Samantar 2 Review: कुमार-चक्रपाणीच्या 'समांतर' आयुष्याचा गुंता, रहस्य, थ्रिल रंगत जातं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 05:22 PM2021-07-01T17:22:36+5:302023-08-08T20:27:58+5:30
स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका असलेली बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'समांतर 2' अखेर भेटीला आली आहे. पहिल्या सिझनच्या उत्कंठावर्धक फिनाले नंतर दुसऱ्या सिझनकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतात का? जाणून घ्या आमच्या या सखोल रिव्ह्यू मधून.
स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका असलेली बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'समांतर 2' अखेर भेटीला आली आहे. पहिल्या सिझनच्या उत्कंठावर्धक फिनाले नंतर दुसऱ्या सिझनकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतात का? जाणून घ्या आमच्या या सखोल रिव्ह्यू मधून.
- चित्राली चोगले
कुमार महाजन (स्वप्निल जोशी) आणि सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) यांच्या आयुष्याशी जोडला गेलेला काळ चक्राचा 'समांतर' धागा नेमका काय आहे हे आपण 'समांतर' या गाजलेल्या वेबसिरीसच्या पहिल्या सिझन मध्ये अनुभवलं. कधीही भविष्यावर विश्वास न केलेल्या कुमार महाजनचं आयुष्य जेव्हा भविष्याच्या चक्रव्यूहात अडकतं तेव्हा त्यातून घडणारे ट्विस्ट आणि टर्न आणि त्यातला ड्रामा अतिशय रंजक पद्धतीत मांडला गेला. एका उत्कंठावर्धक टप्प्यावर येऊन हे पहिलं सिझन संपलं आणि अगदी तेव्हाच दुसऱ्या सिझनची उत्सुकता ताणली गेली. ज्या टप्प्यावर हे पहिलं सिझन संपलं तिथूनच या बहुप्रतीक्षित 'समांतर 2' ची सुरुवात होते. अगदी पहिल्या फ्रेमपासून आपल्याला माहित असतं की आता कथेत एक मोठा ट्विस्ट येणार आणि कुमारच्या आयुष्यात 'एक बाई' येणार. हाच मोठा ट्विस्ट आणि कथानकातील एक मोठा धमाका करत दुसरं सिझन सुरू होतं. एक बॅकस्टोरी दाखवत सिझनला सुरुवात होते. कुमार आणि निमा (तेजस्विनी पंडित) अखेर खुश आहेत आणि त्यांच्या आयुष्यात येणारी वादळं थोडीशी शमली आहेत असं वाटत असतानाच कथेत एन्ट्री होते 'त्या बाईची' म्हणजेच मीरा बाविस्करची (सई ताम्हणकर).
'समांतर 2'ची सुरुवात तर उत्तम होताना दिसते. या सिझनमध्ये कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी यांच्या आयुष्याचा 'समांतर' गुंता आपल्याला पाहायला मिळतो. भूतकाळ आणि वर्तमान काळात घडणाऱ्या समांतर गोष्टी कशा घडल्या ते दिग्दर्शनातून अगदी सहज आणि सोप्या पण तितक्याच रंजक पद्धतीत समीर विद्वांसने पोहचवलं आहे. या कथेत सई ताम्हणकर म्हणजेच चक्रपाणीची सुंदरा आणि कुमारची मीरा येताच कथेला एक वेग मिळतो. आधी कथा थोडी रेंगाळते आहे असं वाटत असतं पण या ट्वीस्टमुळे कथा पेस पकडते. कुमार मीरामध्ये गुंततो आणि त्यातून असं काहीतरी घडतं की त्याची रवानगी थेट तुरुंगात होते. कथा अधिक रंजक होणार अधिक थ्रीलिंग आणि रहस्यमय होणार असं वाटत असताना एक अपेक्षित वळण कथेत येतं. पण असं असताना सुद्धा 'लव्ह सेक्स धोका' अँगल आल्यामुळे कुतूहल नक्कीच निर्माण होतं. यापुढे कथेत काय होतं? कुमार महाजनच्या आयुष्यातील गुंता सुटणार का? चक्रपाणी आणि कुमार यांच्या आयुष्यातील समांतर धागा पुढे कोणतं वळण घेतो? सई ताम्हणकर कथेत पुढे काय घडवते? कुमार आणि निमा वेगळे होतात का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला हे 'समांतर 2' पहावं लागेल. आता ते पाहायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे. तर याचं उत्तर म्हणजे जर तुम्ही पहिलं सिझन पहिलं असेल तर दुसरं सिझन पाहण्यास काहीच हरकत नाही. 'समांतर 1' पेक्षा 'समांतर 2' अधिक रंजक, अधिक रहस्यमय असेल असं वाटलं होतं काही अंशी काही टप्प्यांवर ते त्या उंचीवर जातं देखील पण समांतर 1 ची आठवण आल्या शिवाय राहत नाही.
अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्याच कलाकारांनी दमदार काम केलं आहे. स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर यांच्या भूमिका नक्कीच छान रेखाटल्या गेल्या आहेत पण अनुभव गाठीशी असला की तो सहज दिसतो आणि तेच दिसून आलं आहे नितीश भारद्वाज यांच्या अभिनयातून. त्यांनी साकारलेला सुदर्शन चक्रपाणी सिझन 2 मध्ये अधिक प्रभावशाली वाटतो. काही कटाक्ष, रिॲक्शन्स इतके सहज आलेत त्यांच्याकडून की क्या बात. अभिनयाची बाजू उत्तम आहे दिग्दर्शन सुद्धा छान जमून आलं आहे. पहिलं सिझन ज्या उंचीवर सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शनातून नेऊन ठेवलं तशीच जादू समीर विद्वांस यांनी सुद्धा दुसर्या सिझनमध्ये केली आहे. 'त्या बाईचा' अँगल जरा ताणला गेल्यासारखा वाटतो पण एक नक्की की ह्या ट्रॅकमुळे कथेला एक वेगळी उभारणी मिळते. तुम्ही पहिलं सिझन पाहिलं नसेल तर ते सिझन पाहून नंतरच हे दुसरं सिझन पहा. कारण पहिल्या सिझनचे संदर्भ येत राहतात. या 'समांतर 2' कडून बऱ्याच अपेक्षा होत्या आणि 10 एपिसोड्स पाहिल्यावर त्या कुठेतरी नक्कीच पूर्ण झाल्या असं वाटतं. आणि हो 'समांतर 2' चा शेवट पुन्हा एकदा उत्कंठावर्धक टप्प्यावर करण्यात आला आहे. हा शेवट पाहून 'समांतर 3' येणार यावर शिक्कामोर्तब झालाय. एकंदरीत बोलायचं झालं तर 'समांतर 2' रंजक आहे आणि कुतूहल निर्माण करणारं सुद्धा. सिझन 2चा प्रभाव आपल्यावर जाणवू लागतो. ट्विस्ट आणि धक्के नक्कीच कुतूहल निर्माण करतात थोडी अपेक्षित वळणं टाळली असती तर अधिक उत्तम. संपूर्ण सिझन पाहिल्यानंतर सिझन 1 पुन्हा पहावासा सुद्धा वाटतो. आणि सिझन संपल्यावर 'समांतर 3' काय घेऊन येणार त्याची उत्सुकता नक्कीच मनात रहाते.