आधुनिक युगातील सावित्रीची कथा, कसा आहे 'सावी' चित्रपट? वाचा Review

By संजय घावरे | Published: May 31, 2024 04:34 PM2024-05-31T16:34:49+5:302024-05-31T16:35:23+5:30

दिव्या खोसला कुमारचा बहुप्रतिक्षित 'सावी' सिनेमा आज रिलीज झालाय. त्यानिमित्ताने वाचा savi review

Savi movie review starring divya khosla kumar anil kapoor harshvardhan rane | आधुनिक युगातील सावित्रीची कथा, कसा आहे 'सावी' चित्रपट? वाचा Review

आधुनिक युगातील सावित्रीची कथा, कसा आहे 'सावी' चित्रपट? वाचा Review

Release Date: May 31,2024Language: हिंदी
Cast: दिव्या खोसला, हर्षवर्धन राणे, अनिल कपूर, राजेश्वरी लूम्बा, मायराज कक्कर, हिमांशी चौधरी
Producer: मुकेश भट्ट, भूषण कुमार, कृष्ण कुमार शैलीDirector: अभिनय देव
Duration: दोन तास सहा मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

पती सत्यवानचे प्राण वाचवण्यासाठी यमाशी झगडणाऱ्या सती सावित्रीची पौराणिक कथा सर्वांनाच माहित आहे. मराठमोळा दिग्दर्शक अभिनय देवने या चित्रपटामध्ये आधुनिक काळातील एका अशा सावित्रीची कथा सादर केली आहे, जी आपल्या पतीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असते.

कथानक : लंडनमध्ये नकुल सचदेव आणि गृहिणी सावी सचदेव या जोडप्याची ही कथा आहे. एका सकाळी लंडन पोलिस येतात आणि नकुलला त्याच्या वरिष्ठांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करतात. सर्व पुरावे नकुलच्या विरोधात असल्याने वकील करूनही काही उपयोग होत नाही. न्यायालय नकुलला सजा सुनावते, पण आपला पती निरपराध असल्याची सावीला खात्री असते. पतीला वाचवण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करते, पण यशस्वी होत नाही. अखेर ती एक असा मार्ग निवडते जिथे तिला स्वत:च्या जीवाचीही बाजी लावावी लागते.

लेखन-दिग्दर्शन : या निमित्ताने सत्यवान-सावित्रीची आठवण आजच्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न अभिनयने केला आहे. यासाठी 'द नेक्स थ्री डेज' या हॅालिवूडपटाचा गाभा घेऊन पूर्णपणे स्त्रीप्रधान चित्रपट बनवला आहे. लंडन हे शहर कॅरेक्टरसारखं शूट केलं गेलं आहे. एकटी पडलेली सावी पुढे काय करणार ही उत्कंठा ठराविक अंतराने जागी ठेवण्यात आली आहे. जॅायदीप पॅालच्या भेटीसाठी सावीने केलेला संघर्ष आणि क्लायमॅक्समध्ये चोर-पोलिसांचा पकडापकडीचा डाव छान रंगवला आहे. काही ठिकाणी गती कमी झाल्यासारखी वाटते, तर एक-दोन ठिकाणी नीट संदर्भ लागत नाहीत, पण ते समजून घेता येतात. 'वादा हमसे करो...' आणि 'खोल पिंजरा...' ही गाणी चांगली आहेत.

अभिनय : आजवर बऱ्याचदा ग्लॅमरस भूमिकांमध्ये दिसलेल्या दिव्या खोसलाने अफलातून अभिनयाचं दर्शन घडवत साकारलेली सावी स्मरणात राहण्याजोगी आहे. हर्षवर्धन राणेच्या व्यक्तिरेखेला फार वाव नसला तरी त्याने आपलं काम चोख बजावलं आहे. अनिल कपूर या चित्रपटातील सरप्राईज फॅक्टर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या गेटअप्समध्ये प्रभावित केलं आहे. इतर कलाकारांनीही सहाय्यक भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.

सकारात्मक बाजू : संकल्पना, पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, वेशभूषा, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : सिनेमाची गती, काही संदर्भ
थोडक्यात काय तर कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर वर्तनाचं समर्थन करता येणार नाही, पण पतीवर संकट आल्यावर एखादी गृहिणीही सावित्री बनू शकते हा विचार मांडणारा हा चित्रपट एकदा पाहायला हवा.

Web Title: Savi movie review starring divya khosla kumar anil kapoor harshvardhan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.