मानमोड्या भूताचा थरार आणि 'स्त्री'चा नवा अवतार, कसा आहे 'स्त्री २'? वाचा Review

By संजय घावरे | Published: August 16, 2024 04:52 PM2024-08-16T16:52:44+5:302024-08-16T16:56:25+5:30

राजकुमार राव - श्रद्धा कपूर यांची भूमिका असलेला स्त्री २ रिलीज झालाय. सिनेमा पाहायला जाण्याआधी वाचा हा Review (stree 2)

rajkumar rao shraddha kapoor starring stree 2 movie review akshay kumar varun dhawan | मानमोड्या भूताचा थरार आणि 'स्त्री'चा नवा अवतार, कसा आहे 'स्त्री २'? वाचा Review

मानमोड्या भूताचा थरार आणि 'स्त्री'चा नवा अवतार, कसा आहे 'स्त्री २'? वाचा Review

Release Date: August 15,2024Language: हिंदी
Cast: राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना, अतुल श्रीवास्तव, मुश्ताक खान, सुनीता राजवर, आन्या सिंह
Producer: दिनेश विजान, ज्योती देशपांडेDirector: अमर कौशिक
Duration: दोन तास २९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

एखाद्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ असू शकते याची प्रचिती 'स्त्री २' पाहण्यासाठी सिनेमागृहात गेल्यास नक्कीच येईल. सस्पेंस आणि कॅामेडीचा अचूक संगम घडवत पहिल्या भागातील कथेच्या धाग्यात अगदी सहजपणे विणलेली पटकथा हा दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

कथानक : चंदेरी गावातील आणखी एका अजब घटनेची कहाणी यात आहे. एकीके चित्रपटाचा नायक विक्कीचा जीव स्त्रीवर जडलेला असल्याने वडीलांनी सांगूनही तो लग्नाला तयार नाही. दुसरीकडे गावामधील आधुनिक विचारसरणीच्या मुली एका मागोमाग एक गायब होत असतात. त्या पळून गेल्या असाव्यात असे गावकऱ्यांना वाटतं, पण मानमोड्या भूताची काळी सावली चंदेरीवर असते. तो बिट्टूच्या गर्लफ्रेंडलाही घेऊन जातो. त्यानंतर रुद्र आणि विक्की पुन्हा जनाला घेऊन येतात. या तिघांचा मानमोड्या भुताशी सामना होतो, तेव्हा स्त्री त्यांच्या मदतीला धावते.

लेखन-दिग्दर्शन : पटकथेतील नाट्यमय घडामोडी उत्कंठा वाढवतात. चित्रपट कुठेही न थांबता मनोरंजन करत राहातो. मिश्किल आणि विनोदी संवाद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर सहज हास्य फुलवण्यात यशस्वी होतात. सस्पेंसला कॅामेडीची अचूक जोड देताना कुठेही थिल्लरपणा करण्यात आलेला नाही. सुरुवातीच्या गाण्यात पहिल्या भागातील आशय अगदी थोडक्यात, पण पहिला भाग न पाहिलेल्या व्यक्तीलाही समजेल अशा प्रकारे मांडण्यात आला आहे. क्लायमॅक्स खूप मोठा असून, खूप वेळ चालतो. क्लायमॅक्स संपला तरी चित्रपट मात्र संपत नाही. 'भेडीया'ची झलक दाखवणारा भाग वाढला आहे. 'आज की रात...' गाण्यात तमन्नाचा जलवा पाहायला मिळतो. 'खेतों में तू आयी नय...' हे गाणंही छान आहे. सिनेमॅटोग्राफी, कोरिओग्राफी, वातावरण निर्मिती चांगली आहे. 

अभिनय : अभिनयाची छान भट्टी जमली आहे. राजकुमार रावने पुन्हा एकदा कमालीचा अभिनय करत लक्ष वेधलं आहे. स्त्रीच्या भूमिकेत श्रद्धा कपूरची एन्ट्री जरी उशीरा झाली असली तरी ती आल्यानंतर खऱ्या अर्थाने रोमांचक कथेत रोमांच निर्माण होतो. पंकज त्रिपाठीची आपली एक वेगळीच अभिनय शैली असून, त्याने ती या चित्रपटातही जपली आहे. खरी कमाल अभिषेक बॅनर्जीने जनाच्या भूमिकेत केली आहे. त्याच्या अभिनयाला तोड नाही. अपारशक्ती खुरानाने पहिल्या भागाप्रमाणे या भागातही छान साथ दिली आहे. 

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, कोरिओग्राफी, वातावरण निर्मिती
नकारात्मक बाजू : लांबलेला क्लायमॅक्स आणि गती
थोडक्यात काय तर हा एक धमाल हॅारर-कॅामेडी चित्रपट असल्याने वेळ काढून या चित्रपटाचा आनंद लुटायला हवा.

Web Title: rajkumar rao shraddha kapoor starring stree 2 movie review akshay kumar varun dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.