वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Updated: December 28, 2024 15:43 IST2024-12-28T15:43:13+5:302024-12-28T15:43:32+5:30

अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या तमिळ चित्रपट 'थेरी'चा हा हिंदी रिमेक आहे. वडील-मुलीचे नाते आणि तरुणींच्या तस्करीचा मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.

varun dhawan baby john bollywood movie review | वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू

वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू

Release Date: December 25,2024Language: हिंदी
Cast: वरुण धवन, किर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॅाफ, राजपाल यादव, झारा झ्यान्ना, शीबा चढ्ढा, प्रकाश बेलवंडी, श्रीकांत यादव, सदानंद पाटील, ओमकार दास माणिकपूरी, सान्या मल्होत्रा, सलमान खान
Producer: ज्योती देशपांडे, मुराद खेतानी, अॅटली, प्रिया अॅटलीDirector: कालीस
Duration: २ तास ३९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या तमिळ चित्रपट 'थेरी'चा हा हिंदी रिमेक आहे. रिमेक करताना दिग्दर्शक कालीस यांनी हिंदी रसिकांना अनुसरून काही बदल केले असले तरी पार्श्वभूमी दक्षिणेकडीलच ठेवली आहे. वडील-मुलीचे नाते आणि तरुणींच्या तस्करीचा मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.

कथानक : केरळमधील बेकरी चालवणारा जॅान डिसिल्व्हा आणि त्याची मुलगी खुशी यांची ही गोष्ट आहे. हाणामारीपासून दूर राहणारा जॅान अतिशय साधेपणाने आयुष्य जगत असतो. खुशीच्या शाळेतील शिक्षिका तारा पळवून नेण्यात येत असलेल्या एका मुलीला पोलिस स्थानकात घेऊन जाते. तिच्या मागोमाग खुशीही तिथे जाते. खुशीला आणण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलेला जॅान स्वत:ला सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जॅानचा एक भूतकाळ आहे. एके काळी गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेला जॅान अगोदर नेमका कोण होता आणि त्यात इतका मोठा बदल का झाला त्याची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळते.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाचा विषय चांगला आहे. दाक्षिणात्य शैलीत सर्व चटपटीत मनोरंजक मसाल्यांचा यथेच्छ वापर करण्यात आला आहे. रिमेक असल्याने पटकथा 'थेरी'सारखीच असली तरी आणखी दमदार हवी होती. हिंदीसाठी थोडे फार बदल केले गेले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात मुली आणि स्त्रियांवर होणाऱे अत्याचार मन हेलावून टाकणारे आहेत. मुलींची तस्करी पालकांना मृत्यूसमान वेदना देणारी असल्याचे चित्र चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट वडील-मुलगी, आई-मुलगा, पती-पत्नी, पोलिस-गुन्हेगार, व्यवस्था आणि समाज यांच्यातील संबंधावर भाष्य करतोच, पण समाजविघातक प्रवृत्तींवरही प्रहार करतो. गाणी कथानकात अडथळा आणणारी वाटतात, पण कोरिओग्राफी चांगली झाली आहे. चित्रपटाची लांबी थोडी कमी हवी होती.

अभिनय : वरुण धवनने दोन परस्पर भिन्न स्वभावाची एकच व्यक्तिरेखा अतिशय मेहनतीने साकारली आहे. धडाकेबाज पोलिस अधिकारी आणि पत्नीला दिलेले वचन पूर्ण करण्याकरीता मुलीसोबत साधेपणाने राहणारा बेकरीवाला ही दोन्ही रूपे वरुणने पूर्ण ताकदीनिशी सादर केली आहेत. किर्ती सुरेशने वरुणला सुरेख साथ दिली आहे. वामिका गब्बीची व्यक्तिरेखा काहीशी रहस्यमय असून, तिने उत्तम साकारली आहे. राजपाल यादवने एका दृश्यात जबरदस्त अभिनय केला आहे. जॅकी श्रॅाफने साकारलेला नानाजी मनाचा थरकाप उडवणारा आहे. बालकलाकार झारानेही झकास काम केले आहे. शेवटी सलमान खानचा तडकाही आहे.

सकारात्मक बाजू : विषय, दिग्दर्शन, अभिनय, कोरिओग्राफी, अॅक्शन
नकारात्मक बाजू : पटकथा, चित्रपटाची लांबी, संवाद
थोडक्यात काय तर मानव तस्करीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणारा वडील-मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा हा मसालेपट पाहण्याजोगा आहे.

Web Title: varun dhawan baby john bollywood movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.