Panga Movie Review: भरारीसाठी पंखांना पुन्हा बळ देणारा 'पंगा'
By तेजल गावडे | Published: January 24, 2020 02:45 PM2020-01-24T14:45:16+5:302023-08-08T19:47:32+5:30
स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, फक्त आव्हानांशी पंगा घेण्याची आवश्यकता असते, असंच काहीसं 'पंगा' चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे.
- तेजल गावडे
स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, फक्त आव्हानांशी पंगा घेण्याची आवश्यकता असते, असंच काहीसं 'पंगा' चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. तसाच पंगा कंगना रानौत हिने चित्रपटातून घेतला आहे. दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी लग्न झाल्यानंतर आपली स्वप्न उराशी बाळगलेल्या एका महिला कबड्डीपटूची कथा 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे.
ही कथा आहे ३२ वर्षीय जया निगम (कंगना रानौत)ची. एकेकाळची ती राष्ट्रीय कबड्डीपटू आणि कर्णधार असते. मात्र आता ती एका मुलाची म्हणजेच आदित्य उर्फ आदी (यज्ञ भसीन)ची आई आणि प्रशांत (जस्सी गिल)ची पत्नी आहे. तिच्या छोट्याशा जगात ती खूप खुश आहे. कबड्डीमुळे मिळालेली रेल्वेतील नोकरी आणि संसारात ती रमलेली असते. मात्र तिच्या मनात कबड्डी आजही कायम घर करून असते. एक दिवस घरात अशी घटना घडते ज्यामुळे तिचा मुलगा आदी तिला कबड्डीत कमबॅक करण्यासाठी मागे लागतो. आदीच्या प्रेमापोटी ती प्रशांतसोबत मिळून प्रॅक्टिसचे नाटक करायचे ठरविते. परंतु प्रॅक्टिसचं नाटक करता करता पुन्हा एकदा तिचे कबड्डी खेळण्याचे राहिलेलं अपूर्ण स्वप्न खुणावू लागतं. आता तिला खरोखरच भारताच्या राष्ट्रीय संघात कमबॅक करायचे असते आणि पुन्हा एकदा स्वप्नाच्या मागे धावायचे असते. तिच्या या प्रवासात तिला नवरा व मुलाची साथ तर असतेच. पण तिची आई नीना गुप्ता आणि बेस्ट फ्रेंड व कबड्डी खेळाडू आणि कोच मीनू (रिचा चड्ढा)चे सहकार्य लाभते. पण, जया तिचे स्वप्न पूर्ण करते का आणि तिला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे पाहण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल.
'निल बट्टे सन्नाटा', 'बरेली की बर्फी' चित्रपटानंतर अश्विनी अय्यर तिवारीने पुन्हा मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा रुपेरी पडद्यावर साकारली आहे. तिने भोपाळसारख्या छोट्याशा शहरातील काम करणारी महिला व मध्यमवर्गीय कुटुंबाला बारकाईने सादर केले आहे. तसेच या चित्रपटात काही ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा सहजतेनं मांडला आहे. चित्रपटाचा पुर्वार्ध थोडा संथ असला तरी कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. उत्तरार्धात चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अभिनय, दिग्दर्शनासोबतच नितेश तिवारीने लिहिलेले डायलॉग्स चित्रपटाची जमेची बाजू आहे.
अभिनयाबाबत सांगायचं तर 'क्वीन'मधील राणी मेहरा असो किंवा तनू वेड्स मनु २मधील तनू वा फॅशनमधील शोनाली गुजराल या भूमिकांप्रमाणेच कंगनाने 'पंगा'त साकारलेल्या जया निगम या पात्राला वेगवेगळे पैलू आहेत. मुलगी, आई, पत्नी, मैत्रीण आणि खेळाडू असे पैलूंमधून कंगनाने चांगलीच छाप उमटविली आहे. पंजाबी सिनेइंडस्ट्रीतील गायक व अभिनेता जस्सी गिलने या चित्रपटात कंगनाच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यानेदेखील त्याची भूमिका चोख बजावली आहे. तर बालकलाकार यज्ञ भसीनदेखील चित्रपटात चांगलाच भाव खाऊन गेला आहे. तर नीना गुप्ता, रिचा चड्ढा व स्मिता तांबे यांनीदेखील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चांगली झाली आहे आणि चित्रपटाला असं संगीत शंकर एहसान लॉय यांनी दिलं आहे तर गाणी जावेद अख्तर यांच्या लेखणीतून साकार झाली आहेत. गाणी चित्रपटाच्या कथेशी अनुसरून असली तरी मनाचा ठाव घेत नाहीत. पंगा हा चित्रपट स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतो. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा 'पंगा' नक्की घ्या.