Setters Movie Review : कलाकारांच्या अभिनयाने तारलेला 'सेटर्स'

By प्राजक्ता चिटणीस | Published: May 3, 2019 05:10 PM2019-05-03T17:10:30+5:302023-08-08T19:47:32+5:30

स्पर्धा पेपरचे पेपर सेट करणाऱ्या अशाच सेटर्सवर आधारित हा चित्रपट आहे.

Setters Movie Review : | Setters Movie Review : कलाकारांच्या अभिनयाने तारलेला 'सेटर्स'

Setters Movie Review : कलाकारांच्या अभिनयाने तारलेला 'सेटर्स'

Release Date: May 03,2019Language: हिंदी
Cast: श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, सोनाली सहगल, इशिता दत्ता
Producer: विकास मणि आणि नरेंद्र हीरावत Director: अश्विनी चौधरी
Duration: २ तास ६ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स


स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हेराफेरी होणे यात काही नवीन नाही. या परीक्षांमध्ये पेपर फुटणे. परीक्षेतील विद्यार्थ्याऐवजी दुसरा विद्यार्थी परीक्षेला बसवणे यांसारख्या बातम्या आपण नेहमीच वृत्तपत्रांमध्ये वाचत असतो. स्पर्धा पेपरचे पेपर सेट करणाऱ्या अशाच सेटर्सवर आधारित हा चित्रपट आहे.

- प्राजक्ता चिटणीस

स्पर्धा परीक्षांचे रॅकेट भैय्याजी (पवन मल्होत्रा) अनेक वर्षांपासून चालवत असतात. अपूर्व (श्रेयस तळपदे) त्यांचे सगळे काम पाहत असतो. त्यांचा अपूर्ववर प्रचंड विश्वास असतो. परीक्षा  व्हायच्या कित्येक तास आधी उत्तरासकट प्रश्नपत्रिका परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे, स्पर्धेला बसलेल्या विद्यार्थ्याऐवजी हुशार विद्यार्थ्यांला बसवणे हे त्याच्या साठी अतिशय सोपे काम असते. भैय्याजीचे हे हेराफेरीचे जाळे भारतभर पसरलेले असते. रेल्वे परीक्षेत देशभरात मोठ्या प्रमाणात पेपर फुटल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी एसीपी आदित्य सिंह (आफताब शिवदासानी) वर सोपवण्यात येते. अपूर्वा आणि आदित्य हे जुने मित्र असतात. पण ते एकमेकांशी अनेक वर्षे बोलत नसतात. भैय्याजी आणि अपूर्व यांना रंगेहाथ पकडण्यासाठी आदित्य तीन ऑफिसरची टीम तयार करतो. या टीममधील दोन जण सस्पेन्डेड ऑफिसर असतात तर एकाने नुकताच नोकरीचा राजीनामा दिलेला असतो. पण त्याचा राजीनामा न स्वीकारता आदित्य त्याला आपल्या या महत्त्वाच्या मिशन मध्ये सहभागी करून घेतो. हे चार जण मिळून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष देतात. या रॅकेटला पकडण्यात एसीपी आदित्य आणि त्याच्या टीमला यश मिळते का हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

सेटर्स या चित्रपटाची कथा चांगली आहे पण दिग्दर्शकला ती चांगल्या प्रकारे मांडता आलेली नाही. चित्रपटात आदित्य आणि अपूर्व चांगले मित्र होते असा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण त्यांच्या मैत्रीत कशामुळे दुरावा निर्माण झाला हे सांगण्यात आलेले नाही. तसेच काही संवादावरून आदित्यची पत्नी आणि अपूर्व यांच्यात पूर्वी प्रेमप्रकरण होते हे आपल्या लक्षात येते. पण त्याच्याविषयी देखील चित्रपटात काहीच संदर्भ देण्यात आलेला नाही. तसेच भैय्यायजीची मुलगी आणि अपूर्व यांची प्रेमकथा चित्रपटात का टाकण्यात आली तेच कळत नाही.

पेपर सेट करणाऱ्यांच्या मागावर सतत पोलीस असतानादेखील ते सहजपणे पेपर फोडतात ही गोष्ट पटत नाही. तसेच चित्रपटात आता पुढे काय होणार याची कल्पना आधीच येत असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहत नाही. सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत कॉपी करण्यासाठी कोणकोणते पर्याय वापरले जातात हे चित्रपटात खूप चांगल्याप्रकारे दाखवण्यात आले आहे. पेपरचा काळा बाजार कसा असतो, विद्यार्थी आणि त्यांचे पालक पेपर खरेदीसाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात या गोष्टी उत्तम प्रकारे मांडल्या आहेत. तसेच चित्रपटात पवन मल्होत्रा, आफताब शिवदासानी, श्रेयस तळपदे यांनी चांगली कामे केली आहेत. आफताबच्या वाट्याला अनेक दिवसानंतर चांगली भूमिका आली आहे. पण सोनल सेहगल, इशिता दत्ता या अभिनेत्रींना तितकासा वाव मिळालेला नाहीये. एकंदरीत या सेट केलेल्या पेपर मध्ये कथा कमकुवत असली तरी कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. त्यामुळे या परीक्षेला बसायचे की नाही हे तुम्ही तुमचे ठरवा.

Web Title: Setters Movie Review :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.