रहस्य आणि भीतीचा थरारक अनुभव, कशी आहे सई ताम्हणकरची 'मानवत मर्डर्स' वेब सीरिज? वाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Published: October 5, 2024 10:29 AM2024-10-05T10:29:31+5:302024-10-05T10:30:19+5:30
Manvat Murders : १९७२च्या काळात परभणीमधल्या मानवत गावात घडलेल्या हत्याकांडाच्या तपासाची गोष्ट या वेब सिरीजमध्ये आहे.
१९७२च्या काळात परभणीमधल्या मानवत गावात घडलेल्या हत्याकांडाच्या तपासाची गोष्ट या वेब सिरीजमध्ये आहे. पोलिस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांच्या 'फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम' या पुस्तकावर आधारलेल्या या वेब सिरीजमध्ये सत्यामागचे सत्य शोधण्याचा केलेला प्रयत्न दिग्दर्शक आशिष बेंडेने सादर केला आहे.
कथानक : रमण राघवसारख्या क्रूरकर्माला पकडणारे रमाकांत कुलकर्णी एकीकडे पोलिस अधिकाऱ्यांना तपासाचे सूत्र समजावून सांगत असतात, तर दुसरीकडे मानवतमध्ये पार्वती नावाच्या स्त्रीच्या रूपात सातवी हत्या होते. दीड वर्षात झालेल्या सात हत्यांचा गुंता सोडवण्यासाठी कुलकर्णींना तातडीने मानवतला पाठवले जाते. संशयितांकडून मारझोड न करता माहिती घेण्याचा हातखंडा असलेले कुलकर्णी गावात येतात. मानवतमधील उत्तमराव, रुक्मिणी आणि समिंद्री तसेच इतर लोकांशी संवाद साधत ते कशाप्रकारे हत्याकांडाचा गुंता सोडवतात ते यात आहे.
लेखन-दिग्दर्शन : गिरीश जोशींनी लिहिलेली मुद्देसूद पटकथा आणि संवाद चांगले आहेत. हत्या झालेल्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा कुलकर्णी आणि त्यांची टिम पोहोचते तेव्हा केलेले चित्रण छान जमून आले आहे. बोलीभाषा, वेशभूषा, राहणीमान यावर विशेष भर दिला आहे. काही ठिकाणी सत्तरच्या दशकातील वातावरणनिर्मिती करताना राहिलेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येऊ शकेल. रहस्य आणि भीतीची यशस्वी सांगड घालण्यात आली आहे. आजवर कधीही न पाहिलेल्या रूपात दिग्गज कलाकारांची निवड केली जाणे आणि त्या सर्व कलाकारांनी घेतलेली मेहनत ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पार्श्वसंगीत कथानकातील रहस्य आणखी गडद करते.
अभिनय : आशुतोष गोवारीकरांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाने साकारलेले रमाकांत कुलकर्णी लक्षात राहण्याजोगे आहेत. कुलकर्णींची प्रतिमा कॅमेऱ्यासमोर सादर करताना कुठेही गोवारीकर दिसत नाहीत. सोनाली कुलकर्णीच्या रूपातील रुक्मिणी अफलातून झाली आहे. प्रथमच अशाप्रकारचे डार्क झोनमधील कॅरेक्टर करताना सोनालीने सर्वस्व ओतले आहे. सई ताम्हणकरने रंगवलेल्या समिंद्रीला तोड नाही. बोलीभाषेपासून वेशभूषेपर्यंत सर्वच बाबतीत मेहनत घेतली आहे. मकरंद अनासपुरेमधील खरा अभिनेता यामध्ये पाहायला मिळतो. इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, बोलीभाषा, वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत
नकारात्मक बाजू : मसालेदार वेब सिरीजच्या चाहत्यांची निराशा होईल
थोडक्यात काय तर सत्य घटनांवर आधारलेली ही वेब सिरीज मनाचा थरकाप उडवणारी आहे. दिग्दर्शनापासून अभिनयापर्यंत सर्वच बाबींमध्ये वेगळेपण जाणून घेण्यासाठी ही सिरीज पाहायला हवी.