Super 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास
By तेजल गावडे | Published: July 12, 2019 04:12 PM2019-07-12T16:12:47+5:302023-08-08T19:47:32+5:30
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंड पहायला मिळतोय. आतापर्यंत खेळाडू, राजकीय नेते, कलाकार मंडळींच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले होते. मात्र पहिल्यांदाच एका सामान्य गणिततज्ज्ञाचा प्रवास रुपेरी पडद्यावर रेखाटण्यात आला आहे.
- तेजल गावडे
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंड पहायला मिळतोय. आतापर्यंत खेळाडू, राजकीय नेते, कलाकार मंडळींच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले होते. मात्र पहिल्यांदाच एका सामान्य गणिततज्ज्ञाचा प्रवास रुपेरी पडद्यावर रेखाटण्यात आला आहे. रामायणातील द्रोणाचार्य व एकलव्याची कथेचा संदर्भ घेत सुपर ३० चित्रपटात बिहारमधील द्रोणाचार्य अर्जुनला नाही तर एकलव्याला कुशल बनवताना दिसत आहेत. ही कथा आहे प्रतिभावंत गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांची. ज्यांनी आपलं करियर व प्रेमाचं बलिदान देऊन आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी तयार केलं होतं. त्यांचा हा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास अनुभवायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या कथेची सुरूवात फ्लॅशबॅकनं होतं. एका सामान्य कुटुंबातील हुशार विद्यार्थी आनंद कुमार (हृतिक रोशन)ला कॅम्ब्रिज विद्यापीठात अॅडमिशन मिळत असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्याला तिथे प्रवेश घेता येत नाही. त्यात त्याच्या वडिलांचं निधन होतं. उदरनिर्वाह करण्यासाठी आनंद कुमारला पापड विकावे लागतात. पापड विकत असताना एकेदिवशी त्याची भेट पटनामध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या लल्लन सिंग (आदित्य श्रीवास्तव)सोबत होते. लल्लन सिंग आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये आनंद कुमारला शिकवण्यासाठी सांगतो. आनंद कुमारची कोचिंग क्लासेसमध्ये शिकविता शिकविता आर्थिक परिस्थितीदेखील सुधारते. मात्र एक दिवस त्याला जाणीव होते की आपण फक्त राजाच्या मुलांना राजा बनवण्यामध्ये लागलोय. त्यावेळी त्याला वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण होते आणि त्याचे विचार बदलतात. आपल्या कौशल्याचा वापर अर्जुनांसाठी नाही तर एकलव्यांसाठी करायचा असं तो ठरवितो. त्यासाठी आर्थिक मागासलेल्या व वंचित अशा तीस मुलांना मोफत आयआयटी परीक्षेसाठी तयार करतो. त्याच्या या निर्णयात त्यांचा भाऊ प्रणव कुमार (नंदीश सिंग) त्याला सहकार्य करतो. त्यात त्याची प्रेयसी रितु (मृणाल ठाकूर)देखील सोडून जाते. या प्रवासात आनंद कुमारला व त्याच्या विद्यार्थ्यांना आयआयटी परीक्षेसाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शक विकास बहलने गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलू रुपेरी पडद्यावर उत्तमरित्या साकारल्या आहेत. हृतिक रोशनने आतापर्यंत अॅक्शन, स्टाइलिश व डॅशिंग अशा भूमिकांमध्ये पाहिले आहे. त्यामुळे बिहारी लूकमध्ये हृतिक कसा असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. सिनेमा सुरू झाल्यावर हृतिकचा बिहारी अंदाज सुरूवातीला जरा खटकत असला तरी त्याने या भूमिकेला न्याय दिला आहे. तसंच मृणाल ठाकूरचे चित्रपटात जास्त सीन नसले तरीदेखील तिची भूमिका लक्ष वेधून घेते. वीरेंद्र सक्सेना, नंदीश संधू, आदित्य श्रीवास्तव यांनी आपल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. त्याशिवाय आनंद कुमार यांच्या कोचिंग क्लासेसमधील मुलांनीदेखील चांगला अभिनय केला आहे. चित्रपटातील गाण्यांचे बोल चांगले आहेत. बॅकग्राउंड स्कोअर काही ठिकाणी लाउड वाटतो. तर चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफरने कॅमेऱ्यातून क्षण उत्तमरित्या टिपले आहेत. चित्रपटातील अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा यांसारखे काही डायलॉग्जला प्रेक्षकांची दाद मिळाल्याशिवाय राहत नाहीत. शिक्षणाच्या अधिकाराच्या संदेशासोबत गरीबी व सामाजिक विषमतेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. एका सामान्य गणिततज्ज्ञांचा प्रेरणादायी प्रवास एकदातरी नक्की पाहावा असाच आहे. हा प्रवास आपल्याला दैनंदिन आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकवून जाणारा आहे.