Review: दोन मनं जोडणारी 'अनोखी गाठ'; जाणून घ्या, कशी आहे श्रेयस-गौरीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

By संजय घावरे | Published: March 1, 2024 04:14 PM2024-03-01T16:14:13+5:302024-03-01T16:14:44+5:30

Movie review: अमलाच्या आयुष्यात तो येतो आणि तिचं आयुष्य बदलून जातं. पण, त्यानंतर जे घडतं ते...

shreyas talpade and gauri imgawle he anokhi gaath movie review | Review: दोन मनं जोडणारी 'अनोखी गाठ'; जाणून घ्या, कशी आहे श्रेयस-गौरीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

Review: दोन मनं जोडणारी 'अनोखी गाठ'; जाणून घ्या, कशी आहे श्रेयस-गौरीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

Release Date: March 01,2024Language: मराठी
Cast: श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी
Producer: महेश मांजरेकर मुव्हीज, झी स्टुडिओजDirector: महेश मांजरेकर
Duration: 2 तास 06 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

कॅालेजमध्ये शिकणारी मुलगी आणि वयाने मोठा असलेला मुलगा यांना अनोख्या बंधनात बांधणारी लव्हस्टोरी या चित्रपटात महेश मांजरेकरांनी सादर केली आहे. नातेसंबंधांची गुंफण असलेली नाट्यमय वळणांची स्टोरी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवते. यातील नृत्य डोळ्यांना आणि गाणी कानांना सुखद अनुभव देतात. 'ही अनोखी गाठ' दोन मनं जोडणारी आहे.

कथानक : नृत्यात पारंगत असलेल्या महाबळेश्वरमधील अमलाची ही कथा आहे. सिनेमाच्या लोकेशन्सची पाहणी करण्यासाठी आलेल्या सिनेमॅटोग्राफर रोहितची नजर बेभान होऊन नाचणाऱ्या अमलावर पडते आणि तो देहभान हरपतो. तिसऱ्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडतो. अमलालाही तो आवडू लागतो. इकडे अमलाचे वडील तिच्या थोरल्या बहिणीचे लग्न तिच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या वकील श्रीनिवासशी ठरवतात. लग्नपत्रिका कुलदेवतेच्या चरणी ठेवण्याकरिता आई-बाबांसोबत अमलाची बहीण जाते. त्यानंतर जे घडतं ते उत्सुकता वाढवत राहातं.

लेखन-दिग्दर्शन : दिग्दर्शनासोबतच कथा-पटकथा लेखन करणाऱ्या मांजरेकरांनी पती-पत्नीच्या नात्यासोबतच वडील-मुलगी, प्रियकर-प्रेयसी, आई-मुलगा, सून-सासू, मैत्रीणी यांच्यातील नातीही बारकाईने सादर केली आहेत. हे करताना कुठेही मेलो ड्रामा होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. गौरीला नजरेसमोर ठेवून तिच्यातील नृत्यांगनेला वाव मिळेल अशा पद्धतीने तिचे कॅरेक्टर रेखाटले, जे तिच्यासाठी फायदेशीर ठरणारे आहे. मध्यंतरापूर्वी अनपेक्षित नाट्यमय वळणांमुळे उत्कंठा वाढते. चित्रपट पाहून बाहेर पडल्यावरही मनात रुंजी घालणाऱ्या 'ही अनोखी गाठ...' गाण्याचा सुरेख वापर केला आहे. हितेश मोडकनं संगीतबद्ध केलेली 'सखी माझे देहभान...', 'मुशाफिरा...' आदी गाणी श्रवणीय आहेत. महाबळेशवरमधील निसर्गाचा सुरेख वापर केला असून, वातावरण निर्मितीही चांगली आहे.

अभिनय : गौरी इंगवलेने पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यात यश मिळवलं आहे. प्लस पॅाईंट असलेल्या नृत्याचा तिने सुरेख वापर केला आहे. श्रेयस तळपदेने अत्यंत संयमीपणे साकारलेला श्रीनिवास लक्षात राहणारा आहे. गौरीसोबतचं त्याचं ॲक्शन-रिॲक्शनचं ट्युनिंग छान जमलं आहे. सुहास जोशींच्या साथीने त्याने सादर आई-मुलाचं हृदयस्पर्शी नातं सुरेखपणे सादर केलं आहे. ऋषी सक्सेनाच्या रूपातील प्रियकर मनात बरेच प्रश्न निर्माण करतो. शरद पोंक्षे यांनी सुरुवातीला रागीट आणि नंतर मवाळ झालेल्या वडिलांच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. 

सकारात्मक बाजू : लेखन, दिग्दर्शन, अभिनय, कोरिओग्राफी, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी
 

नकारात्मक बाजू : ॲक्शन आणि मसालेपटांच्या चाहत्यांना आवडणार नाही

थोडक्यात काय तर आजच्या मारधाडीच्या चित्रपटांच्या जमान्यात अशा प्रकारे संवेदनशीलपणे नात्यांवर भाष्य करणारे सिनेमे येणे गरजेचे असल्याने एकदा तरी हा सिनेमा नक्की बघायला हवा.

Web Title: shreyas talpade and gauri imgawle he anokhi gaath movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.