Ranchi Diaries movie Review:स्वप्नं दाखवण्याचा फुसका बार !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 08:32 AM2017-10-13T08:32:13+5:302023-08-08T19:16:16+5:30
जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी अशी जाहिरात करुन रांची डायरीज हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे.
छोट्याशा गावातून किंवा शहरातून आलेल्या काही जणांनी अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. कुणीही गॉडफादर नसताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मोजकेच असतात. छोट्या छोट्या शहरांमधील मुलांची स्वप्नं मोठी असतात. जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी अशी जाहिरात करुन 'रांची डायरीज' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे.मात्र सिनेमात ना स्वप्नं दिसली, ना इच्छा दिसली. स्वप्नं दाखवण्याच्या नादात कधी कॉमेडी, कधी अॅक्शन तर कधी थ्रिल दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न पूर्णतः रटाळ ठरवणारा सिनेमा म्हणजे 'रांची डायरीज'.
सिनेमाच्या शीर्षकावरुनच रांचीसारख्या शहराच्या बॅकड्रॉपवर या सिनेमाची कथा रंगते. स्वतःला गॉडफादर समजणारा भंपक असा पिंकू (ताहा शाह) रांचीत टोळी चालवतो. पिंकू शहरात छोटंसा फूड स्टॉल चालवून स्वतःची वेगळीच स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा जवळचा मित्र मोनू (हिमांश कोहली) हा एक इंजीनिअर असून त्याचीही स्वतःची काही स्वप्नं आहेत. स्वप्नातली नोकरी मिळवण्यासाठी एक दिवस मोठ्या शहरात जाण्याची त्याची इच्छा आहे. मोनूच्या जीवनात त्याची गुडिया (सौंदर्या शर्मा) नावाची गर्लफ्रेंडही आहे. शकीराप्रमाणे पॉप सेन्सेशन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची गुडियाची इच्छा आहे. गुडियाचं गायकीच्या कलेवर ठाकूर भैय्या (अनुपम खेर) नावाचा भ्रष्ट राजकारणीही फिदा आहे. स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मोनू आणि गुडिया त्यांचा मित्र पिंकूच्या साथीने बँक लुटण्याची योजना आखतात. मात्र बँक लुटण्याचा या तिघांचा प्लान चांगलाच फसतो. नक्षलवादी टोळीचा म्होरक्या आणि त्याची गँग या तिघांचं बँक लुटताना अपहरण करते. बँक लूट प्रकरणाचा तपास पोलीस दलातील एक प्रामाणिक अधिकारी असलेल्या लल्लन सिंह (जिमी शेरगिल)याच्याकडे येतो. या प्रकरणाचा गुंता लल्लन सिंह कशारितीने सोडवतो, गुडिया-मोनू-पिंकू यांची अपहरणकर्ते नक्षलींकडून सुटका होते का, स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी या तिघांना काय काय करावं लागतं याचा सगळा खेळ म्हणजे रांची डायरीज.
हुशार आणि मार्मिक असं लेखन करणारा लेखक अशी ओळख असलेल्या सत्विक मोहंती यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न चांगलाच फसला आहे. नेमकं सिनेमातून काय सांगायचं हे रुपेरी पडद्यावर मांडताना सत्विक मोहंती यांचा चांगलाच गोंधळ उडालाय. रांची डायरीज या सिनेमाकडे कॉमेडी सिनेमा म्हणून पाहिले तर त्यात कॉमेडी काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. सिनेमा पाहताना तुम्हाला काही कॉमेडी सीन्स दिसतील मात्र ते कळण्याआधीच स्क्रीनवरुन निघून जातात. बँक लूटसारखी घटना दाखवून स्वप्नपूर्ती करण्याची कथा दाखवून दिग्दर्शकाला नेमके काय सिद्ध करायचे होते असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहत नाही.सिनेमाच्या कथेला ना सुरुवात आहे ना शेवट असेच म्हणावे लागेल. सत्विक मोहंती यांनी रांची डायरीजमधून बिहारी जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र यांतही भाषा मांडताना त्यांचा गोंधळ उडालाय.
सिनेमात गुडियाची भूमिका नवोदित अभिनेत्री सौंदर्या शर्मा हिने साकारली आहे.शकीरासारखं बनण्याचे स्वप्न असलेली सौंदर्या नावाप्रमाणेच सिनेमात ग्लॅमरस दिसली आहे. मात्र ग्लॅमरस दिसण्यापलीकडे अभिनयाच्या दृष्टीने तिची उपस्थिती जाणवत नाही. 'यारीयाँ' सिनेमातून पदार्पण केलेल्या हिमांशने या सिनेमात मोनू ही भूमिका साकारली आहे.मात्र त्याची भूमिका पाहून त्याने अभिनयाऐवजी दुसरे काही तरी केल्यास त्याला करियरमध्ये अधिक यश मिळेल असे वारंवार वाटत राहते. मात्र सौंदर्या आणि हिमांशच्या तुलनेत पिंकू साकारणारा ताहा शाह बराच उजवा ठरतो. त्यानं साकारलेली भूमिका रसिकांना रांचीमधल्या एखाद्या व्यक्तीशी मिळतीजुळती वाटते.
सिनेमात ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी या सिनेमात ठाकूर भैय्या ही भूमिका साकारली आहे. मात्र पहिल्यांदाच अनुपम खेर निर्मात्याच्या भूमिकेत आहेत.त्यामुळे त्यांचं अधिक लक्ष अभिनयापेक्षा हे सिनेमाच्या निर्मितीवरच होते की काय असं त्यांच्या भूमिकेकडे पाहून वाटतं. अभिनेता जिमी शेरगिलनं साकारलेला पोलीस इन्स्पेक्टर लल्लन सिंग भलताच भाव खाऊन जातो. सतीश कौशिक यांनी एस. आय.चौबेची भूमिका साकारत धम्माल मनोरंजन केलं आहे.
आजवर स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या थीमवर आधारित अनेक सिनेमा आले आहेत. मात्र रांची डायरीज सिनेमात काहीच वेगळे पाहायला मिळत नाही. उलट स्वप्नपूर्तीचा मंत्र सांगताना मनोरंजन करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न फसला आहे. सिनेमातून मनोरंजनाचा एक्स फॅक्टरच गायब आहे. त्यामुळे दिवाळीआधी रुपेरी पडद्यावर छोट्या शहरातील मुलांची स्वप्नं दाखवण्याचा प्रयत्न फुसका बार ठरला आहे. त्यामुळे चांगल्या आणि फुल टू मनोरंजन करणारा सिनेमा पाहायची इच्छा असेल तर तुम्हाला दिवाळी रिलीज धमाक्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.