Rukh Movie Review:नातेसंबंधांची सरळ साधी कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 05:20 AM2017-10-27T05:20:44+5:302023-08-08T19:16:16+5:30
रुख या सिनेमाची कथा साधी,सरळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली आहे. एकामागून एक समोर येणा-या धक्कादायक गोष्टींवर आधारित आहे.
रुख या सिनेमाची कथा साधी,सरळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली आहे. एकामागून एक समोर येणा-या धक्कादायक गोष्टी यामुळे रुख आणखी रंजक वाटू लागतो ही सिनेमाची जमेची बाजू. दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शनाची चुणूक दाखवलीय. लोकेशन्स, कॅमेरा वर्क सारं काही तुम्हाला तुमच्या सीटवर खिळवून ठेवेल. बाप-लेकाचं नातं साध्या पद्धतीने दाखवलं असलं तरी त्यात वेगळीच जादू अनुभवण्यास मिळते. मनोज वाजपेयीचं मुलावर असलेलं प्रेम आणि लेकाचं म्हणजेच आदर्श गौरवचं वडिलांवर असलेलं प्रेम मोठ्या खूबीनं दाखवण्यात आलंय. आईचं प्रेम दाखवण्यातही दिग्दर्शकानं कोणतीही कसर सोडलेली नाही.तेही तितक्याच गहि-या पद्धतीने दाखवण्यात आलंय.सोबतच ध्रुवच्या संघर्षाला मित्रांचीही साथ लाभते.त्यामुळे नातेसंबंध दाखवणारा 'रुख' असंही या सिनेमाबद्दल म्हणता येईल.
अभिनयाच्या बाबतीत मनोज वाजपेयीनं त्याच्या वाट्याला आलेली दिवाकर म्हणजेच वडिलांची भूमिका मोठ्या खूबीने साकारली आहे.या भूमिकेतील मनोज वाजपेयीचा अभिनय म्हणजे सिनेमाची मोठी जमेची बाजू. स्मिता तांबेनं जीव ओतून भूमिका साकारत आईच्या भूमिकेला पूरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.आदर्श गौरवने साकारलेली मुलाची भूमिका पाहून कुणालाही त्याचं कौतुक करावसंच वाटेल.कुमुद मिश्रा आणि इतर कलाकारांचे छोटे मात्र तितकेच प्रभावी आणि तगडे परफॉर्मन्स पाहायला मिळतात.कथानुरुप कलाकारांची निवड योग्यरित्या झाली आहे असंच म्हणता येईल.सिनेमातील दोन गाणी 'है बाकी' आणि 'खिडकी' कथेला साजेशी अशीच आहेत. संगीतही तितकंच प्रभावी असून त्यामुळे कथेशी चटकन कनेक्ट होता येतं.
सिनेमात बॉलिवूड सिनेमांचा मसाला नसून गंभीर गोष्टींना घेऊन रुखचं कथानक पुढे सरकतं ही बाब रसिकांना खटकू शकते.सिनेमाचा वेग खूपच धीमा आहे असं तुम्हाला राहून राहून वाटेल.सिनेमाच्या एडिटिंग दरम्यान कथेला आणखी क्रिस्प करण्याचा नक्कीच वाव होता.सिनेमाची कथा साधी सरळ आहे मात्र त्या कथेत सस्पेन्स आला असता तर रुख आणखी रंजक नक्कीच झाला असता.रुख हा कमी बजेटचा सिनेमा असून सिनेमा आणि कथेच्या मर्यादा दिग्दर्शक तसंच निर्मात्यांना माहिती आहेत.आता 'गोलमाल अगेन' सुपरडुपर हिट,'सिक्रेट सुपरस्टार'ची जादूही कायम असताना तसंच या आठवड्यात रिलीज होणा-या 'जिया और जिया' या सिनेमाचे पर्याय असताना रसिक 'रुख'कडे 'रुख' करणार का हे पाहणं रंजक ठरेल.