भावभावना आणि मनोरंजनाचा संगम...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2017 09:09 AM2017-07-12T09:09:13+5:302023-08-08T19:28:38+5:30
गणेश आचार्य यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्यामुळेही या सिनेमाची चर्चा जोरदार रंगली आहे.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, ही म्हण प्रचलितच आहे आणि हाच 'भिकारी' या चित्रपटाचा पाया आहे. साहजिकच, या चित्रपटात आईची महती असणारच हा अंदाज अजिबात चुकत नाही. परंतु, हे सांगताना चित्रपटाची केलेली मांडणी वेगळ्या पद्धतीची आहे. एकाच वेळी भावनांना हात घालायचा आणि त्याचवेळी व्यावसायिक मूल्ये लक्षात घेऊन त्यांना मनोरंजनाचा तडका द्यायचा, असा प्रकार या चित्रपटाने हाताळला आहे.
हा चित्रपट एका आई आणि मुलाची कथा सांगतो. एका मिलच्या सर्वेसर्वा असलेल्या शारदा जयकर या त्या मिलची सगळी सूत्रे त्यांचा तरुण मुलगा सम्राटच्या हाती सोपवतात. एकदा त्यांना अपघात होतो आणि त्या कोमात जातात. विविध प्रकारचे उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नाही. या घटनेने सैरभैर झालेल्या सम्राटला एकदा एक साधू भेटतात आणि 'तू तुझ्या आईसाठी काय करू शकतोस' असा प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न करतात. यावर निरुत्तर झालेल्या सम्राटला, सर्व सुखांचा त्याग करून ४८ दिवस भिकारी बनण्याचा उपदेश ते करतात. आईच्या प्रेमापोटी सम्राट ते स्वीकारतो आणि तो थेट भिकारी होण्याचा निर्णय घेतो. यातून पुढे काय निष्पन्न होते, त्याची कथा म्हणजे हा चित्रपट आहे.
गुरु ठाकूर याची कथा, पटकथा आणि संवाद असलेला हा चित्रपट वास्तविक एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे आणि या चित्रपटाच्या मांडणीतही तो बाज लपून राहिलेला नाही. पण तरीही या निमित्ताने एक करमणूकप्रधान असा चित्रपट गुरु ठाकूर याने दिला आहे. संवेदना, प्रेम, आपुलकी आणि त्याचबरोबर मनोरंजनाची पातळी गाठण्यासाठी कथेत आणलेली हाणामारी, प्रेमप्रकरण यांनी हा चित्रपट परिपूर्ण करण्यात आला आहे. असे असले, तरी यातल्या काही गोष्टी पचनी पडून घ्याव्या लागतात. ही कथा अनुभवताना डोक्याला काही प्रश्न नक्कीच पडतात; परंतु एक वेगळी कथा पाहण्यासाठी त्या प्रश्नांचा त्याग करणे भाग आहे. दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी सर्व वयोगटाला अपील होईल अशी या चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यामुळे यात सर्वप्रकारचे रंग मिसळलेले दिसतात. महेश लिमये यांचे छायाचित्रण जमून आले आहे; तर मिलिंद वामखेडेकर व विशाल मिश्रा यांची चित्रपटाला चांगली संगीतसाथ लाभली आहे.
स्वप्नील जोशीचा नवा अवतार म्हणून त्याने यात साकारलेली सम्राट ही व्यक्तिरेखा ठसते. आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांतून केवळ 'चॉकलेट बॉय' प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकलेल्या स्वप्नील जोशी याला या चित्रपटात बरेच काही वेगळे करून दाखवण्याची संधी मिळाली आहे आणि तिचा त्याने चांगला उपयोग करून घेतला आहे. मात्र कथेच्या अनुषंगाने, काहीकेल्या तो यात भिकारी दिसू शकत नाही; हेही तितकेच खरे आहे. इतर भूमिकांमधले कैलाश वाघमारे (पुडी भिकारी), नारायण जाधव (लेक्चरर भिकारी) लक्षात राहतात. सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे यांनी खलनायकाची बाजू नेहमीप्रमाणेच सांभाळली आहे. शुभांगी भुजबळ, गुरु ठाकूर, ऋचा इनामदार, कीर्ती आडारकर, पद्मश्री कदम आदी कलावंतांची योग्य साथ चित्रपटाला मिळाली आहे.