Tiger 3 movie review: दमदार संवाद, थरारक ॲक्शन आणि सलमानचा जलवा
By संजय घावरे | Published: November 13, 2023 02:00 PM2023-11-13T14:00:00+5:302023-11-13T14:42:32+5:30
Tiger 3 movie review: दमदार संवाद, धडाकेबाज ॲक्शन, शांतीचा संदेश यांचा संगम घडवणाऱ्या मनीष शर्मांच्या या चित्रपटात पुन्हा सलमानचा जलवा दिसतो.
सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीचा सिनेमा दिवाळीत प्रथमच रिलीज होत असल्याने याबाबत खूप उत्सुकता होती. टायगरच्या रूपात सलमान पुन्हा जादू करेल का, हिच चर्चा सगळीकडे सुरू होती. रसिकांचा कौल सलमानच्या बाजूने लागला आहे. दमदार संवाद, धडाकेबाज ॲक्शन, शांतीचा संदेश आणि सुरेख कॅमेरावर्क यांचा संगम घडवणाऱ्या मनीष शर्मांच्या या चित्रपटात पुन्हा सलमानचा जलवा दिसतो. शिवाय 'पठाण'ची फोडणी आहेच...
कथानक : कथा १९९९मध्ये लंडनमध्ये सुरू होते. लहानगी झोया वडिलांकडून बॅाक्सिंगसोबतच राष्ट्रभक्तीचेही धडे घेत असते. वडिलांची हत्या होताच आतिश रेहमानची झोयाच्या आयुष्यात एन्ट्री होते. तो तिला आयएसआय एजंट बनवतो. वर्तमानात ज्युनियर या आपल्या मुलासोबत टायगर आणि झोया आनंदात जगत असतात. अशातच गोपी आर्याला शत्रूच्या तावडीतून सोडवण्याची जबाबदारी रॅाच्या मुख्य अधिकारी मैथिली मेनन टायगरकडे सोपवतात. जखमी गोपी अखेरचा श्वास घेण्यापूर्वी एका सिक्रेट मिशनबाबत टायगरला सांगताना एक डबल एजंट पाकिस्तानला मदत करत असल्याचं सांगत झोयाचं नाव घेतो. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात आहे.
लेखन-दिग्दर्शन : यावेळी टायगरचा लढा माणुसकीच्या शत्रूसोबत आहे. शत्रूच्याच देशात घुसून त्यांच्याच सैन्यापासून त्यांच्या पंतप्रधानांचा बचाव करण्याचं काम टायगरने हाती घेतलं आहे. याला मसालेदार संवाद आणि थरारक ॲक्शनचा तडका देण्यात आला आहे. 'बेवजह मारते है वह टेररिस्ट होते है...', 'वक्त बदलने में वक्त नहीं लगता...', 'आतिषबाजी तुमने शुरू की, खत्म मैं करूंगा...', 'जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं...' हे डायलॅाग लक्षात राहतात. यातही टायगर हाणामारी करताना दिसला तरी दोन्ही देशांमध्ये शांतीचा संदेश घेऊन आला आहे. 'लेके प्रभू का नाम...' हे गाणं चांगलं झालं आहे. 'पठाण'सोबतचा फाईट सीन खूप छान झाला असला तरी, लांबलचक वाटतो. अखेरीस ऋतिक रोशनच्या 'वॅार'ची झलकही पाहायला मिळते. पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफी जमेच्या बाजू आहेत.
अभिनय : टायगर रूपात सलमान अधिक चपळ होतो हे पुन्हा एकदा जाणवलं. वय चेहऱ्यावर दिसू असलं तरी सलमानचा जलवा कमी झालेला नाही. एंट्री, स्टंटबाजी आणि संवादफेकीपर्यंत सगळीकडे तो टाळ्या-शिट्ट्यांचा मानकरी ठरतो. कतरिनाने केलेले स्टंटस जबरदस्त असले तरी अद्यापही तिला हिंदी उच्चार नीट करता येत नाहीत आणि यावर आपण काम करायला हवं असंही तिला वाटत नसल्याचं आश्चर्य वाटतं. इमरान हाश्मीने साकारलेला खलनायक मनाचा थरकाप उडवणारा वाटतो. कुमूद मिश्रांनी पुन्हा एकदा छान काम केलं आहे. रणवीर शौरी, रिद्धी डोग्रा, विशाल जेठवा, रेवती, सिमरन यांनी छोट्या भूमिकांमध्येही रंग भरले आहेत.
सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, ॲक्शन, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : लांबलचक ॲक्शन सीन, चित्रपटाची लांबी
थोडक्यात काय तर सलमानचा हा मसालापट फुल टू मनोरंजन करणारा असल्याने त्याचे चाहते हा पाहतीलच, पण इतरांनी एकदा पाहायला हवा.