Tanhaji Review : डोळ्याचे पारणे फेडणारा चित्रपट
By प्राजक्ता चिटणीस | Published: January 10, 2020 03:45 PM2020-01-10T15:45:59+5:302023-08-08T19:47:32+5:30
Tanhaji Review तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे या चित्रपटात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान.
कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ही कथा आपण शालेय जीवनापासून वाचत आलो आहोत. हीच कथा अतिशय भव्यरित्या तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटात मांडण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवण्यात आले आहेत. पण तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर हा चित्रपट सगळ्या चित्रपटांमध्ये उजवा ठरतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज यांनी त्यांच्या ताब्यात असलेले एकूण २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. यामध्ये कोंढाणाचा देखील समावेश होता. हा किल्ला जोपर्यंत परत मिळणार नाही, तोपर्यंत मी अनवाणी राहाणार अशी शपथ राजमाता जिजाऊसाहेब यांनी घेतली होती. या गोष्टीला चार वर्षं उलटून गेल्यानंतर औरंगजेब उदयभान सिंग राठोड (सैफ अली खान) या आपल्या शिलेदाराला कोंढाणाचा सरदार म्हणून पाठवतात आणि त्याच्यासोबत एक भलीमोठी तोफ देखील पाठवतात. त्यामुळे आता काहीही करून कोंढाणा किल्ला परत मिळवायचा असे ठरवत छत्रपती शिवाजी महाराज आपला लाडका मित्र आणि शूर मावळा तानाजी मालुसरेला (अजय देवगण) या मोहिमेवर पाठवतात. ही मोहीम कशाप्रकारे फत्ते केली जाते हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.
तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे या चित्रपटात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान. याआधी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये CGI या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पण बॉलिवूडमधील सगळ्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान सरस ठरले आहे. या चित्रपटातील अधिकाधिक सिनेमेटोग्राफी ही कृत्रिम असली तरी तो काळ उभा करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. या चित्रपटाचा सेट, रंगभूषा, वेशभूषा ही मस्त जमून आली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहणे ही एक पर्वणी आहे.
या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत विचाराल तर या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांची व्यक्तिरेखा अक्षरशः जगली आहे. अजय देवगण, काजोल, देवदत्त नागे, शरद केळकर यांनी सगळ्यांनीच खूपच चांगला अभिनय केला आहे. पण खरी बाजी मारली आहे ती म्हणजे सैफ अली खानने. सैफ अली खानने उदयभानचा वेडसरपणा, त्याची हिंसक वृत्ती सगळे काही खूपच चांगल्याप्रकारे मांडले आहे. सैफच्या करियरमधील ही उत्कृष्ट भूमिका आहे असेच म्हणावे लागेल.
दिग्दर्शक ओम राऊतचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असला तरी दिग्दर्शनात कुठेच उणिवा भासत नाही. केवळ मध्यांतरापूर्वी चित्रपट काहीसा संथ वाटतो. पण मध्यांतरानंतर युद्ध सुरू झाल्यावर हा चित्रपट तुम्हाला अक्षरशः खिळवून ठेवतो. तसेच उदयभानला भेटण्यासाठी तानाजी मालुसरे कोंढाण्यावर जातात, त्यावेळी त्यांनी केलेले नृत्य ही सिनेमेटिक लिबर्टी खटकते.
अतिशय कठीण असा कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरे आणि शिवबाचे मावळे कशाप्रकारे चढतात, तसेच लढाईत ज्या आवेशाने शत्रूंशी लढतात हे सगळे खूपच चांगल्याप्रकारे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील अॅक्शन दृश्यं पाहाताना चित्रपटाच्या टीमने तलवारबाजीवर, देहबोलीवर प्रचंड मेहनत घेतली असल्याचे लक्षात येते. चित्रपटाचे संवाद देखील दमदार आहेत. चित्रपटातील बँकराऊंड स्कोरचे तर करावे तितके कौतुक कमी आहे. चित्रपटातील घमंड कर... हे गाणे शेवटच्या दृश्याला आणखी वजनदार बनवते. तानाजी मालुसरे यांचे निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या तोंडून आलेले गड आला पण सिंह गेला हा संवाद ऐकून डोळे नक्कीच पाणवतात. एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शूर मावळ्याची कथा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पाहा...