Pushpa Movie Review: अल्लू अर्जुनचा वन मॅन शो
By संदीप आडनाईक | Published: December 18, 2021 06:43 PM2021-12-18T18:43:14+5:302023-08-08T20:09:54+5:30
अल्लू अर्जुन (Allu Arjun)ची मुख्य भूमिका असलेला मोठ्या बजेटचा पुष्पा (Pushpa Movie) हा तेलगू चित्रपट आज संपूर्ण भारतात तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला मोठ्या बजेटचा पुष्पा हा तेलगू चित्रपट आज संपूर्ण भारतात तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-संदीप आडनाईक
कलाकार: अल्लू अर्जुन, फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, धनुंजय, राव रमेश, सुनील, अनसूया भारद्वाज, अजय घोष
दिग्दर्शक : सुकुमार
निर्माते: नवीन येरनेनी, वाय. रविशंकर
कथानक :
पुष्पा राज (अल्लू अर्जुन) एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात शेषाचलम हिल्समध्ये लाल चंदनची तस्करी करतो. तस्करीच्या दुनियेत मोठे बनण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि यासाठी तो स्थानिक डॉन मंगलम सीनू (सुनील) याच्याशी सामना करतो. कालांतराने, तो लाल चंदनाचा निर्विवाद तस्कर बनतो. पण पुष्पाराजला वनाधिकारी शिकावतचा (फहद फासिल) तीव्र विरोध आहे. पुष्पाची प्रसिद्धी कशी झाली आणि तो शिकावतचा कसा सामना करतो, ही पुष्पाची मूळ कथा आहे.
दिग्दर्शन :
सुकुमारचा पुष्पा: द राइज, या चित्रपटाचा पहिला भाग आहे. सुकुमारने उत्कृष्ट दिग्दर्शन केले आहे. तो पुष्पाची जोरदार सुरुवात करतो आणि पुष्पा हा अल्लू अर्जुनचा वन मॅन शो आहे याची जाणीव ठेऊन त्याने त्याच्यासारख्या आयकॉन स्टारकडून नॉकआउट परफॉर्मन्स काढून घेतला आहे. सिनेमाचं पूर्वार्ध चांगला आहे पण उत्तरार्ध निस्तेज क्लायमॅक्समुले मंदावतो. पण त्याने चित्रपट दोन भागांत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने, उत्तरार्थ कमी करून त्यातली मजा त्याने घालवून टाकली आहे. सिनेमाची संथ गती आणि लांबीमुळे कंटाळा येतो, याशिवाय अनेक ठिकाणी पुढे काय होते याचा अंदाज लावता येतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास, पुष्पा हा मनोरंजन म्हणून चांगला बनला आहे.
जमेची बाजू :
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्या दृश्यापासून, पुष्पा ही अल्लू अर्जुनची कथा आहे आणि तो निःसंशयपणे चित्रपटाचा आधारस्तंभ आहे, हे स्पष्ट होते. अल्लू अर्जुनची देहबोली, ठोस संवाद आणि स्क्रीन प्रेझेन्समुले तो प्रभावी ठरला आहे. रश्मिका मंदान्नाची श्रीवल्ली या गावातील बनी ही एक ग्लॅमरस भूमिका आहे आणि तिने या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या प्रेयसीची भूमिका अप्रतिम केली आहे. फहद फासिलने भंवर सिंग शेखावत, आयपीएस, धनंजयने जॉली रेड्डीची भूमिका साकारली आहे, तर सुनीलने मंगलम श्रीनूची भूमिका केली आहे आणि अनसूया भारद्वाजने दाक्षयणीची भूमिका केली आहे. याहूनही विशेष गोष्ट म्हणजे सामंथाने तिच्या कारकिर्दीतील पहिले आयटम सोंग दिले आहे. अंतवा ओओ अंतवा या गाण्यात ती आकर्षक दिसली आहे.
कमकुवत बाजू :
पुष्पाची एक मोठी कमतरता म्हणजे चित्रपटाची लांबी. तीन तासांच्या कालावधीसह, आपल्याला असे वाटते की दृश्ये अनेक भागात ड्रॅग केली आहेत. तसेच, चित्रपटाचा वेग उत्तरार्धात मंदावतो. चित्रपटात मुख्यत: उत्तरार्धात नायक-खलनायक संघर्षाची दृश्ये नाहीत. चित्रपट दोन भागांत सेट केल्यामुळे, क्लायमॅक्स फिकट दिसतो.
तांत्रिक बाबी:
अॅक्शन ड्रामाचे फॉरेस्ट व्हिज्युअल आणि मूड उत्तम प्रकारे हायलाइट केल्यामुळे मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांचे उत्कृष्ट कॅमेरा-वर्क केले आहे. देवी श्री प्रसादचे संगीत अव्वल दर्जाचे आहे. कारण सर्व गाणी उत्कृष्ट आहेत आणि चांगली चित्रित देखील आहेत. डीएसपीने डाकको डाकको मेका आणि सामी सामी सारखी हिट गाणी दिली आहेत. चंद्र बोस यांचे गीत अप्रतिम आहेत. रेसुल पुकुट्टीने चित्रपटाच्या साउंड डिझाइनवर काम केले. एडिटिंग आणि री रेकॉर्डिंग फार छान नाही.