Sachin a billion dreams review : मैदानाबरोबरच पडद्यावरही सचिन...सचिन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2017 10:12 AM2017-05-26T10:12:06+5:302023-08-08T20:09:54+5:30
क्रिकेटच्या मैदानाबरोबरच पडद्यावरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपले ‘ड्रीम्स’ रंगविण्यात यशस्वी झाला आहे, असे म्हणावे लागेल. कारण ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट नसून, सचिनच्या आयुष्यातील चढ-उतार, यश-अपयश सांगणारा एक ‘डॉक्यूड्रामा’ आहे.
क्रिकेटच्या मैदानाबरोबरच पडद्यावरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपले ‘ड्रीम्स’ रंगविण्यात यशस्वी झाला आहे, असे म्हणावे लागेल. कारण ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट नसून, सचिनच्या आयुष्यातील चढ-उतार, यश-अपयश सांगणारा एक ‘डॉक्यूड्रामा’ आहे. त्यामुळे क्रिकेट वेड्या अन् सचिनच्या चाहत्यांसाठी शुक्रवारचा दिवस त्याच्या आयुष्यातील विविध पैलू जाणून घेण्यास महत्त्वपूर्ण ठरला, असे म्हणाता येईल.
सचिनच्या क्रिकेट अन् खासगी जीवनाशी संबंधित व्हिडीओच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा स्वत: सचिन सांगताना बघावयास मिळतो. चित्रपटाची सुरुवातच अशा व्हिडीओने केली जाते जो सचिनच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. हा व्हिडीओ सचिनची मुलगी साराच्या जन्मप्रसंगीचा आहे. सचिन आपल्या चिमुकलीला हातात घेऊन ‘हिला कडेवर घेताना मला खूप भीती वाटत आहे’ असे म्हणताना दिसतो. यानंतर सचिनच्या लहानपणीची कथा सुरू होते. ज्या गल्लीत सचिनने क्रिकेटचे धडे घेतले त्याच ठिकाणी खोडकर सचिनला बघताना प्रेक्षकांच्या चेहºयावर हास्य उमलते. कधी शेजाºयांच्या चारचाकीचे टायर पंक्चर करणारा, तर कधी मित्रांशी पंगा घेणारा सचिन मैदानावर एवढा शांत कसा असायचा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
एक दिवस सचिनची मोठी बहीण काश्मीर ट्रिपवरून त्याच्यासाठी बॅट घेऊन येते. तेथूनच त्याचे क्रिकेटप्रतीचे आकर्षण वाढत जाते. भाऊ अजित तेंडुलकरबरोबर तो क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो. जेव्हा १९८३चा वर्ल्डकप होतो, तेव्हा कपिल देव यांच्या हातातील ट्रॉफी बघून तो खूपच उत्साहित होतो. आपणही एक दिवस अशीच ट्रॉफी हातात घेऊ असा तो निर्धार करतो. पुढे अजित त्याला रमाकांत आचरेकर गुरुजींकडे घेऊन जातो. तेथूनच सचिनच्या क्रिकेटचा प्रवास सुरू होतो. कठोर मेहनत करून तो स्वत:ला सिद्ध करतो. वयाच्या १६व्या वर्षी त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड, पुढे पाकिस्तानसोबतच्या मॅचमध्ये केलेली चमकदार कामगिरी अन् त्यानंतर कर्णधारपद हा संपूर्ण प्रवास बघताना सचिनचे आयुष्य उलगडत जाते. आयुष्यातील चढउतार अन् चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन देशासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना एखाद्या क्रिकेटपटूला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याचा थरार सचिनच्या तोंडून ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात.
वास्तविक ‘भाग मिल्खा भाग’ किंवा ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या कथात्मक चित्रपटांप्रमाणे सचिनचा हा चित्रपट नाही. हा डाक्यूड्रामा असल्याने यामध्ये सचिनशी संबंधित अनेक क्रिकेटपटूंच्या मुलाखती पडद्यावर बघावयास मिळतात. शिवाय भाऊ अजितसह पत्नी अंजलीही सचिनचा संघर्ष सांगताना दिसत असल्याने त्याचे खासगी आयुष्य उलगडण्यास मदत होते. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा विश्वस्तरावर लौकिक मिळवून देशाचा सन्मान कसा वाढवितो, याचा संघर्ष पडद्यावर बघणे खूपच रोमांचक अनुभव देऊन जातो. चित्रपटात क्रिकेटशी संबंधित अनेक रोमांचक क्षण दाखविण्यात आले आहेत. जसे की, ‘वेंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेल यांच्यातील खुन्नस, सचिन आणि शेन वार्नमधील लढत, वडिलांच्या मृत्यूनंतरही वर्ल्ड कप टीममध्ये सहभागी होऊन देशासाठी मैदानावर उतरणे, शारजाह कप, सौरव गांगुलीचे हवेत टी-शर्ट उडविणे, २००३ मधील फिक्सिंग प्रकरण, २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा आनंदोत्सव अन् निवृत्तीचा तो क्षण’ प्रेक्षकांच्या तोंडून सचिन...सचिन हे उद्गार काढण्यास भाग पाडतात.
एकंदरीतच, तुम्ही जर क्रिकेट त्यातही सचिनचे चाहते असाल तर हा चित्रपट बघण्यास हरकत नाही. मात्र हा एक ‘डाक्यूड्रामा’ असल्याची जाणीव ठेवूनच तुम्हाला चित्रपटगृहात बसावे लागेल, अन्यथा तुमची निराशा होण्याची शक्यता आहे.