Pataakha Movie Review : फुसका बार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 01:49 PM2018-09-28T13:49:41+5:302023-08-08T19:47:32+5:30

अगदी क्षुल्लक कारणावरूनही एकमेकींच्या जीवावर उठणा-या, एकमेकींना कमी लेखण्याची एकही संधी न सोडणा-या या बहिणींची कथा ट्रेलरमध्ये पाहायला मस्त वाटते. पण विश्वास ठेवा, तब्बल दोन तास अगदी विनाकारण बहिणींना झेलणे हा जोक नाही.

Pataakha Movie Review | Pataakha Movie Review : फुसका बार!!

Pataakha Movie Review : फुसका बार!!

Release Date: September 28,2018Language: हिंदी
Cast: राधिका मदन, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर
Producer: विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज,ईशान सक्सेना, अजय कपूरDirector:  विशाल भारद्वाज
Duration: 2 तास 14 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत
 

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ हा चित्रपट आज चित्रपटगृहांत झळकला. राधिका मदन, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात...

दोन बहिणी, अगदी जन्मापासून एकमेकींच्या वैरीणी. एका घरात लहानाच्या मोठ्या होऊनही कुठल्याच गोष्टीवर त्यांचे एकमत नसते. अगदी क्षुल्लक कारणावरूनही एकमेकींच्या जीवावर उठणा-या, एकमेकींना कमी लेखण्याची एकही संधी न सोडणा-या या बहिणींची कथा ट्रेलरमध्ये पाहायला मस्त वाटते. पण विश्वास ठेवा, तब्बल दोन तास अगदी विनाकारण बहिणींना झेलणे हा जोक नाही.

चंपा कुमारी उर्फ बडकी (राधिका मदन ) आणि गेंदा कुमारी उर्फ चुटकी (सान्या मल्होत्रा)या दोघी सख्ख्या बहीणी एकमेकांच्या कट्टर वैरी. बिडी, कपडे, घरकाम, अभ्यास, म्हशी असे कुठलेही कारण त्यांना भांडणासाठी पुरेसे असते. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवर अगदी एकमेकींच्या जीवावर उठणा-या या दोघींच्या भांडणांमुळे सगळेच वैतागलेले असतात. त्यांचा गरिब वडील शांतीभूषण(विजय राज) तर अगदी हातपाय गळून बसलेला असतो. दोघींचीही लग्न करून त्यांना आपआपल्या घरात रवाना करणे हा एकच पर्याय त्याला सूचत असतो. गावातल्याच गलेलठ्ठ पटेल नामक इसमाला या दोघी बहिणींपैकी कुण्या एकीशी लग्न करायचे असते. यासाठी तो त्यांच्या वडिलांना पैसे द्यायलाही तयार असतो. पण चुटकी आणि बडगी दोघींनाही हे मान्य नसते. बडकीला म्हशींचा तबेला टाकायचा असतो आणि चुटकीला इंग्रजी शिकून शिक्षक व्हायचे असते. पण या स्वप्नांपर्यंत घेऊन जाणारी वाट मात्र त्यांना गवसत नसते. याचदरम्यान गावात भेटलेल्या दोन होतकरू मुलांशी या दोघीही परस्पर लग्न करतात आणि त्यांच्यासोबत पळून जातात. दोघींनी एकमेकींपासून सुटका झाल्यामुळे नि:श्वास सोडतात. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकत नाही. कारण आपण एकाच घरातल्या दोन भावांशी लग्न केल्याचे त्यांना कळते आणि पुन्हा त्यांच्या भांडणांना जोर चढतो.

 भारत-पाक युद्धाशी तुलना झालेल्या चंपा आणि गेंदाची कथा थोड्यात वेळात कंटाळवाणी होते. विशाल भारद्वाज खरे तर खूप साधी सरळ कथा विणतो. अगदी त्या कथेशी एकनिष्ठ होऊन. पण ‘पटाखा’बद्दल असे म्हणता येणार नाही. कथा पुढे सरकतचं नाहीये, हे पहिल्या तासाभरातचं आपल्याला कळते. या बहिणी एकमेकींशी का भांडतात, त्यांची पार्श्वभूमी काय, एकमेकींबद्दल त्यांच्या मनात इतका राग का, याचे उत्तर शेवटपर्यंत सापडत नाही.
चित्रपटात राधिका मदन आणि सान्या मल्होत्रा या दोघीही अतिउत्साहाने आपआपली व्यक्तिरेखा रंगवतात. दोघी बहिणींमधील एकमेकींबद्दलची खुन्नस, राग, कजागपणा या सगळ्या भावना दमदारपणे जिवंत करतात. इतक्या की त्यांच्या आक्रमक स्वभावापुढे दोघींचेही नवरे, वडील आणि एका अनोख्या विनोदी भूमिकेतील सुनील ग्रोव्हर असे सगळेच अगदी बिच्चारे वाटतात. अर्थात चित्रपटातील पात्रांचा अभिनय आणि त्यांचा आक्रमकपणा मनोरंजन करू शकेलचं असे नाही. ‘पटाखा’बद्दलही हेच होते़ दोघी बहिणींच्या दोन-तीन मारामा-या बघूनचं आपली गतही त्यांच्या वडिलांसारखीचं होते. इतकी की, कधी एकदा या दोघींपासून सुटका होते, असे चित्रपट पाहतांना होऊन जाते.

थोडक्यात सांगायचे तर टीव्ही येईपर्यंत पाहायचे थांबले तरी चालू शकेल.

Web Title: Pataakha Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.