शाहीद-क्रितीची रोमँटिक केमिस्ट्री, गुंतवून ठेवणारी रोबोटिक प्रेमकहाणी; वाचा कसा आहे सिनेमा
By संजय घावरे | Published: February 9, 2024 04:28 PM2024-02-09T16:28:23+5:302024-02-09T16:28:43+5:30
रोबोट असणाऱ्या क्रिती सेननच्या प्रेमात पडला शाहीद, वाचा कशी आहे ही रोबोटिक लव्हस्टोरी
अमित जोशी आणि आराधना साह या दिग्दर्शक द्वयींनी या चित्रपटात सुपर इंटेलिजेंट फीमेल रोबोट ऑटोमेशन म्हणजेच रोबोट आणि मानवाची अनोखी प्रेमकहाणी सादर केली आहे. रोमान्स, इमोशन्स, कॅामेडी असं बरंच काही या चित्रपटात असल्यानं ही रोबोटिक प्रेमकहाणी अखेरपर्यंत गुंतवून ठेवते.
कथानक -
लग्नाला तयार नसलेल्या रोबोटिक्स इंजिनियर आर्यनची ही स्टोरी आहे. आर्यनच्या मागे कुटुंबियांनी लग्नाचा तगादा लावलेला असतो, पण तो मात्र कामात बिझी असतो. आर्यनची बॅास असलेली त्याची मावशी उर्मिला त्याला एका रिसर्चसाठी अमेरिकेला बोलावते. आर्यन न्यूयॅार्कला आल्यावर उर्मिला अचानक कामासाठी बाहेरगावी जाते. आर्यनच्या देखभालीची जबाबदारी ती आपली मॅनेजर सिफ्राकडे सोपवते. दोन दिवसांमध्ये आर्यन-सिफ्रा एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि प्रेमात पडतात. परत आल्यावर उर्मिलाला घडलेला प्रकार समजतो. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन -
चित्रपटाच्या कथेत नावीन्यपूर्ण गोष्टींसोबतच मॅडनेसचाही समावेश आहे. त्यामुळे काही ठिकाणी डोकं बाजूला ठेवावं लागतं. पटकथेतील नाट्यमय वळणं खिळवून ठेवतात. रोबोटिक भाषा, ग्राफिक्स, व्हिएफएक्सचा चांगला वापर करण्यात आला आहे. अर्थपूर्ण आणि प्रसंगानुरूप संवादांद्वारे छान विनोद निर्मिती केली आहे. क्लायमॅक्समध्ये त्या संवादांचा चांगला वापर केला आहे. रोबोटचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही असल्याचं पाहायला मिळतं. रोबोट जरी फायदेशीर असला तरी त्यात बिघाड झाल्यावर होणारं नुकसान आणखी बारकाईने दाखवायला हवं होतं. दिल्लीतील लगीनघरातील वातावरणनिर्मिती सुरेख आहे. शाहिद-क्रितीची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे. 'तेरी बातों में...', 'लाल पीली अखियां...' ही गाणी चांगली झाली असून, यावरील कोरिओग्राफीही लक्ष वेधून घेणारी आहे.
अभिनय -
कृती सॅनोनने अफलातून रोबोटिक अभिनय केला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती कुठेही माणसासारखी वागत नाही, तर रोबोटच वाटते. शाहिद कपूरने साकारलेल्या आर्यनचा मनमौजी आणि रोमँटिक अंदाज रिफ्रेशिंग वाटतो. डिंपल कपाडियांची व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची असून, त्यांनी ती लीलया साकारली आहे. धर्मेंद्र यांनी छोट्याशा भूमिकेतही सुरेख रंग भरला आहे. राकेश बेदी, अनुभा फतेहपुरिया, राजेश कुमार, आशीष वर्मा, ग्रूशा कपूर, राशुल टंडन यांनी सहाय्यक भूमिकांमध्ये चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, कोरिओग्राफी
नकारात्मक बाजू : रोबोटिक बारकाव्यांवर आणखी फोकस करायला हवा होता.
थोडक्यात काय तर माणूस आणि रोबोट यांची ही अनोखी लव्हस्टोरी एका वेगळ्याच विश्वात नेणारी असल्याने एकदा अवश्य पाहायला हवी.