Sajini Shinde Ka Viral Video Movie Review: सस्पेन्स अन् थ्रिलरसह समाजाला आरसा दाखवणारा सिनेमा
By संजय घावरे | Published: October 27, 2023 04:00 PM2023-10-27T16:00:49+5:302023-10-27T16:02:23+5:30
दिग्दर्शक मिखिल मुसळेने कुठेही अतिशयोक्ती किंवा अतिरंजीतपणाचा आधार न घेता हा सस्पेंस थ्रिलर अतिशय साधेपणाने सादर केला असून, मराठी कलाकारांची त्याने केलेली निवड सार्थ ठरली आहे.
चित्रपटाचं शीर्षक आणि पोस्टरवर दिसणाऱ्या मराठमोळ्या कलाकारांच्या चेहऱ्यांमुळे यामुळे हा मराठी चित्रपट असल्याची कित्येकांची गफलत होते, पण अफलातून अनुभव देणारा हा हिंदी सिनेमा आहे. दिग्दर्शक मिखिल मुसळेने कुठेही अतिशयोक्ती किंवा अतिरंजीतपणाचा आधार न घेता हा सस्पेंस थ्रिलर अतिशय साधेपणाने सादर केला असून, मराठी कलाकारांची त्याने केलेली निवड सार्थ ठरली आहे.
कथानक -
ही गोष्ट विज्ञानाची शिक्षीका सजनी शिंदेची आहे. मुलांना शिकवण्यासोबतच रिल बनवण्याच्या सवयीमुळेही सजिनी पॉप्युलर असते. शाळेतील सहकाऱ्यांसोबत ती आॅफिशियर ट्रीपला सिंगापूरमध्ये जाते. योगायोगाने तेव्हा सजनीचा वाढदिवस असल्याने ती सेलिब्रेशनसाठी क्लबमध्ये जाते. तिथे सजनीने केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तिच्या जीवनात वादळ येते. मुख्याध्यापिका तिचा शाळेतून काढतात, होणाऱ्या नवऱ्याकडूनही पाठिंबा मिळत नाही आणि वडील सूर्यकांत शिंदे यांच्या भीतीमुळे सुसाईड नोट लिहून सजनी गायब होते. तिला शोधण्याची जबाबदारी पोलिस अधिकारी बेला बारूद आणि राम पवार यांच्याकडे येते.
लेखन-दिग्दर्शन -
सिनेमाची वनलाईन सुरेख आहे. अखेरच्या क्षणापर्यंत रहस्य उलगडू न देता रसिकांना खिळवून ठेवणं हे या सस्पेंस-थ्रिलरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप संवादलेखन आणि कलाकारांची शैलीदार संवादफेक लक्ष वेधून घेते. कलाकारांच्या अचूक निवडीसाठी निखिलला शंभर गुण द्यावे लागतील. मराठी तरुणीची कथा असल्याने मराठमोळं वातावरण तयार करण्यात आलं आहे. तरुणाईचा सोशल मीडियावरील वावर, वडीलांची म्हणजेच जुन्या पिढीतील लोकांची विचारसरणी, प्रतिष्ठा जपण्याच्या शाळांच्या प्रयत्नामुळे शिक्षकांवर वाढणारा दबाव, पोकळ स्त्रीवादी विचार असे समाजातील विविध मुद्दे एकाच धाग्यात गुंफण्यात आले आहेत. सिनेमॅटोग्राफी हा कच्चा दुवा आहे. तपासकार्याचा वेग काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. पार्श्वसंगीत खूपच वेगळं आणि फ्रेश वाटतं. प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी शैली लक्ष वेधून घेते. चित्रपटाचा डार्क टोन रहस्य आणखी गडद करण्याचं काम करतो.
अभिनय -
निम्रत कौरचं कॅरेक्टर दमदार असून, तिने कडक अभिनय केला आहे. राधिका मदानच्या रूपातील सजनी मनमोहक असून, समाजातील असंख्य सजनींचं नेतृत्व करणारी आहे. चिन्मय मांडलेकरला पुन्हा एकदा मोठा ब्रेक मिळाला असून, त्याने संधीचं सोनं केलं आहे. क्लायमॅक्सपूर्वीपर्यंत सुबोध भावेचं कॅरेक्टर नेमकं कसं आहे ते समजत नाही. दमदार संवादफेक आणि चेहऱ्यावरील हावभाव यांच्या आधारे सुबोधने पिता आणि थिएटर आर्टिस्ट या दोन्ही छटा यशस्वीपणे सादर केल्या आहेत. किरण करमरकर आणि भाग्यश्रीच्या व्यक्तिरेखा छोट्या असल्या तरी महत्त्वपूर्ण आहेत. शशांक शेंडे आणि सोहम मुजूमदारनेही प्रभावी अभिनय केला आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत
नकारात्मक बाजू : सिनेमॅटोग्राफी, तपासकार्याची गती, संकलन
थोडक्यात काय तर एका हरवलेल्या शिक्षिकेचा शोध घेताना समाजाला आरसा दाखवण्याचा अफलातून केलेला प्रयत्न सर्वच पातळीवर उत्तम ठरल्याने हा सिनेमा एकदा अवश्य पाहायला हवा.