The Accidental Prime Minister Movie Review : पडद्यामागील राजकीय डावपेच
By तेजल गावडे | Published: January 11, 2019 01:57 AM2019-01-11T01:57:43+5:302023-08-08T19:47:32+5:30
संजय बारू यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटातून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व संजय बारू यांचे नाते खूप चांगल्यारित्या रेखाटण्यात आले आहे. तसेच या चित्रपटातून डॉ. मनमोहन सिंग यांचा राजकीय कार्यकाळ अनुभवायला मिळतो.
- तेजल गावडे
संजय बारू यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटातून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व संजय बारू यांचे नाते खूप चांगल्यारित्या रेखाटण्यात आले आहे. तसेच या चित्रपटातून डॉ. मनमोहन सिंग यांचा राजकीय कार्यकाळ अनुभवायला मिळतो. संजय बारू मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार असताना त्यांनी त्यांच्याबाबतीत केलेल्या निरीक्षणांचा उल्लेख या पुस्तकात केला असून तो आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतो. या सिनेमात युपीए सरकारच्या काळातील न्युक्लियर डील व मनरेगा यांसारखे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोनिया गांधी यांचे पक्ष व मनमोहन सिंग यांच्यावर वचक असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटाची सुरूवात 2004 साली सोनिया गांधी (सुजैन बर्नेट) पंतप्रधान पदाचा त्याग करतात इथून होते आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग (अनुपम खेर) यांची निवड केली जाते. यानंतर चित्रपटात पत्रकार संजय बारू (अक्षय खन्ना) यांची एन्ट्री होती. मनमोहन सिंग यांचे चाहते असल्यामुळे ते त्यांचे मीडिया सल्लागार बनतात. या दरम्यान संजय बारू यांना जाणवते की मनमोहन सिंग आपल्या पक्षाचा व सोनिया गांधींचा खूप आदर करतात. पण, सोनिया गांधी त्यांना आपल्या कह्यात ठेवू पाहतात. मात्र संजय बारू मनमोहन सिंग यांना आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी प्रेरीत करतात. अमेरिका व भारतामध्ये झालेल्या अणु करारामुळे मनमोहन सिंग यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. इंटरव्हलनंतर भ्रष्टाचार उघडकीस येतात आणि त्यामुळे त्यांची इमेज खराब होते. पक्षातील दुसऱ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकींमुळे मनमोहन सिंगना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. संजय बारू यांच्या सल्ल्यानुसार मनमोहन सिंग निर्णय घेत असतात. त्यामुळे काही वेळेला ते पक्षाच्या निर्णयाकडे कानाडोळा करतात. त्यामुळे संजय बारू यांनी राजीनामा देण्यासाठी पक्षाकडून दबाव टाकला जातो. अखेर संजय बारू राजीनामा देतात. मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संजय बारू द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पुस्तक लिहितात आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मनमोहन सिंग व संजय बारू यांच्यातील नात्यात दुरावा येतो. डॉ. मनमोहन सिंग यांचा राजकीय कार्यकाळ व त्यांनी लोकांच्या चांगल्यासाठी कशापद्धतीने योजना राबवण्याचा निर्णय घेतला, हे चित्रपटातून अनुभवायला मिळते.
अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका रुपेरी पडद्यावर उत्तमरित्या साकारली आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांच्या बोलण्याची व चालण्याची पद्धत आणि छोट्या छोट्या गोष्टींवर खूप बारकाईने काम केले आहे. तर अक्षय खन्नाने अप्रतिम अभिनय केला असून तो प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप उमटवून जातो. याशिवाय सुजैन बर्नेटने देखील सोनिया गांधींच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अहाना कुमरा (प्रियांका गांधी), अर्जुन माथुर राहुल गांधी) यांना रुपेरी पडद्यावर जास्त पाहण्याची संधी मिळत नाही. मात्र त्यांनीदेखील खूप चांगला अभिनय केला आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांनी देखील खूप चांगला अभिनय केला आहे. कलाकारांचा अभिनय व लूक या चित्रपटाच्या जमेची बाजू आहे.
दिग्दर्शकाचा विजय रत्नाकर गुट्टे याचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्याने खूप चांगला प्रयत्न केला आहे. फाईल फुटेजमुळे काही काही ठिकाणी चित्रपट थोडा कंटाळवाणा वाटतो. या चित्रपटातील संवाद चांगले आहेत. मात्र काही ठिकाणी चित्रपटातील बॅकग्राउंड स्कोअर फसलेले जाणवते. अक्षय खन्ना व अनुपम खेर यांचा दमदार अभिनय आणि डॉ. मनमोहन सिंग यांचा राजकीय काळ पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा.