Weddingcha Shinema Marathi Movie Review : 'वेडिंगचा शिनेमा' - एक हलकीफुलकी मस्त ट्रीट

By अजय परचुरे | Published: April 11, 2019 02:30 PM2019-04-11T14:30:15+5:302023-08-08T19:47:32+5:30

प्री वेंडिग शूट दरम्यान घडणारी नाजूक प्रेमकहाणी, त्यातील गुंता , गडबडीचे क्षण आणि भावभावनांची गोळाबेरीज म्हणजे वेडिंगचा शिनेमा

Weddingcha Shinema Marathi Movie Review | Weddingcha Shinema Marathi Movie Review : 'वेडिंगचा शिनेमा' - एक हलकीफुलकी मस्त ट्रीट

Weddingcha Shinema Marathi Movie Review : 'वेडिंगचा शिनेमा' - एक हलकीफुलकी मस्त ट्रीट

Release Date: April 12,2019Language: मराठी
Cast: मुक्ता बर्वे, शिवराज वायचळ,ऋचा इनामदार,शिवाजी साटम,अलका कुबल आठल्ये,सुनील बर्वे,प्रवीण तरडे,अश्विनी काळसेकर,संकर्षण कऱ्हाडे
Producer: गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीDirector: डॉ. सलील कुलकर्णी
Duration: २ तास १९ मिनीटंGenre:
लोकमत रेटिंग्स

- अजय परचुरे

लग्न हा असा एक सोहळा आहे. ज्यात दोन कुटुंबाची अनेक इरसाल माणसं एकत्र येतात . लग्नसमारंभात अनेक गमतीजमती ही घडत असतात. आणि मुळात लग्न या विषयावर मराठी आणि हिंदीमध्ये डझनभर सिनेमे आले आहेत. मात्र गेल्या काही वर्षात भारतात प्री वेडिंगचं भयंकर फॅड आलं आहे. प्री वेंडिग शूट करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्याही आता सरसावल्या आहेत. ह्या प्री वेंडिगमध्ये केल्या जाणाऱ्या अचाट गोष्टी सामान्य माणूस आपल्या आयुष्यात कधीच आचारणात आणत असतो मात्र या गोष्टींची हौस तो या प्री वेंडिग शूटमध्ये भागवत नसतो.याच प्री वेंडिग शूट दरम्यान घडणारी नाजूक प्रेमकहाणी, त्यातील गुंता , गडबडीचे क्षण आणि भावभावनांची गोळाबेरीज म्हणजे वेडिंगचा शिनेमा . संगीतकार डॉ.सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा . सलीलने आपल्या पहिल्याच प्रयत्नात दमदार कामगिरी केली आहे. 

मुंबईत स्ट्रगल करत असलेली आणि मोठी दिग्दर्शिका होण्याचं स्वप्न पाहणारी ऊर्वी (मुक्ता बर्वे) हिच्यावर एका लग्नाच्या प्री-वेंडिंगचं शूटींग करण्याची जबाबदारी येते.  सासवडला प्रतिष्ठीत सहाने घराण़्यातील प्रकाशचं (शिवराज वायचळ) सासवडच्या हॉस्पिटलमध्ये डॉकटर असणाºया परी इनामदार (ऋचा इनामदार) हिच्याशी प्रेम जमतं ..परीचे आईवडीलही मुंबईतील प्रतिष्ठित डॉक्टर. दोेन भिन्न स्वरूपाची कुटुंबं लग्नाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि लग्नापूर्वी आपली ही एक मस्त फिल्म असावी अशी परीची इच्छा असते. आणि मग सासवड,मुंबई अशी सुरू होते. परी आणि प्रकाशची प्री वेडींग शूटींग . या शूटींग दरम्यान परी आणि प्रकाश यांच्या लक्षात येतं की आपल्याला अनेक तडजोडी पुढच्या आयुष्यात कराव्या लागणार आहेत. त्यातून मग अनेक गोंधळ आणि गडबडीचे क्षण निर्माण होतात. त्यात लग्नाच्या या तयारीमध्ये अनेक भावनिक आणि गुंतागुंतींच्या क्षणांची भर पडते. त्याचबरोबर दिग्दर्शक बनायला आलेली ही मुलगी या शूट दरम्यान या माणसांकडून काही शिकते की त्यांनाच काही गोष्टी शिकवते,परी आणि प्रकाशची नैय्या खरंच पार होते का ? ही गंमत पाहणे जास्त मनोरंजक ठरणार आहे. 

सिनेमाची कथा सलीलने अतिशय उत्तम बांधली आहे. महानगरांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये परस्पर नात्यांकडे कसे पहिले जाते आणि त्या तुलनेत छोट्या शहरांमध्ये त्याचे काय महत्व असते, याचा उलगडा या कथेतून होतो. पण हे होत असताना मुलभूत तत्वे आणि भावना व त्यातून येणारा जिव्हाळा, त्याग, प्रेम आणि ममत्व या गोष्टी सर्वत्र सारख्याच असतात, हे अंतिम सत्य पुढे येते. सलीलने कथा,पटकथा,संवाद, संगीत,दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर बाजी मारली आहे. हलक्याफुलक्या संवादातून नेमकं आपल्याला काय सांगायचंय ही हातोटी सलीलने आपल्या पहिल्याच सिनेमात दाखवून दिलीय हे महत्वाचं. 

सिनेमातील पात्रांची निवड अगदी तंतोतंत जुळली आहे. दिग्दर्शिका होण्याचं स्वप्न पाहणारी, आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तत्पर असणारी , आणि प्री वेडींगचं अतिशय विचित्र शूट असूनही समरसून त्यातही सामील होणारी उर्वी मुक्ता बर्वेने फारच उत्तम साकारली आहे. परी आणि प्र्रकाशच्या भूमिकेत शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार यांनी उत्तम कामगिरी केली आहे. शिवाजी साटम, सुनील बर्वे, आश्विनी काळसेकर, अलका कुबल -आठल्ये, संकर्षण कऱ्हाडे,योगिनी पोफळे ,प्राजक्ता हनमघर यांनी छोट्या छोट्या भूमिकांतूनही सिनेमात मजा आणली आहे. 

या प्री वेडिंग शूटचा कॅमेरामन आहे मदन भाळ( भाऊ कदम) , प्रकाशच्या मित्र मॅकच्या भूमिकेतील प्रवीण विठ्ठल तरडे, प्री वेडिंगमध्ये प्रत्येकाचा डान्स बसवण्याची जबाबदारी असलेला कोरिओग्राफर जम्बो(त्यागराज खाडिलकर) ही पात्रं विशेष लक्षात राहतात. नात्यांची होणारी गुंंतागुंत , लग्नापूर्वी होणारी तयारी, गडबड-गोंधळ अगदी हलक्याफुलक्या पध्दतीने मांडण्यात आलेला हा एक मस्त सिनेमा आहे. सो वेडिंगच्या या शिनेमाला एकदा पाहण्यास काहीच हरकत नाही. 

 

Web Title: Weddingcha Shinema Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.