Raghuveer Movie Review : मन:शक्ती ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या रामदास स्वामींची कथा
By संजय घावरे | Published: August 26, 2024 12:50 PM2024-08-26T12:50:37+5:302024-08-26T12:53:31+5:30
Raghuveer Movie Review : मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी जगताला देणाऱ्या रामदास स्वामींची महती दिग्दर्शक निलेश कुंजीर या चित्रपटात वर्णन केली आहे.
'संसाराच्या नांवें घालूनियां शून्य। वाढता हा पुण्य धर्म केला।।' या संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगातील शब्दरचना ज्या संतांना तंतोतंत लागू होतात त्या समर्थ रामदास स्वामींनी खऱ्या अर्थाने संसाराच्या मोहातून मुक्त होत विश्वरूपी संसार थाटला. मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी जगताला देणाऱ्या रामदास स्वामींची महती दिग्दर्शक निलेश कुंजीर या चित्रपटात वर्णन केली आहे.
कथानक : सोळाव्या शतकातील थोर संत रामदास स्वामींचा जीवनप्रवास, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची शिकवण यात आहे. १६०८ मध्ये जांब गावी सूर्याजीपंत आणि राणूबाई यांना द्वितीय पुत्ररत्नाचा लाभ झाला. या मुलाचे नाव नारायण ठेवण्यात आले. बालपणापासूनच नारायणाला संपूर्ण विश्वाची चिंता सतावू लागली. १२ व्या वर्षी नारायणाचे लग्न ठरवले जाते, पण मंगलाष्टकातील 'शुभमंगल सावधान' शब्द ऐकताच तो लग्न मंडपातूनच पळ काढतो. प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन होऊन १२ वर्षे भ्रमंती करत असताना नारायणाचे रामदास स्वामी बनतात.
लेखन-दिग्दर्शन : ज्ञान, भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडवणारी कथा प्रेरणादायी असून, आध्यात्माने ओतप्रोत भरलेली आहे. पटकथेची मांडणीही त्याच पद्धतीची आहे. रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक शाळकरी मुलांनाही तोंडपाठ आहेत. भक्तीसोबत त्यांनी व्यायामाचे महत्त्वही पटवून दिले. परचक्र येताच टाळ वाजवणाऱ्या हातांना तलवारीही धरता आल्या पाहिजेत हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवला. जागोजागी मठ सुरू करताना स्त्री सक्षमीकरणाचे महत्त्वही पटवले. ११ मारूतींची प्राणप्रतिष्ठापना केली. दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिला. कल्याणसारखे असंख्य शिष्य घडवत आपल्या पश्चातही रामनामाचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला. संवाद मार्मिक आणि अर्थपूर्ण आहेत. काही घटना अधिक तपशीलवार येण्याची गरज होती. सोळाव्या शतकातील वातावरण निर्मिती करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नाट्यमय घडामोडी फार नसल्याने काहीसा माहितीपटासारखा फिल येतो. रवींद्र साठ्येंच्या आवाजातील गाणे श्रवणीय आहे. हिमालयापासून वाळवंटापर्यंतचे चित्रीकरण अप्रतिम आहे.
अभिनय : यापूर्वी ऐतिहासिक भूमिकांमध्ये झळकलेल्या विक्रम गायकवाडने समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत जीव ओतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. संयमी व्यक्तिरेखा साकारताना चुकीचे दिसताच तापट स्वभावाची झलकही चांगल्याप्रकारे सादर केली आहे. ऋजुता देशमुख आईच्या व्यक्तिरेखेत शोभत नसली तरी तिने चांगले काम केले आहे. नवीन प्रभाकरने काहीसा ग्रे शेडेड वाटणारा छोटासा रोल उत्तम केला आहे. याखेरीज शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवळकर यांनीही चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : संत विचार, कथा, पटकथा, अभिनय, गीत-संगीत, दिग्दर्शन, वातावरण निर्मिती
नकारात्मक बाजू : इतिहासातील काही संदर्भ, माहितीपटासारखा वाटतो
थोडक्यात काय तर हा चित्रपट समर्थ रामदास स्वामींनी केलेले जगदोद्धाराचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा आहे. संतांचे आचार-विचार जाणून घेण्यासाठी एकदा हा चित्रपट पाहायला हवा.