‘पार्टीशन १९४७’:एक यशस्वी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 11:49 AM2017-08-18T11:49:20+5:302023-08-08T19:16:16+5:30
गुरिंंदर यांनी फाळणीच्या पार्श्वभूमीवरची एक प्रेमकथा यात गुंफली आहे.
भारताच्या फाळणीचा इतिहास पडद्यावर आणणे सोपे नाहीच. या इतिहासाचे संदर्भ, त्याचे वास्तववादी दर्शन, त्याची काळी बाजू आणि त्याअनुषंगाने घडलेला घटनाक्रम उलगडणे आणि तो डझनभर पात्रांच्या माध्यमातून चित्रपटात जिवंत करणे, हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. अर्थात अनेक दिग्दर्शक - निर्मात्यांनी हा शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान स्वीकारले आहे. आता हा शिवधनुष्य पेलण्यात किती जण यशस्वी झालेत, हा भाग वेगळा. पण हे आव्हान स्वीकारण्याचे प्रामाणिक प्रयत्न अनेकांनी केलेत, हेही कमी नाहीच.गुरिंदर चड्ढा हेही त्यापैकीच एक़ गुरिंदर यांचा ‘पार्टीशन १९४७’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. चित्रपट म्हणून हा एक यशस्वी प्रयत्न म्हणता येईल.
फाळणीच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा एक अभ्यासपूर्ण चित्रपट असे या चित्रपटाबद्दल म्हणता येईल. फाळणीच्या संपूर्ण घटनाक्रमामागचा ब्रिटीश प्रशासनाचा दृष्टिकोनही यात दाखवला आहे. अर्थात या दृष्टिकोनाचे कुठलेही समर्थन न करता.ब्रिटीश व्हाईसराय लॉर्ड माऊंटबेटन भारतात येतात आणि येथून चित्रपट सुरु होतो. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आहे आणि भारताला हे स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी व्हाईसराय भारतात येतात.फाळणीची दिशा ठरवण्यासोबतच महात्मा गांधी, पंडित नेहरू हे भारतीय नेते आणि मोहम्मद अली जिना यांच्यातील मतभेद दूर करण्याची जबाबदारी माऊंटबेटन व त्यांची पत्नी लेडी एडविना यांच्यावर सोपवली जाते. हिंदू-मुस्लिम या दोन धर्मांतील जातीय तेढ कमी करण्याची जबाबदारीही माऊंटबेटन व त्याच्या पत्नीवर येऊन पडते.आपल्यापुढे खूप मोठे आव्हान आहे, हे माऊंटबेटन जाणून असतात.
सोबतच भारतीयांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, असे त्यांना वाटत असते. भारतात येतात लेडी एडविना भारतात आपले सामाजिक कार्य सुरु करते. ब्रिटीश सरकारचे निर्देश पाळण्यासोबतच माऊंटबेटन एकीकडे गांधीजी तर दुसरीकडे जीना यांच्यात मध्यस्थी करण्यात गुंतलेले असतात. पण हे करत असताना आपण केवळ ब्रिटीश प्रशासनाचे मोहरे बनून राहिले असतल्याचे भारतीयांबद्दल विशेष सहानुभूती असलेले माऊंटबेटन व लेडी एडविना यांच्या लक्षात येते. प्रत्यक्षात ब्रिटीश प्रशासनाचे मनसुबे काही वेगळेच असतात. फाळणीपूर्वीच्या व्हाईसराय हाऊसमधील घडामोडी, तत्कालीन स्थिती गुदिंदर यांनी दमदारपणे मांडली आहे. सोबतच याच काळातील आलिया(हुमा कुरेशी) आणि जीत (मनीष दयाल) यांची प्रेमकथाही गुंफली आहे. वेगवेगळ्या धर्माचे असलेले आलिया व जीत दोघेही माऊंटबेटन यांच्या कार्यालयात काम करत असतात. अर्थात आलियाच्या वडिलांनी (दिवंगत ओम पुरी) आपल्या स्वर्गीय पत्नीच्या म्हणण्यानुसार आलियाचे लग्न आसिफशी (अरूणोदय सिंह) ठरवलेले असते. आसिफ हा जिनांचा समर्थक असतो आणि पाकिस्तान वेगळा व्हावा, या मतावर ठाम असतो. याचवरून राजकीय विचारधारेवरून आलिया व आसिफ यांच्यात काही काळ मतभेद येतात. कालांतराने हे मतभेद निवळतात. पण अर्थात यानंतर फाळणी होते व चित्रपटात अनेक टिष्ट्वस्ट येतात.
फाळणीनंतर उसळलेल्या हिंसाचारादरम्यान मी लवकरच तुला घ्यायला येईल,असे सांगून आसिफ पाकिस्तानकडे निघतो. मागे उरलेली आलिया तिच्या आंधळ्या पित्याला घेऊन पळते तर जीत कुमार भारतात राहून माऊंटबेटन यांची मदत करण्याचा निर्णय घेतो. नंतर काय घडते,हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटच बघावा लागेल.एकंदर सांगायचे तर गुरिंंदर यांनी फाळणीच्या पार्श्वभूमीवरची एक प्रेमकथा यात गुंफली आहे. अर्थात ती मांडताना काहीशी गफलत झालीय.कदाचित जीत आणि आलिया यांच्यातील केमिस्ट्रीचा अभाव, हे यामागचे कारण आहे.अधिक वास्तववादी बनविण्याच्या नादात चित्रपट ब-याच ठिकाणी भरकटला आहे. काही दृश्यांना अचानक लावलेली कात्री खटकणारी आहे. पटकथेची घडी नीट न जमल्याने चित्रपट रेंगाळतो. शिवाय विस्थापितांचे दु:ख आणि त्यांच्या मनातील वेदना हे दाखवण्यातही दिग्दर्शक कुठेतरी कमी पडल्याचे वारंवार जाणवते.