Taali Review: गौरी सावंतची 'ताली' प्रेक्षकांपर्यंत पोहोचली का? जाणून घ्या कशी आहे वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 03:36 PM2023-08-15T15:36:32+5:302023-08-15T15:43:43+5:30

Taali: 'ताली' या वेबसीरिजमधून गौरी सावंतच्या संपूर्ण जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे

taali-review-ott-web-series-jio-cinema-sushmita-sen-taali-based-on-transgender-activist-shreegauri-sawant | Taali Review: गौरी सावंतची 'ताली' प्रेक्षकांपर्यंत पोहोचली का? जाणून घ्या कशी आहे वेबसीरिज

Taali Review: गौरी सावंतची 'ताली' प्रेक्षकांपर्यंत पोहोचली का? जाणून घ्या कशी आहे वेबसीरिज

Release Date: August 15,2023Language: हिंदी
Cast: सुश्मिता सेन, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवि, सुव्रत जोशी,नितीश राठोड,अंकुर भाटिया
Producer: अर्जुन सिंग बरना,कार्तिक निशाणदारDirector: रवि जाधव
Duration: 3 तास 4 मिनिटेGenre: बैयोग्रफिकल,नाटक
लोकमत रेटिंग्स

गौरी सावंत हे नाव सध्याच्या काळात कोणासाठीही नवीन नाही. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत हिने आयुष्यात अनेक खाचखळग्यातून मार्ग काढत समाजात स्वत:साठी, तिच्या समुदायासाठी हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. म्हणूनच, 'ताली' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. अभिनेत्री सुश्मिता सेन हिची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे.

जिओ सिनेमावर रिलीज झालेल्या 'ताली' या वेबसीरिजमधून गौरी सावंतच्या संपूर्ण जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.  त्यामुळे ही सीरिज नेमकी कशी आहे याचा थोडक्यात आढावा घेऊ.

काय आहे 'ताली'ची कहानी

ज्यावेळी एखाद्या बाळाचा जन्म होतो त्यावेळी आई-वडील डॉक्टरांना विचारतात..मुलगा झालाय की मुलगी? गौरीसोबत सुद्धा असंच झालं होतं. सावंतांच्या घरी गणेशचा (गौरी) जन्म झाला. सहाजिकच आहे घरी मुलाचा जन्म झाला म्हणून सगळीकडे आनंदीआनंद होता. परंतु, गणेश जसजसा मोठा होत होता त्याचं मन बांगड्या, दागदागिने, साड्या, भातुकली अशा गोष्टींमध्ये रमत होतं. मात्र, गणेश एक मुलगा आहे त्यामुळे त्याने समाजात इतर मुलांप्रमाणेच राहिलं पाहिजे असा त्याच्या घरातल्यांचा अट्टाहास होता. परंतु, ज्यावेळी गणेशचं सत्य त्याच्या वडिलांना कळलं त्यावेळी त्यांनी त्याला घरातून बाहेर काढलं.इतकंच नाहीत त्याच्या वडिलांनी जीवंतपणे त्याचं श्राद्धही केलं. आई-वडिलांचं छत्र हरपल्यानंतर गणेश रस्त्यावर आला आणि इथून त्याचा खरा संघर्ष सुरु झाला. आता गणेशची गौरी कशी झाली? समाजात त्याला कोणत्या हालअपेष्टा भोगाव्या लागल्या? त्याने ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी कसा संघर्ष केला? हे सगळं प्रेक्षकांना वेब सीरिज पाहिल्यानंतरच कळणार आहे.

कलाकारांचा अभिनय

ताली या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन हिने गौरी सावंत हिची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे सुश्मिताने उत्तमरित्या गौरीच्या भूमिकेला न्याय दिला आहे. या भूमिकेसाठी सुश्मिताने प्रचंड मेहनत घेतली होती जी पडद्यावर उत्तमरित्या दिसून आली. सुश्मिता व्यतिरिक्त या सीरिजमध्ये काही मराठी कलाकारदेखील झळकले आहेत. यात ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवि, सुव्रत जोशी, नितीश राठौड या कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.
वेब सीरिजमधील संवाद

मराठमोळा क्षितिज पटवर्धन याने या सीरिजमध्ये संवादलेखन केलं आहे. विशेष म्हणजे त्याने चपखल असे संवाद लिहिले असून खुद्द गौरी सावंतने सुद्धा त्याचं कौतुक केलं. तसंच ऑडिओ ए़डिटर्सने सुद्धा सुश्मिताच्या आवाजावर विशेष मेहनत घेतली आहे.
 

वेबसीरिजमधील त्रुटी

या सीरिजचे एकूण ६ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड साधारणपणे ३० मिनिटांचा आहे. त्यामुळे संपूर्ण सीरिजचा विचार केला तर ही सीरिज ३ तासांची आहे. परंतु, या तीन तासांमध्ये इमोशनल ड्रामा फारसा दिसून आला नाही. प्रत्येक एपिसोडची रंगत वाढत असतानाच तो लगेच संपतो. त्यामुळे एपिसोड संपल्यावर लगेच कनेक्शन तुटतंय असं वाटतं.म्हणूनच, ही सीरिज माहोल तयार करण्यात अपयशी ठरते. गौरी सावंतच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या मात्र त्या तितक्या ताकदीने दिग्दर्शक, म्युझिक डायरेक्टरला त्या पडद्यावर दाखवता आल्या नाहीत.

सीरिज पाहावी की पाहू नये?

ट्रान्सजेंडर व्यक्तींनादेखील काही हक्क, अधिकार आहेत. त्यामुळे ज्यांना या हक्क, नियमाविषयी माहित नाही त्यांनी ही सीरिज आवर्जून पाहावी. ट्रान्सजेंडर फक्त टाळी वाजवण्यापूरते मर्यादित नाही हे या सीरिजमधून लक्षात येतं.  

कोण आहे गौरी सावंत?

गौरी सावंत एक ट्रान्सजेंडर सोशल वर्कर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या तृतीयपंथीयांच्या न्याय, हक्कासाठी लढत आगेत. ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी त्यांनी २००९ मध्ये न्यायालयात पहिल्यांदा धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर ट्रान्सजेंडर व्यक्तींना सुप्रिम कोर्टाने  कायदेशीर ओळख मिळवून दिली.
 

Web Title: taali-review-ott-web-series-jio-cinema-sushmita-sen-taali-based-on-transgender-activist-shreegauri-sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.