Panipat Review : अंगावर शहारा आणणारी पानिपतची लढाई
By प्राजक्ता चिटणीस | Published: December 6, 2019 04:13 PM2019-12-06T16:13:04+5:302023-08-08T20:38:18+5:30
पानिपत या चित्रपटात संजय दत्त, क्रीती सॅनॉन आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
अठराव्या शतकातील पानिपतच्या लढाईविषयी आपण सगळ्यांनीच शालेय पुस्तकात वाचले होते. हाच इतिहास पहिल्यांदाच चित्रपटाच्या रूपाने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे पेशव्यांच्या एका महत्त्वाच्या लढाईविषयी जाणून घेण्याची संधी लोकांना मिळाली आहे.
पानिपत या चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक मोहीम फत्ते करून सदाशिवराव (अर्जुन कपूर) पुण्याला परततात. नानासाहेब पेशवे (मोहनिश बहल) यांच्यानंतर त्यांच्या मुलाला म्हणजेच विश्वासरावलाच (अभिषेक निगम) पेशव्यांची गादी मिळावी असे नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिका बाई (पद्मिनी कोल्हापूरे) यांना वाटत असते. पण सदाशिवराव हे शूर योद्धा असल्याने त्यांना ही गादी मिळेल अशी गोपिका बाईंच्या मनात भीती असते आणि त्यामुळे नाना पेशव्यांना सांगून गोपिका बाई युद्धाची नव्हे तर आर्थिक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सदाशिवराव यांच्यावर देतात. याच दरम्यान त्यांचे पार्वती बाई (क्रीती सॅनॉन) यांच्यासोबत लग्न होते. पण काहीच दिवसांनंतर अहमद शाह अब्दाली (संजय दत्त) भारतावर आक्रमण करण्यासाठी येतो. त्याला रोखण्यासाठी सदाशिवराव आपले सैन्य घेऊन पुण्यातून उत्तरेच्या दिशेकडे निघतात. पानिपतला दोन्ही सैन्य समोरासमोर आल्यानंतर झालेले युद्ध आपल्याला चित्रपटाच्या शेवटच्या 30 मिनिटांत पाहायला मिळते.
चित्रपटाची सुरुवात ही एका युद्धानेच होत असल्याने सुरुवातीपासूनच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर पकड घेतो. पण त्यानंतर मध्यांतरापर्यंत व्यक्तिरेखांची ओळख, शनिवार वाड्यात घडत असलेल्या घडामोडी इतकेच आपल्याला पाहायला मिळते. मात्र मध्यांतरानंतर चित्रपटाला खऱ्या अर्थाने गती मिळते. चित्रपटातील शेवटचे युद्ध तर दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी अतिशय चांगल्याप्रकारे दिग्दर्शित केले आहे. हे युद्ध पाहाताना अंगावर नक्कीच काटा येतो. पण चित्रपट पाहाताना एक गोष्ट नक्कीच जाणवते की, तुम्हाला पेशव्यांचा इतिहास थोडा तरी माहीत असणे गरजेचे आहे. अन्यथा व्यक्तिरेखांचे एकमेकांसोबतचे नाते काय आहे, त्याचा संदर्भ काय या गोष्टी लक्षात येत नाहीत.
पानिपत या चित्रपटात खरी बाजी मारली आहे ती सिनेमेटोग्राफरने. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहाणे एक पर्वणीच आहे. या चित्रपटाचा सेट अतिशय भव्य असून रंगभूषा देखील चांगली झालेली आहे. अर्जुन कपूर, क्रीती सॅनॉन यांनी काम चांगले केले आहे. पण या सगळ्यांपेक्षा संजय दत्तचा पडद्यावरील वावर भाव खाऊन जातो. मोहनिश बहल, पद्मिनी कोल्हापूरे, नवाब शाह, साहिल सलाथिया यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. मात्र झीनत अमान यांच्या वाट्याला खूपच छोटी भूमिका आलेली आहे. चित्रपटाची गाणी देखील चांगली झाली आहेत. पण काही वेळा ती चित्रपटात उगाचच टाकण्यात आली असल्याचे जाणवते. चित्रपटाची लांबी जास्त असल्याने हा चित्रपट काहीवेळा कंटाळवाणा होतो. तसेच एडिटिंग आणि व्हीएफएक्समध्ये काही उणिवा जाणवतात. चित्रपट थोडा लहान असता तर तो अधिक रंजक झाला असता असे वाटते. सदाशिवराव आणि अब्दाली युद्धाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यातील मैदानावरील लढाई ही काहीच मिनिटांची दाखवली ही गोष्ट खटकते. पण तरीही हा पानिपतचा इतिहास चित्रपटगृहात जाऊन पाहाण्यास काहीच हरकत नाही.