Pehalwan Movie Review : दमदार ॲक्शन, मसाला चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 05:20 PM2019-09-13T17:20:00+5:302023-08-08T20:09:54+5:30
पहलवान या चित्रपटात सुनील शेट्टी आणि सुदीप यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पहलवान या चित्रपटात एका सामान्य मुलाचा एक प्रसिद्ध कुस्तीपट्टू बनण्याचा प्रवास मांडण्यात आलेला असून दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप आणि सुनील शेट्टी यांची या चित्रपटातील केमिस्ट्री मस्त जमून आली आहे.
सरकार (सुनील शेट्टी) हा प्रसिद्ध पहलवान असतो. एका अनाथ मुलाला म्हणजेच कृष्णाला (सुदीप) तो दत्तक घेतो. या मुलाला पाहाताच या मुलामध्ये एक प्रसिद्ध कुस्तीपट्टू असण्याचे सगळे गुण असल्याचे त्याला जाणवतात. तो कृष्णाचे पालनपोषण अतिशय प्रेमाने करतो. कृष्णा मोठा होऊन प्रसिद्ध कुस्तीपट्टू बनतो. सरकारची आपल्या या मुलाबद्दल केवळ एकच इच्छा असते की, कृष्णाने राष्ट्रीय पातळीवर खेळून देशाला सुवर्ण पदक मिळवून द्यावे. त्याने केवळ त्याच्या खेळाकडेच लक्ष द्यावे असे सरकारला वाटत असल्याने त्याने कृष्णाला मुलींपासून दूर राहाण्याविषयी सांगितलेले असते. पण कृष्णा रुक्मिणीच्या (आकांक्षा सिंह) प्रेमात पडतो. ती खूपच श्रीमंत असते. त्यामुळे त्यांच्या या नात्याला तिच्या कुटुंबियांचा विरोध असतो. त्यामुळे कृष्णा रुक्मिणीला लग्नाच्या मंडपातून पळवतो. पण या सगळ्यामुळे सरकारला राग येतो आणि कृष्णा भविष्यात कधीही कुस्ती खेळणार नाही असे वचन तो त्याच्याकडून घेतो. कृष्णाचे शिक्षण झाले नसल्यामुळे तो छोटी-मोठी कामं करून आपले घर चालवत असतो. सगळे काही सुरळीत सुरू असताना साहब (सुशांत सिंह) आणि टोनी (कबीर दुहन सिंह) यांच्यामुळे त्याला पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरावे लागते. त्यानंतर कृष्णाच्या आयुष्यात पुढे काय होते हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळते.
कुस्ती या खेळावर आजवर दंगल, सुलतान हे चित्रपट बनवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची त्या दोन चित्रपटांसोबत तुलना होणार यात काहीच शंका नाही. पहलवान हा चित्रपट कुस्तीवर आधारित असला तरी त्यात एक प्रेमकथा, गुरू-शिष्याचे नाते या गोष्टी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतात. दाक्षिणात्य सिनेमा म्हटला की, त्यात मारधाड, रोमान्स या गोष्टी असल्याच पाहिजे. या चित्रपटात देखील या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. केवळ हा चित्रपट काही वेळा खूपच संथ झाल्यासारखा वाटतो. तसेच चित्रपटाची लांबी पाहाता हा चित्रपट मध्यांतरानंतर उगाचच ताणल्यासारखा वाटतो. तसेच सुनील आणि त्याच्या मुलाच्या भूमिकेत असलेला सुदीप यांच्यात भावनिक नाते दाखवण्यास हा चित्रपट कुठेतरी कमी पडलेला जाणवतो. पण असे असले तरी या चित्रपटातील ॲक्शन दृश्यांना दाद द्यावी लागेल. या चित्रपटातील ॲक्शन दृश्यं खूपच चांगल्याप्रकारे जमून आलेली आहेत. सुदीप हा एक चांगला अभिनेता असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने या चित्रपटात देखील दमदार अभिनय केला आहे. सुनील शेट्टीचा देखील अभिनय खूपच चांगला झाला आहे. तसेच खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या सुशांत सिंहने देखील त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. दाक्षिणात्य मसाला चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांना पहलवान हा चित्रपट नक्कीच आवडेल.