Review : भरकटलेली ‘एक हसीना’ अन् कंटाळवाणा ‘एक दिवाना’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 10:37 AM2017-06-30T10:37:39+5:302023-08-08T19:16:16+5:30
दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.
भूत, आत्मा आणि प्रेमकथा या विषयाला अनुसरून आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली गेली. यातील काही चित्रपट असेही होते की, ते केव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाले अन् गेले याचा प्रेक्षकांना थांगपत्ताच लागला नाही. आता या यादीत दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाचा समावेश झाला, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.
चित्रपटाची कथा ‘भूत-प्रेत, आत्मा’ अशा विचित्र विषयाला घेऊन सुरू होते. नताशा (नताशा फर्नांडिस) आणि सनी (उपेन पटेल) भारतातून इंग्लंडला जातात. तेथील एका आलिशान महालात त्यांचे महिनाभरानंतर लग्न होणार असते; मात्र या महालात नताशाबरोबर अशा काही विचित्र घटना घडत जातात, ज्यामुळे त्यांच्या लग्नात विघ्न येते. नताशाचे काका ५५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देऊन नताशाच्या मागे आत्मा असावी, असा अंदाज वर्तवितात. आपण याठिकाणी पहिल्यांदा आलो नसून, यापूर्वीच आपले या ठिकाणाशी कनेक्शन असावे असा नताशालाही भास होतो.
याच दरम्यान, नताशाच्या आयुष्यात देवधर (शिव दर्शन) याची एंट्री होते. महिनाभरात सनीसोबत लग्न करणारी नताशा देवधरच्या प्रेमात पडते. पुढे या दोघांमध्ये रोमान्स रंगतो; मात्र एक दिवस नताशाला असे एक रहस्य समजते, ज्यामुळे तिच्या आयुष्यात वादळ येते. कारण देवधर हा वास्तवात नसून, एक आत्मा असतो. नताशालादेखील आपले याच्याशी काहीतरी जुने नाते असावे असा भास होतो. याचदरम्यान ‘खरंच भूत असते काय?’ याविषयावर चर्चा रंगते. चर्चे अखेर भूत नसते, असा निष्कर्ष काढला जातो. मग नताशाबरोबर घडत असलेला हा सर्व प्रकार काय आहे? याच्या उत्तराचा शोध घेतला जातो. जेव्हा त्याचा उलगडा होतो, तेव्हा कोणीतरी देवधरला आत्मा होण्याचा ड्रामा करण्यासाठी आणि नताशाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासाठी पैसे दिल्याचा धक्कादायक उलगडा होतो.
अर्थातच हा उलगडा खूपच कूचकामी असल्याने चित्रपटाची कथा अखेरपर्यंत भरकटत जाते. कथेत येणारे वळण एकमेकांशी साम्य साधणारे नसल्याने निर्मात्यांनी उगाचच कथा १०५ मिनिटे लांबविल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर सुनील दर्शन यांनी मुलाला घेऊन चित्रपट बनविताना चांगली कथा निवडणे अपेक्षित होते. शिवाय करिअरच्या दुसºया चित्रपटातही शिव आपला प्रभाव टाकण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते. डायलॉग डिलिव्हरी असो वा अभिनय याच्यात तो जुन्याच चुका करताना दिसतो. नताशा फर्नांडिस आणि उपेन पटेल यांचा अभिनय काहीसा सरस असल्याने चित्रपट किंचितसा सावरला जातो.
याशिवाय नदिम यांनी १९९० च्या दशकातील संगीताचा टच दिल्याने चित्रपटातील गाणी सरस ठरतात. सिनेमॅटोग्राफी आणि भव्य लोकेशन डोळ्याचे पारणे फेडणारे असल्याने प्रेक्षकांना तिकिटासाठी पैसे खर्च केल्याचे काहीसे समाधान मिळते; मात्र त्याचबरोबर मध्यंतरात खलनायकाकडून गोळी खाणारा अभिनेता... अभिनेत्रीला वाचविण्यासाठी चक्क देवाकडून चौदा दिवसांचे जीवदान मागणारा अभिनेता... ज्या दिवशी खलनायकाचा अंत होतो, त्याच दिवशी अभिनेत्याचाही अखेर...ही सर्व लांबणारी कथा बघून निर्माता आणि दिग्दर्शकांनी कोणता विचार करून कथा पडद्यावर रंगविली असावी, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा चित्रपट बघितला नाही, तरी चालेल.