Salaar Review: Action-इमोशनचा रक्तरंजीत पॉवर गेम, वाचा कसा आहे प्रभासचा 'सालार'
By संजय घावरे | Published: December 22, 2023 04:56 PM2023-12-22T16:56:32+5:302023-12-22T17:28:12+5:30
प्रभासचा सालार नक्की कसा आहे?
कहानी फुल टू फिल्मी आणि टिपिकल दाक्षिणात्य शैलीतील आहे. प्रशांत नील यांनी 'केजीएफ'सारखीच यालाही काळ्या रंगाची ट्रीटमेंट दिली आहे. 'बाहुबली' नंतर सुपरहिटच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रभासला (Prabhas) हा चित्रपट नक्कीच दिलासा देईल. कथानक अत्यंत विचारपूर्वक लिहिल्याने 'पिच्चर अभी बाकी है...' असंच शेवटी म्हणावं लागतं.
कथानक -
सुरुवात बालवयातील देवा आणि वर्धा या मित्रांपासून होते. वर्धाची नथनी परत मिळवून देण्यासाठी देवा चक्क वीजेशी खेळतो, तर देवाच्या आईला वाचवण्यासाठी वर्धा राज्यातील मोठा हिस्सा देतो. २५ वर्षांनी २०१७ मध्ये परदेशातून भारतात येणारी कृष्णकांतची मुलगी आध्याला त्याचे शत्रू मारायला टपलेले असतात. कृष्णकांतच्या सांगण्यावरून एक व्यक्ती तिला पळवून देवाच्या आईकडे नेतो. मॅकेनिक देवाच्या शोधात बरेच जण असतात, पण का ते समजत नाही. अखेर कृष्णकांतच्या शत्रूंना आध्याचा पत्ता मिळतो. त्यानंतर सुरू होते खानसार आणि सिझफायरची कहाणी, जी पाहण्यासारखी आहे.
लेखन-दिग्दर्शन -
खूप मोठा पसारा असलेलं कल्पनेच्याही पलिकडलं कथानक आणि बऱ्याच व्यक्तिरेखा असूनही सर्वांना एका धाग्यात गुंफण्यात दिग्दर्शक प्रशांत नील यशस्वी झाले आहेत. नवी दिल्ली, ओरिसा, आसाम, छत्तीसगड, हैदराबाद, गुजरात अशा बऱ्याच राज्यांमध्ये कथानक फिरतं. संवाद अर्थपूर्ण आहेत. चित्रपटात खूप हत्या करण्यात आल्या असल्या तरी काळ्या रंगामुळे त्यातील विदारकता झाकोळली जाते. थोड्या वेळाकरीता कोळशाची खाण आहे. दोन मित्रांची बालपणातील कथा, मोठेपणी दोघांचे वेगवेगळे ट्रॅक्स, खानसारचा इतिहास, तीन कबिल्यांची कथा, त्यांची नियमावली व दहशत, राजमन्नारने इतर कबिल्यांची केलेली कत्तल, देवा खानसारमध्ये परतल्यावर झालेला नरसंहार आणि शेवटच्या १५ मिनिटांमध्ये ३६० डिग्री वळण घेणारे कथानक यात आहे. चित्रपटाची लांबी मोठी आहे. पहिला भाग सव्वा तासाचा, तर दुसरा पावणे दोन तासांचा आहे. अॅक्शन दृश्ये कडक आहेत. चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवत शेवटी पुढल्या भागाची उत्सुकता जागवतो.
अभिनय -
पुन्हा एकदा 'बाहुबली'मधील प्रभास दिसतो. शांत आणि आक्रामक हे दोन्ही गुण प्रभासने मोठ्या खुबीने सादर केले आहेत. श्रुती हासनची भूमिका महत्त्वपूर्ण असली तरी फार प्रभावी नाही. अगोदर एक हताश राजकुमार आणि नंतर शूरवीराच्या रूपात पृथ्वीराज सुकुमारन प्रभावित करतो. राजकारणाच्या पटलावर पुरुषांना मात देत प्रभावशाली निर्णय घेणारी व्यक्तिरेखा श्रीया रेड्डीने उत्तम साकारली आहे. ईश्वरी रावने टिपिकल साऊथ इंडियन सिनेमातील आई सादर केली आहे. जगपती बाबू नेहमीच्याच शैलीत दिसतात. बॅाबी सिम्हा, टिनू आनंद, रामन्ना, ब्रह्माजी आदी कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : कथा-पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, अॅक्शन, इमोशन्स, सिनेमॅटोग्राफी, अॅक्शन
नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी, काही दृश्यांमध्ये 'केजीएफ' व 'बाहुबली'ची आठवण येणे
थोडक्यात काय तर या चित्रपटाच्या रूपात रक्तरंजीत कथानकाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे, जो खिळवून ठेवणारा असल्याने एकदा पाहायला हवा.