून तरी जगण्याचा अधिकार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत हा चित्रपट दाहक वास्तवाची मांडणी करतो. चिंधी आणि वस्तीवरचे तिचे भाऊबंद यांना नित्यनियमाने अत्याचारां ना सामोरे जावे लागत असते. त्यांची मुस्कटदाबी करून, खोटे गुन्हेदेखील त्यांच्यावर दाखल केले जात असतात. अशातच उजेड काळे नामक इन्स्पेक्टर त्या भागात रुजू होतो. हा इन्स्पेक्टरही पारधी समाजाचा असला, तरी स्वतःच्या हिमतीवर तो मोठा झालेला असतो. या समाजाच्या कपाळावर लागलेला शिक्का पुसून टाकण्याचे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्याचे ध्येय असते. चिंधी, तिची वस्ती आणि हा इन्स्पेक्टर यांच्यातल्या धाग्याची गुंफण करत हा चित्रपट विचार करण्यास प्रवृत्त करतो.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी जबाबदारी प्रगती कोळगे या युवतीने सांभाळली आहे. 'पल्याडवासी' हे या चित्रपटाचे शीर्षकच मुळी मार्मिक आहे आणि त्यातून अचूक अर्थबोध कसा होईल याचे कसब यात दिसते.समाजाच्या मुख्य प्रवाहात न येणारे;किंबहुना मुख्य प्रवाहात येऊ देण्यापासून रोखल्या जाणाऱ्या समाजाचे प्रतिबिंब म्हणून 'पल्याडवासी' हे शीर्षक समर्पक आहे.एका समाजाच्या व्यथा मांडण्याचा या चित्रपटाचा हेतू आहे आणि ते करताना तो माहितीपटाच्या पातळीवर घसरणार याची दक्षता घेतलेली प्रकर्षाने जाणवते.चित्रपटाला एक नायक आणि नायिका असावी, या पारंपरिकतेपासून हा चित्रपट दूर आहे. एका समाजाची वस्ती हीच या चित्रपटात मुख्य भूमिका बजावते.लेखनाच्या पातळीवर हा चित्रपट चांगला उतरला आहे;मात्र दिग्दर्शनाच्या बाबतीत तो एक पाऊल मागे चालतो. पाठांतर केल्यासारखी व्यक्तिरेखांची एकसुरातली संवादफेक या चित्रपटाला मागे खेचते. पण या कथेची मांडणी आश्वासकरित्या करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे आणि हा धाडसी प्रयोग समाधानकारक आहे.
चिंधीची भूमिका प्रगती कोळगे हिनेच केली आहे; तर इन्स्पेक्टरच्या भूमिकेत विश्वनाथ काळे आहेत. या दोघांनी या भूमिका पूर्णतः आत्मसात केल्याप्रमाणे उभ्या केल्या आहेत. परिणामी, त्या अतिशय वास्तव उतरल्या आहेत. त्यांना अभिजीत, आकाश बनसोडे, सोहन कांबळे, कार्तिक माने, विशाल देशमुख, रवीकिशन शर्मा या व इतर अनेक कलावंतांची योग्य साथ लाभली आहे. जयभीम शिंदे यांचे संगीत चांगले असले, तरी यातल्या गाण्यांना नाहक आधुनिकतेचा स्पर्श झालेला दिसतो. चित्रपटाच्या लोकेशन्सची निवड सुयोग्य आहे. एका अनवट वाटेवरचा चित्रपट म्हणून याची दखल घ्यावी लागेल आणि त्याचबरोबर असा हटके विषय चित्रपटाच्या माध्यमातून आणल्याबद्दल या टीमचे कौतुकही करावे लागेल.