भन्नाट करण्याच्या नादात गंडलेला प्रयोग, कसा आहे माधवन - अजय देवगणचा शैतान?
By देवेंद्र जाधव | Published: March 8, 2024 12:36 PM2024-03-08T12:36:36+5:302024-03-08T13:04:16+5:30
अजय देवगण - आर.माधवनचा शैतान सिनेमा बघायचा विचार करताय? त्याआधी वाचा हा Review
कसंय.. तुम्ही हॉटेलमध्ये जाता.. पंचपक्वानांचं ताट मिळेल या अपेक्षेने.. हॉटेलमध्ये ताव मारायचाय म्हणून दिवसभर उपाशी राहता. पण हॉटेलला गेल्यावर कळतं की तुम्हाला हवी असलेला पदार्थ तिकडे उपलब्धच नाही. मग वेगळंच काहीतरी खाऊन तुम्हाला अपेक्षाभंग पदरात पाडून घरी यावं लागतं. बास्स! असंच काहीसं 'शैतान' बघताना तुमचं होऊ शकतं. काहीतरी भन्नाट करायच्या नादात सिनेमा थोडा गंडला आहे हे नक्की.
कथानक : 'शैतान'चं कथानक थोडक्यात सांगायचं तर... एक सुखी चौकोनी कुटुंब असतं. एक दिवस पार्टी करण्यासाठी हेच कुटुंब फार्म हाऊसवर जातं. तिथे त्यांच्या घरी फोन चार्ज करण्यासाठी एक अनोळखी व्यक्ती (वनराज) त्यांच्या घरात शिरतो. पुढे वनराज कुटुंबातील जान्हवीला त्याच्या वशमध्ये करतो. नंतर वनराज जसं सांगेल तशीच जान्हवी वागते. त्यामुळे जान्हवीचं कुटुंब प्रचंड घाबरते. काहीही करून वनराजला घराबाहेर काढण्यासाठी ते हर तऱ्हेचे प्रयत्न करतात. हा वनराज कोण असतो? तो जान्हवीला त्याच्या वशमध्ये का अडकवतो? त्याचा उद्देश नक्की काय असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'शैतान' पाहून मिळतील.
लेखन - दिग्दर्शन: 'शैतान'चं झालंय असं.. की काहीतरी भन्नाट, काहीतरी युनिक करायच्या नादात सिनेमा थोडा फसला आहे. ट्रेलर पाहून ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्या अपेक्षा सिनेमा पूर्ण करत नाही. मध्यंतराआधी कथेचा प्लॉट सेट करण्यात खूप वेळ घेतला आहे. मध्यंतरानंतर काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अनेक घटना दिसतात. परंतु विशेष काही नाही. सिनेमाचा क्लायमॅक्स चांगला रचला आहे. पण मुळात शैतानला नक्की काय सांगायचंय, तेच ठामपणे सिद्ध होत नाही. त्यामुळे सिनेमा संपल्यावर सगळं वरवरचं वाटतं. अमित त्रिवेदीने केलेलं संगीत 'शैतान'चे प्रसंग परिणामकारक करण्याचं काम करतं. विकास बहलचं दिग्दर्शन सुद्धा कमाल झालंय.
अभिनय: 'शैतान' सुरुवातीपासून शेवटपर्यंत आर. माधवनने त्याच्या अभिनयाने खिळवून ठेवलाय. माधवनच्या एन्ट्रीनंतर सिनेमात वेगळी रंगात निर्माण होते. विशेषतः क्लायमॅक्सला माधवनने जबरदस्त अभिनय केलाय. परंतु सशक्त कथानकाची साथ नसल्याने माधवनचा दमदार परफॉर्मन्स फोल ठरतो. अजय देवगण, ज्योतीका यांची कामंही ठीकठाक. वनराजच्या वशमध्ये गेलेल्या जान्हवीच्या भूमिकेत जानकी बोडीवाला हिने चांगला अभिनय केलाय.
सकारात्मक बाजू: संगीत, माधवनचा अभिनय, दिग्दर्शन
नकारात्मक बाजू: कथानक, संथ गती
'शैतान' आणखी खूप चांगला झाला असता. सिनेमाच्या कथानकात तशी ताकद होती. काहीतरी वेगळं पाहायला मिळेल म्हणून आपण सिनेमागृहात जातो. पण अंतिमतः पदरी निराशाच पडते. तरीही माधवनचे फॅन असाल आणि थ्रिलर सिनेमा बघण्याची आवड असेल, तर एकदा 'शैतान' नक्की बघू शकता.