Thugs of Hindostan Movie Review :जाणून घ्या कसा आहे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:37 PM2018-11-08T14:37:40+5:302023-08-08T20:35:32+5:30
आमिर खानचा चित्रपट म्हटल्यानंतर प्रेक्षक ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ हा चित्रपट पाहण्यास उत्सूक होते. ट्रेलर आणि टीजर पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.तेव्हा जाणून घेऊ या, कसा आहे हा चित्रपट...
धूम, धूम २, प्यार के साईड इफेक्ट्स, गुरु यासारख्या चित्रपटांसाठी कधी स्क्रिनप्ले तर कधी डायलॉग्स लिहिणारे आणि पुढे टशन, धूम ३ दिग्दर्शित करणारे विजय कृष्ण आचार्य यांचा ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ रिलीज झालाय. आमिर खानचा चित्रपट म्हटल्यानंतर प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास उत्सूक होते. ट्रेलर आणि टीजर पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.तेव्हा जाणून घेऊ या, कसा आहे हा चित्रपट...
आमिर व अमिताभ या जोडीच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’मध्ये 1795 मधील भारत दाखवला आहे. भारतात पाय पसरवू पाहणा-या ईस्ट इंडिया कंपनीने येथील अनेक राज्ये बळकावली होती. पण रौनकपूर एक असे राज्य होते, जे अद्यापही इंग्रजांना हुलकावणी देत होते.
सेनापती खुदाबख्श आझाद (अमिताभ बच्चन) या राज्याचा सेनापती असतो. रौनकपूरचा ‘मिर्जा साहब’ (रोनित रॉय) याच्यासकट संपूर्ण राज्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते.अचानक ईस्ट इंडिया कंपनीचा जनरल जॉन क्लाईव्ह या राज्यावर धोक्याने कब्जा मिळवतो आणि ‘मिर्जा साहब’ला मारतो. खुदाबख्श ‘मिर्जा साहब’ची मुलगी जफीरा (फातिमा सना शेख) हिला इंग्रजांच्या तावडीतून कसेबसे वाचवतो आणि ११ वर्षे लपूनछपून आपल्या लोकांना गोळा करून इंग्रजांविरोधात गनिमी युद्ध छेडतो. या युद्धात जफीरा ही सुद्धा आपल्या इंग्रजांचा सूड उगवण्यासाठी मैदानात उतरते. खुदाबख्शला मात देण्यासाठी इंग्रजांना एका धूर्त व्यक्तिचा शोध असतो. त्यांचा हा शोध फिरंगी मल्लाह (आमिर खान) याच्यापाशी येऊन संपतो. आपल्या आजीची शपथ घेणारा आणि धादांत खोटे बोलणाºया फिरंगी मल्लाहचे केवळ एकच ध्येय असते ते म्हणजे, पैसा. याच पैशांसाठी तो ठगांना पकडून देण्याचे इंग्रजांचे काम स्वीकारतो आणि इंग्रजांच्या गुप्त योजनेनुसार, मल्लाह ठगांच्या सैन्यात शिरतो. पुढे एकापाठोपाठ एक अशी अनेक वळणे घेत, चित्रपट पुढे सरकतो. अर्थात अनेक वळणांची ही कथा कुठल्या मुक्कामाला पोहोचते? इंग्रजांची योजना फत्ते होते की, खुदाबख्श जिंकतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल.
या चित्रपटाबद्दल एका वाक्यात सांगायचे तर चित्रपटाची कथा रोमांचक आहे पण दिग्दर्शन अतिशय सुमार आहे. १७ व्या शतकाची पार्श्वभूमी, आमिर व अमिताभ यांचा अभिनय हे चित्रपटाचे काही ‘प्लस प्वार्इंट’ आहेत. आमिरने नेहमीप्रमाणे प्रेक्षकांची मने जिंकण्याचे प्रयत्न केला आहे. अमिताभ यांचा अभिनयही अफलातून आहेत. दोघांचे एकत्र सीन्स त्यामुळेच दमदार आहेत. आमिर व जीशान अयूब यांच्या या दोघांची जुगलबंदीही मस्त आहे. फातिमा सना शेख, रोनित रॉय, इला अरूण यांनीही आपआपल्या भूमिकेत जीव ओतलाय. कॅटरिनाच्या वाट्याला फार काहीही काम नाही. पण या काही मिनिटांच्या भूमिकेत ती ठिकठिक जमून आलीय.
खरे तर चित्रपट रिलीज होण्यापूर्वी याच्या व्हिएफएक्स इफेक्टसची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर यादृष्टीने चित्रपटात काहीही दम नसल्याचे दिसते. चित्रपटाची सगळ्यांत मोठी उणीव आहे, ती म्हणजे याची लांबी. कदाचित लांबी कमी झाली असती तर चित्रपट आणखी प्रभावी बनू शकला असता. क्लायमॅक्सही आणखी रोमांचक करता आला असता. आमिर व अमिताभ यांनी ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ला आपल्या खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न केला आहे. पण विजय कृष्ण आचार्य यांच्या सुमार दिग्दर्शनाने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. चित्रपटाची कथाही प्रत्येकाला आवडेलचं असे नाही. पहिल्या भागात चित्रपट बरा वाटतो. पण दुसºया भागात तितकाच जड. चित्रपटातील सन्पेन्सही फार प्रभावित करत नाही. सिनेमेटोग्राफी, जहाजांवरील लढाईचे सीन्स, भव्य सेट, असे सगळे असले तरीही चित्रपटाची कमकुवत कथा, सुमार दिग्दर्शन तुम्हाला निराश करते. शेवटी काय तर, आमिर व अमिताभ यांचे चाहते असाल तर तुम्ही आपल्या जोखमीवर चित्रपट पाहू शकता.