'पुष्पा'चा वाइल्ड फायर धमाका! कसा आहे अल्लू अर्जुनचा सिनेमा; वाचा Review
By संजय घावरे | Updated: December 5, 2024 16:42 IST2024-12-05T15:30:33+5:302024-12-05T16:42:59+5:30
चातुर्य आणि धाडसाच्या बळावर सिंडिकेटवर राज्य करणाऱ्या पुष्पाचा इमोशनल अँगलही यात आहे.

'पुष्पा'चा वाइल्ड फायर धमाका! कसा आहे अल्लू अर्जुनचा सिनेमा; वाचा Review
'फायर' असलेला पुष्पा दुसऱ्या भागात 'वाइल्ड फायर' बनला आहे. त्यामुळे यात पुष्पाचा 'वाईल्ड फायर' धमाका पाहायला मिळतो. चातुर्य आणि धाडसाच्या बळावर सिंडिकेटवर राज्य करणाऱ्या पुष्पाचा इमोशनल अँगलही यात आहे. अल्लू अर्जूनचा एनर्जेटीक 'वाईल्ड फायर' परफॅार्मन्स खिळवून ठेवतो. 'पुष्पा ३'मध्ये पुढचा प्रवास पाहायला मिळणार आहे.
कथानक : चित्रपटाची सुरुवात जापानमध्ये होते. लाल चंदनाची ऑर्डर पोहोचवायला गेलेला पुष्पा जापानमधील माफियाशी भिडतो. त्यानंतर कथा भारतात सुरू होते. एसपी भंवरसिंग शेखावत पुष्पाला मुद्देमालासह पकडण्यासाठी जंग जंग पछाडतो, पण तो काही हाती लागत नाही. याउलट पकडलेल्या मजूरांना चालाखीने सोडवतो. बालपणाची आठवण आणि सावत्र भावाच्या वर्तणुकीमुळे त्रासलेला पुष्पा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार असतो. त्यावेळी श्रीवल्ली त्याला मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायला सांगते. मुख्यमंत्री पुष्पासोबत फोटो काढायला तयार नसतात. त्यानंतर काय होते ते चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथानक खिळवून ठेवते. पुष्पाची स्टाईल आणि त्याला साजेसे संवाद टाळ्या-शिट्ट्या मिळवणारे आहेत. धडाकेबाज अॅक्शन, इमोशन्स, टशन, आव्हाने, अनोखी रोमान्स स्टाईल, अफलातून कोरिओग्राफी, कर्णमधूर संगीत अशी मनोरंजनाची मेजवानी घेऊनच पुष्पा आला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या भागात पुष्पाच्या कुटुंबाची स्टोरी भावूक करते. सिनेमॅटोग्राफीपासून कला दिग्दर्शनापर्यंत सर्वच बाबतीत बाजी मारली आहे. 'सामी...', 'किसीक...', 'फिलिंग्ज...' ही गाणी छान आहेत. मध्यंतरानंतर थोडी गती मंदावल्यासारखी वाटते. सुरुवातीच्या दृश्यातील रेफ्रन्स अर्धवट सोडल्यासारखा वाटतो.
अभिनय : पुन्हा एकदा अल्लू अर्जुनने पूर्ण ताकदीनिशी पुष्पा साकारला आहे. अॅक्शनपेक्षा डान्स करताना त्याची एनर्जी पाहण्याजोगी आहे. काहीशी झाकोळल्यासारखी वाटणारी रश्मिका मंदाना एका सीनमध्ये खूपच भाव खाऊन जाते. पुन्हा एकदा दोघांची केमिस्ट्री खिळवून ठेवते. फहाद फासीलने साकारलेला पोलिस अधिकारी लक्षात राहण्याजोगा आहे. राव रमेशने रंगवलेला मंत्रीही चांगला झाला आहे. जगपती बाबूच्या रूपातील केंद्रिय मंत्री रेड्डी शांत स्वभावाचा असला तरी खतरनाक आहे. इतर सर्वांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, संगीत, अॅक्शन, वेशभूषा, संकलन
नकारात्मक बाजू : मध्यंतरानंतर थोडी मंदावलेली गती, सुरुवातीचा अर्धवट संदर्भ
थोडक्यात काय तर पुष्पा खूप भारी आहे. कल्पनेच्या पलिकडला पुष्पा आणि त्याची स्टाईल पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावणार यात शंका नाही.