Toofan Movie Review: एका जिद्दीची 'तूफान' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:27 IST2021-07-16T16:42:34+5:302023-08-08T20:27:58+5:30
अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा बहुचर्चित चित्रपट तूफान नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Toofan Movie Review: एका जिद्दीची 'तूफान' गोष्ट
अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा बहुचर्चित चित्रपट तूफान नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत विविध खेळांवर आणि बॉक्सिंगवर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तूफान चित्रपटदेखील बॉक्सिंगवर आधारीत असून एका स्थानिक गुंड्याचा प्रोफेशनल बॉक्सर बनण्याचा प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे.
अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झालेला अज्जू उर्फ अजीज अली (फरहान अख्तर) डोंगरीतला एक गुंडा असतो. तो मनाने चांगला असतो पण परिस्थितीमुळे तो गुंडा बनतो. अजीज जेव्हा डॉक्टर अनन्या प्रभू (मृणाल ठाकूर)ला भेटतो तेव्हापासून त्याच्या आयुष्याला नव्याने सुरूवात होते. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. डोंगरीचा गुंडा अज्जू भाई बॉक्सर अजीज अली बनण्याचा ठाम निश्चय करतो. कोच नाना प्रभू (परेश रावल) त्याची जिद्द पूर्ण करण्यासाठी त्याची साथ देतो. त्याला या प्रवास कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल. तूफान चित्रपट एका बॉक्सरने सर्व काही हरपलेले असताना पुन्हा कमबॅक केल्याची कथा रेखाटण्यात आली आहे. तसेच या चित्रपट खेळातील संघामध्ये होणारा भ्रष्टाचारही दाखवण्यात आला आहे.
दिग्दर्शक ओम प्रकाश मेहराने ही कथा दमदार अंदाजात सादर केली आहे जी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. निर्माते रितेश सिधवानी, फरहान आणि राकेश यांच्या फिक्शन स्टोरी असलेल्या स्क्रिप्टचे लेखन अंजुम राजाबलीने केले आहे. चित्रपटाची पटकथा कुठेच खटकत नाही. चित्रपटातील संवादही दमदार असून ते प्रभावित करतात. चित्रपटात कॉमेडीसोबत ड्रामादेखील आहे.
फरहान अख्तरने नेहमीप्रमाणे दमदार अभिनय केला आहे. या भूमिकेसाठी फरहानने घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसते. मृणालने देखील नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केला आहे. तसेच परेश रावल यांनी साकारलेला कोच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवतो. याशिवाय सुप्रिया पाठक आणि हुसैन दलाल या कलाकारांनीदेखील त्यांच्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. चित्रपटातील गाणी आणि संगीतदेखील चांगले आहे. गहरे अंधेरे हे गाणे मनाला भिडते. या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत आणि या गाण्याला विशाल दादलानीने स्वरसाज दिला आहे.
तूफान एका तरूणाच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी आहे जी काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरणा देते. त्यामुळे हा चित्रपट एकदा तरी नक्की पहा.