The ghazi attack review : द गाझी अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 09:50 AM2017-02-16T09:50:29+5:302023-08-08T19:28:38+5:30
‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबाती,केके मेनन, ओम पुरी, नवाज शेख, अतुल कुलकर्णी आणि तापसी पन्नू अशी जबरदस्त स्टारकास्ट आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा व्हॉईस ओव्हर लाभलेला द गाझी अटॅक
जान्हवी सामंत
‘द गाझी अटॅक’ हा चित्रपट भारत व पाकिस्तान या शेजारी देशांच्या पहिल्या अंडरवॉटर युद्धावर असल्याचे मानले गेल्याने साहजिक प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. याशिवाय ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबाती, केके मेनन, ओम पुरी, नवाज शेख, अतुल कुलकर्णी आणि तापसी पन्नू अशी जबरदस्त स्टारकास्ट आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा व्हॉईस ओव्हर यामुळेही या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. प्रेक्षकांची ही उत्सुकता लक्षात घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत, ‘दी गाझी अटॅक’ स्पेशल रिव्ह्यू...
भारत-पाकदरम्यानच्या अनेक युद्धांबाबत आपण जाणतो. पण दोन्ही देशांत एक अंडरवॉटर युद्धही झाले होते. अर्थात याबाबत फार कमी लोक जाणतात. ‘द गाझी अटॅक’ याच युद्धाची कथा असल्याचे तुम्हा-आम्हाला माहीत आहे. पण प्रत्यक्षात ‘द गाझी अटॅक’च्या सुरुवातीला पडद्यावर झळकते ती एक अस्वीकृती (disclaimer) . चित्रपटाचे कथानक, त्यातील घटना आणि पात्रांचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही, असे चित्रपटाच्या सुरुवातीलाच ठळक शब्दांत स्पष्ट केले जाते. हे शब्द वाचून चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे की काल्पनिक? असा प्रश्न पडत असतानाच आपल्या इतिहासात कुठेही नमूद नसलेल्या भारत-पाक नौदल संघर्षाची एक गूढ कथा पडद्यावर सांगितली जाते. ही कथा आपल्याला थेट १९७१मध्ये घेऊन जाते. या काळात बांगलादेश पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा. पाकिस्तान आणि पाकिस्तानमधून स्वतंत्र होऊ पाहणारा पूर्व पाकिस्तान यांच्यातील संघर्षाने कथेला सुरुवात होते. अर्थातच शेजारी सुरु असलेल्या या संघर्षाकडे भारत तटस्थ म्हणून पाहत असतो. पण कुरापतखोर पाकिस्तान भारतालाही या युद्धात खेचतो. १७ नोव्हेंबरला पाकिस्तान सागरी मार्गाने भारताच्या आयएनएस विक्रांतवर हल्ला करणार असल्याची बातमी भारतीय नौदलाच्या मुख्यालयात येऊन धडकते. या हल्ल्याने भारतीय नौदलाला विचलित करणे आणि विशाखापट्टनम बंदरावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट असतो. या हल्ल्याचा हेतू आणि पाकिस्तानच्या सागरी कुरापतींची माहिती गोळा करण्यासाठी नौदल प्रमुख व्ही.पी.नंदा(ओम पुरी) एक आॅपरेशन आखतात. याची जबाबदारी एस21 नामक पाणबुडीचा कप्तान रणविजय सिंह(के के मेनन),लेफ्टनंट कमांडर अर्जुन (राणा डग्गुबती) आणि देवराज(अतुल कुलकर्णी)यांच्यावर सोपवली जाते. रणविजय सिंह पाकिस्तानी नौदलावर ताबडतोब हल्ला करण्याच्या मताचा असतो.( युद्ध शत्रूंना मारूनच जिंकले जाऊ शकते, असे रणविजय सिंहचे ठाम मत असते.) रणविजय सिंहचा आक्रमक स्वभाव बघता, अर्जुन वर्मा याच्यावर या आॅपरेशनची समांतर जबाबदारी सोपवली जाते. चित्रपटाच्या पहिल्या हाफमध्ये रणविजय सिंह आणि अर्जुन वर्मा यांचे याच्या परस्परविरोधी मतांचा संघर्षच पडद्यावर पाहायला मिळतो. याच संघर्षात अनन्या(तापसी पन्नू) या बांगलादेशी शरणार्थीची एन्ट्री होते. पाकिस्तान काही व्यापारी जहाजे उडवून देतो. भारतीय नौदल जवान या जहाजावरील अनन्याला वाचवण्यात यशस्वी ठरतात. याचदरम्यान भारतीय सैनिकांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी रणविजय सिंह काही सामरिक निर्णय घेतो. त्याचे हे निर्णय भारतीय नौदलाला आणखी अडचणीत टाकणारे ठरतात. तरिही पाकिस्तानी नौदलाच्या तुलनेत भारतीय नौदल सरस ठरते. अखेर पीएनएस गाजीवर अटॅक करून भारतीय नौदल जवान पाकिस्तानी पानबुडीला नष्ट करून करतात.
खरे सांगायचे तर पटकथा फार काही रोचक नाही.प्रसंगी देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी सज्ज भारतीय सशस्त्र दलाचे जवान, त्यांचे राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले संवाद हा सगळा मालमसाला आहे. पण बालिश युद्ध, कंटाळवाणा क्लायमॅक्स आणि अगदी सहज वाटावा असा विजय...यामुळे ही युद्धकथा उत्कंठा वाढवणारी नाही तर बºयाचप्रमाणात कंटाळवाणी ठरते. एकंदर काय तर ही युद्धकथा पडद्यावर पाहणे टाळली तरीही काहीही बिघणार नाहीयं!