Lokshahi movie review: घराणेशाहीच्या पटलावर कोण जिंकणार डाव?

By संजय घावरे | Published: February 9, 2024 04:32 PM2024-02-09T16:32:08+5:302024-02-09T16:34:55+5:30

Lokshahi movie review: तेजश्री प्रधान, समीर धर्माधिकारी,मोहन आगाशे अशा दिग्गज कलाकारांनी या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

tejashri pradhan maratho movie loksahi review | Lokshahi movie review: घराणेशाहीच्या पटलावर कोण जिंकणार डाव?

Lokshahi movie review: घराणेशाहीच्या पटलावर कोण जिंकणार डाव?

Release Date: February 09,2024Language: मराठी
Cast: तेजश्री प्रधान, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन, डॅा. गिरीश ओक, डॅा. मोहन आगाशे, भार्गवी चिरमुले, शंतनू मोघे, अमित रियान
Producer: सुशीलकुमार अग्रवालDirector: संजय अमर
Duration: 2 तास 08 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

या चित्रपटाचं शीर्षक जरी 'लोकशाही' असलं तरी यात घराणेशाहीच्या पटलावर मांडलेला राजकीय डाव पाहायला मिळतो. दिग्दर्शक संजय अमर यांनी मराठीतील आघाडीचे कलाकार घेऊन पॅालिटिकल मर्डर मिस्ट्री बनवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. काही उणिवा राहिल्याने चित्रपट परिपूर्ण वाटत नाही.

कथानक : मुख्यमंत्री यशवंत चित्रे यांची भर सभेत गोळी घालून हत्या केली जाते. त्यानंतर चित्रेंपासून दूर राहून आईच्या शिकवणीनुसार समाजकार्य करणारी त्यांची मुलगी इरावती घरी परतते. पुतण्या सदाशीवला यशवंत यांचा राजकीय वारसदार बनायचं असतं, पण यशवंत यांचे वडील बाबासाहेब आणि पक्षाच्या निर्णयानुसार इरावतीच खरी वारसदार असते. या सर्व गदारोळात इरावती मात्र आपल्या वडीलांच्या हत्याऱ्याचा शोध घेत असते. क्लायमॅक्समध्ये तिला उत्तर सापडतं आणि वडिलांनी घातलेली सर्व कोडी सुटतात.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची कथा चांगली असून, त्यावर उभारलेला पटकथेचा डोलारा अखेरपर्यंत रहस्य उलगडू देत नाही. हेच दिग्दर्शकाचं खरं यश आहे, पण संवाद खूपच सामान्य दर्जाचे आहेत. अचानक घडणाऱ्या काही घटना, संदर्भहीन दृश्यांचे काही तुकडे आणि इतर काही उणिवांचा फटका चित्रपटाला बसला आहे. मराठीतील आघाडीचे कलाकार घेतल्याने दिग्दर्शकाचं काम सोपं झालं आहे. हत्याऱ्याचा शोध घेताना प्रत्येक कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून गोष्ट उलगडत जाते आणि हळूहळू रहस्याचे धागे मोकळे होत जातात. गाणी तितकीशी प्रभावी नसून, काही गाणी पटकथेच्या प्रवाहात अडथळा वाटतात. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, संकलन सामान्य आहे.

अभिनय : सर्वच कलाकारांनी आपल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला आहे. तेजश्री प्रधानने आपल्या व्यक्तिरेखेच्या बळावर सिनेमा तारून नेला आहे. समीर धर्माधिकारीने साकारलेलं राजकीय व्यक्तिमत्त्वही प्रभावशाली आहे. डॅा. गिरीश ओक यांनी काहीसं रहस्यमय वाटणारं व्यक्तिमत्त्व लीलया साकारलं आहे. खलनायकी भूमिकेला उचित न्याय देण्यात भार्गवी यशस्वी झाली असली तरी, सदाशीवच्या आईच्या रूपात थोडी खटकते. डॅा. मोहन आगाशे यांनी नेहमीच्या शांत शैलीत अभिनय केला आहे. अंकित मोहनची भूमिका फार छोटी असून, विशेष प्रभावी नाही.

सकारात्मक बाजू : अभिनय, कथा, पटकथा, दिग्दर्शन

नकारात्मक बाजू : संवाद, लांबलचक दृश्ये, चित्रपटाची गती, संकलन, सिनेमॅटोग्राफी, गीत-संगीत

थोडक्यात काय तर राजकीय घराण्यात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी कशा प्रकारचे डावपेच खेळले जातात ते जाणून घेण्यासाठी एकदा पाहायला हरकत नाही.
 

Web Title: tejashri pradhan maratho movie loksahi review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.